प्रयोगभूमीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर संपन्न..
प्रयोगभूमी हा ऊर्जेचा स्रोत आहे. इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला इथून परत जाताना ऊर्जा मिळते. इथे होणाऱ्या शिबिरातून भारतीय संविधानातील मूल्ये रुजविली जातात. इथून जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शारीरिक श्रमाबरोबरच बौद्धिक जडणघडणीची कास धरावी, समाजात चांगला माणूस म्हणून आपला ठसा उमटवावा.
अरुण काकडे
चिपळूण – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय ) चिपळूणतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ५ दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबीर झाले. श्रमिक सहयोग संस्थेच्या मौजे कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी शिक्षण केंद्रामध्ये २४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये २६ मुले आणि ४ मुली मिळून एकूण ३० विद्यार्थ्यानी तसेच ५ शिक्षकांनी सहभाग घेतला.
शिबिराचे उद्घाटन अनिल मलमे, शाखा अभियंता महानिर्मिती पोफळी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या वेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळूणचे प्राचार्य प्रीतम श. शेट्ये, उपप्राचार्य विजय मु. वानखडे, प्र. गटनीदेशक श्री. गोरेसर, एन.एस.एस. अधिकारी श्री. समीर पाणींद्रे, श्री. चव्हाणसर, श्री. देवळेकरसर इ. मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये संस्थेच्या क्षेत्रात विविध कामे करण्यात आली. शेततळ्यामधील गाळ उपसणे, रनिंग ट्रॅक तयार करणे, नवीन बांधलेल्या शौचायलास रंग देणे, दगड मातीचा भराव टाकून रस्ता रुंदीकरण करणे, नवीन खड्डा मारून प्लेट अर्थीग करणे, प्रयोगभूमीच्या इमारतीतील लाईट दुरुस्तीचे काम व नवीन वायरिंग करणे, विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या बंधाऱ्यातील गाळ उपसणे इ. कामे यावेळी करण्यात आली. दररोज किमान ५ तास शारीरिक श्रम हे या शिबिराचे वैशिष्ट्य होते.
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकदेखील प्रत्यक्ष काम करीत होते. दररोज एक तास बौद्धिक सत्राचा होता. त्यामध्ये डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्रा. डी. आर. पवार, श्री. कडवईकरसर, श्री. देवळेकर सर यांनी शिबिरार्थिना मार्गदर्शन केले. प्रख्यात साहित्यिक श्री. अरुण काकडे हे या शिबिरात पूर्ण वेळ सहभागी होते. त्यांनी विविध विषयांवर शिबिरार्थिचे प्रबोधन केले. संध्याकाळच्या सत्रात शिबिरार्थिनी नृत्य, गायन, नकला इ. विवीध कलागुण सादर केले. त्यात प्रयोगभूमीतील मुलांनी ही सहभाग घेतला.
२८ फेब्रुवारी रोजी शिबिराचा समारोप झाला. यावेळी साहित्यिक अरुण काकडे यांनी केलेल्या भाषणात प्रयोगभूमीच्या सुरवातीच्या काळात झालेल्या शिबिरांचा परामर्श घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, प्रयोगभूमी हा ऊर्जेचा स्रोत आहे. इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला इथून परत जाताना ऊर्जा मिळते. इथे होणाऱ्या शिबिरातून भारतीय संविधानातील मूल्ये रुजविली जातात. इथून जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शारीरिक श्रमाबरोबरच बौद्धिक जडणघडणीची कास धरावी, समाजात चांगला माणूस म्हणून आपला ठसा उमटवावा.
यावेळी उपस्थित असलेले आय टी आय चे प्राचार्य प्रितम शेट्ये यांनी प्रयोगभूमीत चाललेल्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रयोगभूमीने यापुढेही अशा प्रकारची शिबिरे आयोजित करावी, त्याला आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले. तर उपप्राचार्य श्री. विजय वानखेडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधचिन्ह आठ आऱ्यांचे आहे. या आठ आरी गौतम बुद्धाचे अष्टांग मार्ग सांगतात अशा शब्दात विवेचन केले. यावेळी शंतनु पटवर्धन, सुयोग म्हस्के, आर्या सावंत, कस्तुरी कांबळे या विद्यार्थ्यानी आपली मनोगत मांडताना शिबिरात आलेले अनुभव सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख श्री. समीर पाणींद्रे यांनी श्रमिक सहयोग संस्था, सर्व प्रशिक्षणार्थी व पाहुण्यांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आय टी आय चे समन्वयक श्री अभिजीत श्री. कडवईकर, श्री. ओंकार देवळेकर, श्री. राजेंद्र चव्हाण श्री. संतोष मोहिते, श्री. शशिकांत काणेकर, श्री. रोशन नासरे, श्री. शैलेश ओमासे, श्री. शिवाजी झोरे प्रयोगभूमीचे शिक्षक श्री. मंगेश मोहिते, श्रीमती रेखा मोहिते, श्रीमती स्नेहा मांजरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.