मी मॉरिशस ओपन युनिव्हर्सिटीची गाईड होते. महात्मा गांधी संस्थेतील प्राध्यापक डॉ. मधुमती कुंजल यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली ‘ मॉरिशसमधील मराठी भाषा आणि निवडक साहित्याचे स्वरूप : एक चिकित्सक परामर्श ‘ या विषयावर पीएच. डीचे संशोधन पूर्ण केले आहे. आजही दर शुक्रवारी तीन तास मी ऑनलाईन मॉरिशस मधील एम. ए. च्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवते. त्यांची विषयाची आणि भाषेची समज चांगली आहे.
डॉ. स्नेहल तावरे
‘ पाचुचे बेट ‘ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा मॉरिशस देशात मराठी भाषेचे अध्ययन – अध्यापन होते हे अनेकांना माहीत नाही. वस्तुतः मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील मादागास्करच्या पूर्वेला ५०० मैल अंतरावर आहे. लोककथेनुसार प्रभू श्री रामचंद्रांनी मारीच राक्षसावर हल्ला केल्यावर त्याने या देशात आश्रय घेतला म्हणून या देशाला ‘ मॉरिशस ‘ असे नाव देण्यात आले तर ऐतिहासिक नोंदीप्रमाणे १५९८ मध्ये डच ऍडमिरल वायब्रँड व्हॅन वॉरविक यांनी आपल्या देशाचे शासक, प्रिन्स मॉरिस व्हॅन नासो यांच्या सन्मानार्थ या बेटाचे नाव ‘ मॉरिशस ‘ असे ठेवले.
१८१० पासून १९६८ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तेथे ब्रिटिशांनी राज्य केले. भारतातून उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी तेलंगणा, बंगाल, मलबार, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल येथून कामगार नेले. १५ जून १८३४ मध्ये मुंबई बंदरातून मराठी मजुरांनी भरलेले जहाज प्रथमतः मॉरिशसला आले. तेथून पुढे या सर्वांची संस्कृती मिळून एक मॉरिशियन संस्कृती निर्माण झाली. हिंदू , मुसलमान, चायनीज आणि आफ्रिकन अशा धर्मपंथांमुळे विविध भाषा व संस्कृती यांचा मिलाफ येथे झालेला आढळतो.
मॉरिशस मधील मराठी समाजात गोंधळ, जागरण, कथा पूजा पाठ, सर्व सण, उत्सव, भजन, कीर्तन हे आजही मराठी भाषेतूनच करतात. इतकेच नव्हे तर पाचवी, बारसे, साखरपुडा, लग्नविधी आणि अंतिम संस्कारही मराठी भाषेतूनच होतात. सांस्कृतिकदृष्ट्या म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, लोककथा, लोकगीते, विधीनाट्य यातून मराठी सांस्कृतिक परंपरा दिसून येते. त्यातूनच त्यांनी मराठी भाषेबद्दल, मायदेशाबद्दलची ओढ, हळवेपणा आणि कृतज्ञतेची भावना जपली आहे.
भारतीय संस्कृतीतील मूल्ये त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहेत. त्यातूनच एक छोटा भारत, एक छोटा महाराष्ट्र या लोकांनी मॉरिशस येथे निर्माण केला आहे. १९२५ मध्ये सेत कास्कादच्या खाडीतील मराठी लोकांनी गणेश चतुर्थी हा सण साजरा केला. गोविंद भिवाजी राणे, संभा गोविंद जगताप यांच्या घरी गणपतीची पूजा केली जात होती. ज्या मराठी माणसांना मराठी भाषा अवगत होती ती त्यांनी आपल्या मुलांना धूळपाटीवर अक्षरे गिरवायला शिकवले. पुढे ही मुले सायंकालीन शाळेत शिक्षण घेऊ लागली. रात्रीच्या वेळी मराठी वर्गात मुलांना अक्षरलेखन तसेच गणित, कीर्तन शिकवले जात होते. धार्मिक विधींमुळे मराठी भाषेचे संवर्धन केले जात होते.
१८१८ मध्ये पंढरपूरहुन पवार कुटुंबीय मॉरिशसला आले. ते वारकरी संप्रदायातील असल्यामुळे त्यांनी विठोबाचे मंदिर कास्कावेल येथे बांधले. मराठी समाजाला त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे पंडित आत्माराम यांनी ‘ झाशीची राणी लक्ष्मीबाई ‘आणि ‘ शिवछत्रपती महाराज ‘ ही दोन पुस्तके मराठीतून लिहिली. या पुस्तकांमुळे मराठी वाचक वर्ग निर्माण झाला. यानंतर मारदालबेअरला मराठी उपकारी सभेची स्थापना झाल्यावर मराठी भाषा आणि साहित्याचे अध्ययन- अध्यापन सुरू झाले.
गुरुजी बालू रामा, गुरुजी गौतम सोनिया, अमृता कहानिया आणि भागीया यांनी मराठी शिकविण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवली. पुढे याच विद्यार्थ्यांनी शासकीय प्राथमिक शाळेत मराठीचे अध्यापन केले. गुरुजी देवजी पाडिया यांनी स्वतः मराठी भाषा आत्मसात केली आणि ते इतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवत होते. महाराष्ट्रातील बालभारतीची पुस्तके वापरली जात होती. या शिक्षकांपैकी काही शिक्षक भारतात येऊन बी. ए., एम. ए. आणि पीएच.डी. होऊन ते महात्मा गांधी संस्थेत प्राध्यापक झाले.
