अलीकडेच 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला जाहीर झाले. तेव्हा माझ्या कोल्हापूरच्या समृद्ध आणि सकस मातीतील मृत्युंजयकार शिवाजी सावंत, रणजीतदादा देसाई, डॉक्टर आनंद यादव आणि चंद्रकुमार नलगे अशा श्रेष्ठ पूर्वसुरींच्या आठवणी दाटल्याशिवाय राहिल्या नाहीत.
विश्वास पाटील
“एक तर माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव आता पहिल्यासारखे वाचन होत नाही. दुसरे म्हणजे तुमच्या “झाडाझडती”चा प्रकाशन समारंभ पहिल्या मजल्यावर आहे. इमारतीला लिफ्ट नाही. त्यामुळे समारंभस्थळी मनात इच्छा असूनही येता येत नाही. मी खालच्या पायरीवरच प्रकाशन करून निघून गेलो तर तसे तुम्हाला आवडेल का?”
रणजीतदादा मला विचारत होते. मी म्हणालो दादा, आपल्यासारख्या ज्येष्ठ तपस्वी लेखकाची केवळ तेवढ्यापुरती हजेरी सुद्धा मी तुमच्या मंगल आशीर्वादाचा भाग समजेन. मी दादांना नम्रपणे सांगितले.
नुकतीच दोन वर्षांमागे “पानिपत” कादंबरी वादळासारखी घोंगावत आली होती.. जनामनाचा भाग बनली होती. त्यानंतर मी नवीन काय लिहिणार याची वाचक आणि समीक्षकांनाही उत्सुकता होती. त्यामुळेच दादांचा आशीर्वाद मला हवा होता.
तो 1991 चा पावसाळा. कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिराच्या शेजारीच पहिल्या मजल्यावर एक हॉल होता. तिथे “झाडाझडती”चे प्रकाशन आयोजिले होते. पुण्याहून दिलीप माजगावकर आलेले. रणजीतदादांना घेऊन यायची जबाबदारी श्री. अनिल मेहता यांनी उचलली होती.
दादांची अँबेसिडर कार अगदी वेळेत येऊन पोहोचली. कादंबरीच्या प्रती घेऊन आम्ही खाली पायरीवरच उभे होतो. दादा म्हणाले, “मी वर येतोय, प्रकाशन समारंभ वरच्या मजल्यावरच थाटात करूया.. मी पूर्ण वेळ बसणार आहे.” आणि काय आश्चर्य, दादांनी अनिल मेहता यांच्याकडे फक्त ‘तू हात दे’ असा इशारा केला.. दादा स्वतः पायऱ्या चढून वर आले.
प्रकाशन सोहळ्यात दादा माझे अभिनंदन करत मला म्हणाले, “माझ्या तरुण दोस्ता, तुला माहिती आहे काय, मला या पायऱ्यावरून तुझ्या शब्दांनीच खेचून वर आणले आहे. तुझी ही कलाकृती अभिजात उतरली आहे. ती तुला कीर्तीमान बनवेल.”
दादांचे बक्कळ आशीर्वाद लाभले. पुढच्याच वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार “झाडाझडती”ने मिळविला. दादांशी माझे उत्तम जमायचे.
त्याआधी मी नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलो होतो. 1985 मध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन इस्लामपुरामध्ये भरले होते. रणजीतदादा त्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते तेव्हाच माझ्या “क्रांतीसूर्य” नावाच्या मी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर लिहिलेल्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार लाभला होता.
तेव्हा दादांच्या सोबत माधवी देसाई होत्या. माधवीताई आणि दादांचा साहित्यिक संसार खूप उत्तमरीत्या चालला होता. दादांचे लेखन, त्यांचा वावर आणि त्यांचा प्रवास—अशा त्यांच्या साहित्यसंसाराशी माधवीताई कमालीच्या एकरूप झाल्या होत्या. पण दुर्दैवाने लवकरच त्यांच्या उत्तम जोडीला कोणाची तरी दृष्ट लागली.
दादांच्या मुखातून अनेकदा वि. स. खांडेकर आणि इतर महनीय साहित्यिकांच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. दादांचा जावई मदन नाईक हा माझा मित्र होता. दादा इनामदार घराण्यामध्ये जन्माला आले, परंतु ते साहित्याच्या श्रीमंतीमध्येच अधिक रमले होते. त्यांच्या अवतीभवती सतत चित्रकार, संगीतकार, गायक, वादक आणि चित्रपटसृष्टीतील कर्त्या व्यक्तींचा मेळा असायचा.
आज सुद्धा “राधेय” आणि “राजा रविवर्मा” सारख्या कलाकृती वाचताना दादांची खूप आठवण दाटते. दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल यशोधरा काटकर यांनी “बंजाऱ्याचे घर” ह्या ग्रंथात खूप सुंदर मजकूर लिहिला आहे. मला आदरणीय दादा आणि श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचनाआत्या यांच्या रंगलेल्या अविट गप्पा नेहमी आठवतात.
दादा कोवाडहून कोल्हापुरात आले की, त्यांच्यासोबत अनिल मेहता नेहमी सावलीसारखे असत. आपल्या एखाद्या लेखकावर असे पित्यासारखे प्रेम करणारा अनिल मेहता यांच्यासारखा भल्या प्रवृत्तीचा प्रकाशक मी पाहिलेला नाही.
अलीकडेच 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला जाहीर झाले. तेव्हा माझ्या कोल्हापूरच्या समृद्ध आणि सकस मातीतील मृत्युंजयकार शिवाजी सावंत, रणजीतदादा देसाई, डॉक्टर आनंद यादव आणि चंद्रकुमार नलगे अशा श्रेष्ठ पूर्वसुरींच्या आठवणी दाटल्याशिवाय राहिल्या नाहीत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
