इस्लामपूर : छोटी साहित्य संमेलने परिणामकारक असतात. यातील भाषिक संवाद माणसाला जोडण्याचे काम करतो. इतर सर्व चळवळी संथ झाल्या असताना अशा संमेलनांतून होणारी भाषेची चळवळ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. वामन जाधव (पंढरपूर) यांनी केले. चांगल्या, कसदार लेखकाची नोंद काळ घेत असतो, असेही ते म्हणाले.
पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात ते बोलत होते. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील, मसाप इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. दीपक स्वामी यांनी उदघाटन केले. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, सर्जेराव जाधव, रघुराज मेटकरी, गझलकार सुधाकर इनामदार, कवी विजय जोशी प्रमुख उपस्थित होते. यावेळी विशाल मोहोड (अमरावती), सीमा झुंझारराव (मुंबई), बाबासाहेब ढोबळे (बारामती), आशा नेगी (पिंपरी चिंचवड), विजय जोशी (डोंबिवली), वासंती मेरू (पलूस) यांच्या साहित्यकृतींसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
डॉ. जाधव म्हणाले, “जुन्या पिढीला जोडून न घेतल्याने आपले मोठे नुकसान झाले आहे. मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी भाषिक चळवळ गतिमान व्हायला हवी. छोटी संमेलने परिणामकारक असतात. मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी.”
मराठीचे सार्वत्रिकीकरण झाले नाही. जुन्या पिढीच्या भाषेला आपण जोडून घेतले नाही. ती भाषा व्यवहारात वापरता आली नाही. त्याचे संपादन केले, पण संशोधन केले नाही. अशी खंतही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली.
ग्रामीण स्त्रीकडे प्रचंड प्रतिभा आहे. संतांनी मराठीची लय जोपासली, पण आपणाला ते जमले नाही. संतांनी जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. नैतिक मूल्यांची शिकवण देणारे आजी आजोबा बाहेर गेले आणि मोबाईल आत आला. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून मराठीची अभिरुची वाढ थांबलीय. वाचन वाढले पाहिजे. त्याची जबाबदारी संमेलने पार पाडत आहेत. इथेच नव्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातील मोठे लेखक निर्माण होतात. संमेलन सामान्य लोक मोठे करतात. बाहेरचे कुणी नाही, तर आपणच क्रांतीज्योत पेटवू.” असेही डॉ. जाधव म्हणाले.
“खऱ्या राजकारणात नाही, इतकी साहित्यातील गटबाजी टोकदार झालीय. त्यातून चंद्रकुमार नलगे यांच्यासारख्या साहित्यिकावर अन्याय झाला. असे लिहा की स्वतः सिद्ध झाले पाहिजे. आपल्या लेखनासमोर सगळी गटबाजी बाजूला पडली पाहिजे.”
दि बा पाटील
प्रा. शामराव पाटील म्हणाले, “ग्रामीण भागात होणाऱ्या छोट्या संमेलनात खऱ्या अर्थाने लेखक, कवी घडतात. त्यासाठी ‘तिळगंगा’चा पुढाकार मोलाचा आहे.” दीपक स्वामी म्हणाले, “परिसराच्या सांस्कृतिक विकासासाठी तिळगंगा परिवाराने मोठे योगदान दिले आहे.”
श्री. ढोबळे म्हणाले, “तिळगंगा पुरस्काराने लेखनाला बळ मिळाले.”
दि. बा पाटील म्हणाले, “ग्रामीण संमेलनांना मिळणारा स्थानिक प्रतिसाद अत्यल्प असतांनाही सातत्याने आयोजन करणे जिकीरीचे बनत चालले आहे. श्री. इनामदार, मेटकरी यांची भाषणे झाली. उत्तम सावंत यांनी प्रास्ताविक केले.
विद्या पाटील, मनीषा रायजादे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष मेहबूब जमादार, आनंदहरी, एम. एम. जमादार, पंडित लोहार, व्ही. व्ही. गिरी, सूर्यकांत शिंदे, विनायक कुलकर्णी, दिलीप गिरीगोसावी, सिंधुताई कचरे, शंकर पाटील उपस्थित होते. महादेव हवालदार यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