१९६५ मध्ये प्रथमच शासकीय प्राथमिक शाळेत मराठी भाषेचे अध्यापन सुरू झाले. कै.धर्मा गोविंद, सौ. अनंता आणि सौ. दयावंती बाबाजी या तिघांनी कै. बालशेठ गोपाळ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्रातून आणलेले वाचनमाला हे पुस्तक वापरले जात होते. १९७६ साली महाराष्ट्रातून आलेले मराठी भाषातज्ज्ञ डॉ. श्री. कराडकर यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मराठी पाठ्यपुस्तके तयार केली.
टीचर्स ट्रेनिंग सेंटरच्या पहिल्या गटामध्ये कै.बाई दयावंती बाबाजी आणि कै. गुरुजी धर्मा गोविंद हे दोघे होते. याच दरम्यान महाराष्ट्रातून गुरुजी गजानन पुरुषोत्तम जोशी हे हिंदी शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मॉरिशसला आले होते. मराठी विद्यार्थ्यांना शिकवायला तिथे कोणी नाही हे कळल्यावर त्यांनी मराठी विद्यार्थ्यांनाही प्रमाण मराठी भाषा शिकवली. त्यांच्या सहकार्यामुळे १९६९ साली मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. या संस्थेच्या मदतीने नऊ जणांना पनवेल येथील सरकारी बेसिक ट्रेनिंग कॉलेजला मराठी शिकवण्यासाठी भारतात पाठवण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्यापैकी आठ जण मराठी विषयाचे शिक्षक म्हणून शाळेत अध्यापनाचे काम करू लागले.
१९८४ पासून मराठीचे अध्यापन फक्त महात्मा गांधी संस्थेच्या माध्यमिक शाळेत सुरू झाले. एच.एस. सीच्या परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात जाऊन मराठी शिकण्यासाठी आयसीसीआरची शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यापीठाय स्तरावर १९९३ ते १९९६ साली महात्मा गांधी संस्थेने मराठीत पदविका अभ्यासक्रम सुरू केला. सुरुवातीला दोन विद्यार्थिनींनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून सरकारी माध्यमिक शाळेत मराठी शिकवण्यास सुरुवात केली. १९९९ पासून महात्मा गांधी संस्थेने मराठीत बी.ए. चा अभ्यासक्रम सुरू केला. कै. बाई दयावंती बाबाजी, प्रा. संजय गोविंद, डॉ. बिदन आबा, डॉ. होमराजन गौरिया आणि डॉ. मधुमती कुंजल यांनी विद्यापीठ हे स्तरापर्यंत मराठी भाषा पोहोचविण्याचे कार्य केले. २००६ साली एम.आय. ई. आणि महात्मा गांधी संस्थेच्या सहकार्याने मराठीत पीजीसीई हा पदविका अभ्यासक्रम सुरू झाला.
२०२३ सालापासून मराठी विषयात एम. ए. होता येते. मराठी विभागातर्फे ‘ वसंत ‘ नावाचे मासिक प्रकाशित होते. मॉरिशस मधील नवोदित लेखकांचे लेख, मराठी दिनानिमित्त झालेल्या निबंध स्पर्धांमध्ये पहिल्या तीन विजेत्यांचे निबंध, विद्यार्थ्यांचे आणि काही परदेशातील लेखकांचे लेख यात प्रकाशित होतात. तसेच मराठी दिनानिमित्त झालेल्या कथालेखन स्पर्धेमध्ये जे भाग घेतात त्यांच्या कथांचा संग्रह ‘ मॉरिशसमधील मराठी कथा ‘ हा मराठी विभागातर्फे प्रसिद्ध केला जातो. आत्तापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
एकूणच मॉरिशसमधील मराठी भाषेचे संवर्धन केले जात आहे. आजही शाळेतील असो वा महाविद्यालयातील, प्राध्यापकांना ‘ गुरुजी ‘ असे संबोधले जाते तर शिक्षिका व प्राध्यापिका यांना ‘ बाई ‘ म्हटले जाते. ( शीलाबाय बापू यांचे नाव भारतात प्रसिद्ध आहे.) आपल्याकडे मात्र हे शब्द आता कालबाह्य झाले आहेत.
मी मॉरिशस ओपन युनिव्हर्सिटीची गाईड होते. महात्मा गांधी संस्थेतील प्राध्यापक डॉ. मधुमती कुंजल यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली ‘ मॉरिशसमधील मराठी भाषा आणि निवडक साहित्याचे स्वरूप : एक चिकित्सक परामर्श ‘ या विषयावर पीएच. डीचे संशोधन पूर्ण केले आहे. आजही दर शुक्रवारी तीन तास मी ऑनलाईन मॉरिशस मधील एम. ए. च्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवते. त्यांची विषयाची आणि भाषेची समज चांगली आहे.
एम. ए. ला डॉ. द. ता. भोसले यांच्या साहित्यावर एक पेपर आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद या विद्यार्थ्यांनाही झालेला आहे. मॉरिशसमधील काही लेखकांची पुस्तके मी प्रकाशित केली आहेत. आणि तिथे तीन आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदा आयोजित केलेल्या होत्या. त्या परिषदांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . भारताबाहेर मराठी भाषेचा अभ्यास कोठे होतो हे जाणून घेण्यासाठी हा लेखप्रपंच. मॉस्कोमधील डॉ. इरेना ग्लुस्कोवा यांनी संत तुकाराम महाराजांवर पीएच.डी. केलेले असून त्या अस्खलित मराठी बोलतात. भारत आणि मॉरिशसमधील मराठी भाषकांचे आदानप्रदान वृद्धिंगत व्हावे हीच अपेक्षा. 👏👏
डॉ. स्नेहल तावरे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.