मुंबई कॉलिंग
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून महापालिकेने एक्कावन्न कबुतरखाने सार्वजनिक ठिकाणाहून हटवले हे बहुसंख्य जैन समाजाला मान्य झालेले नाही. कबुतरखान्यांच्या मुद्यावरून काही जैन मुनी तर आक्रमक झाले आहेत. राजकीय पक्षांनी कबुतरखान्यांवरून केलेले राजकारण जैन मुनींना मुळीच पसंत पडलेले नाही. म्हणूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपला आवाज उठविण्यासाठी काही जैन मुनींनी पुढाकार घेऊन शांतीदूत जनकल्याण पक्ष मैदानात उतरविण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे. या नवीन पक्षाची घोषणा झाली असून त्याचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षांना भोगावा लागणार या चर्चेला उधाण आले आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
मुंबई महापालिकेचे यावर्षीचे बजेट ७२ हजार कोटींचे आहे, पुढील वर्षी चे ९० हजार कोटी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच भाजप, शिवसेना ( शिंदे ), उबाठा सेना ( उद्धव ठाकरे ) हे तिनही पक्ष येत्या निवडणुकीत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. मुंबईतील धनवान मतदार असलेल्या जैन समाजाला दुखावणे हे कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारे नाही. पण मुंबईतील कबुतरखाने हटविण्याच्या कारवाईमुळे जैन समाज दुखवला गेला आहे. म्हणूनच कबुतरप्रेमी जैन मुनींनी नवा पक्ष स्थापनेची घोषणा केली आणि कबुतरखान्यावरून जैन समाजाला दुखविणाऱ्या नेत्यांना आवरा असे आवाहन केले आहे.
जैन मुनी नीलेशचंद्र यांनी शांतीदूत जनकल्याण पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली. आम्ही मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. काही जण कबुतरखान्यांच्या मुद्यावरून राजकारण करीत आहेत, मराठी लोकांचा कबुतरखान्याला विरोध नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. जैन धर्मिय सर्वाधिक टॅक्स भरतात, याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे. नव्या पक्षाचे चिन्ह कबुतर असेल व केवळ ही जैन धर्मियांची पार्टी नसेल तर सर्वांना त्यात प्रवेश आहे. ज्यांचा कबुतरखान्यांना विरोध आहे, त्यांना आमचा विरोध राहील असे जैन मुनी नीलेशचंद्र यानी स्पष्ट केले आहे. कबुतराला दाणे टाकणे आमचा धर्म आहे, अशीही त्यांनी पुस्ती जोडली आहे.
जैन, मारवाडी, गुजराथी मतदार सर्वसाधारणपणे भाजपला मतदान करतात. जर जैन मुनी नवा पक्ष स्थापन करून आपले उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरवणार असतील कोणत्या पक्षाला धोका निर्माण होऊ शकतो ? पूर्वी एका पक्षाला कोंबडीमुळे त्रास सहन करावा लागला होता, एका पक्षाला तर दिल्लीत कांद्यामुळे सत्ता गमवावी लागली होती. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या पक्षाच्या बॅनरवर तर डरकाळ्या फोडणारा वाघ आणला व तो आजही दिमाखात आहे. मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची तीस वर्षे सत्ता होती. मुंबई महापालिकेची सत्ता हा उध्दव ठाकरे यांच्या पक्षाचा प्राणवायु आहे असे म्हटले जाते. उध्दव यांनी राज ठाकरे यांचा हात हातात घेऊन मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जिद्द बाळगली आहे, तर दुसरीकडे मुंबईवर भाजपचा महापौर बसविण्यासाठी पक्षाने सर्वस्व पणाला लावले आहे. एकनाथ शिंदे हे महापालिका निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत वावरत आहेत.
जैन मुनी नीलेशचंद्र यांनी म्हटले आहे की, जैन समाजाचे प्रतिक शांतीदूत कबुतर आहे जे या शांतीदुताला विरोध करीत आहेत, त्यांना आमचा विरोध राहील. या नव्या पक्षाला जैन, मारवाडी, गुजराती समाजाचा पाठिंबा मिळाला तर महायुतीचे विशेषत: भाजपचे मोठे नुकसान होऊ शकते असे राजकीय विश्लेषकांना वाटते. एकीकडे स्थानिक स्वराज् संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे पण शांतीदूत जनकल्याण पार्टीच्या घोषणेमुळे भाजपला आता आपल्या रणनितीचा फेरविचार करावा लागणार आहेत. राज्यातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात जैन, मारवाडी, गुजराती समाज आहे. हा मतदार एकगठ्ठा मतदान करतो. या समाजाची मते आपल्या हातून निसटू नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांना दक्षता घ्यावी लागणार आहे.
आरोग्याला घातक आहेत म्हणून मुंबईतील कबुतरखाने सार्वजनिक ठिकाणावरून हटविण्याची महापालिकेने कारवाई सुरू केली तेव्हा जैन समाजाने मोठा विरोध केला. दादर व अन्य भागातील कबुतरखान्यांसमोर समाजाने शक्ति प्रदर्शन केले. त्यात महिलाही मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या. सत्ताधाऱ्यांना साधुसंतांनी राजसत्तेत बसवले आहे, त्यामुळे धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा वरचढ आहे असे खडे बोल जैन मुनींनी सरकारमधील राजकीय पक्षांना सुनावले आहेत. जैन समाजाने ठाण्यात एकनाथ शिंदे यांन साथ दिली, आनंद दिघे यांच्या पाठिशीही जैन समाज उभा राहिला होता, मग आज शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नेते कबुतरखान्यावरून वाद निर्माण करीत आहेत, त्यांना आवर घालावा असे आवाहन जैन मुनींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जैन समाजाने दोन कोटीचा धनादेश दिला असल्याचीही मुनींनी आठवण करून दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
