कडक उन्हाळा. वैशाख वणवा पेटलेला. अशात उन्हातून आले की, थंड पाणी प्यावेसे वाटतेच. असे कोणी आले की, रेफ्रिजरेटर उघडून थंड पाणी दिले जाते. उन्हाळा सुसह्य होतो तो प्रशीतनीमुळे. चमकलात रेफ्रिजरेटरला मराठीमध्ये प्रशीतनी म्हणतात. आजच्या वापरातल्या फ्रिजला अवतरायला जवळपास तीनशे वर्षे जावी लागली. त्याहीपूर्वी पाणी थंड करण्याचे, ठेवण्याचे नैसर्गिक पद्धती शोधण्यात आल्या होत्या. आज मात्र आधुनिक रेफ्रिजरेटरच्या शोधानंतर संपूर्ण जगाची सवयच बदलली आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मानवाचे जीवन सुखकर करणाऱ्या, स्वयंपाकगृहात अधिकार गाजवणाऱ्या या यंत्राच्या सहाय्याने अन्न पदार्थ आणि औषधे सुरक्षित ठेवतात. आधुनिक रेफ्रिजरेटरच्या शोधापूर्वीपासून अन्न आणि इतर पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी, खराब होऊ नयेत, यासाठी थंड वातावरणाची निर्मिती करण्याचे अनेक प्रकार होते. नदीतील पाण्याचाही काही भागामध्ये शीतकरणासाठी वापर करण्यात येत असे. बर्फ असलेली खोली शीतकरण यंत्राप्रमाणे वापरण्यात येत असे. त्यापूर्वीही निसर्गात आढळणारे बर्फ आणि इतर घटकांचा वापर पदार्थ थंड करण्यासाठी करत. काही भागात जमिनीच्या आत गुहेसारखी रचना करून अन्नपदार्थ थंड ठेवत. भारतात मातीच्या भांड्यात पाणी ठेवून ते थंड करण्यात येत असे. तसेच धान्य साठवण्यासाठी जमिनीच्या पोटात पेव तयार केले जात. विदेशातही जमिनीत पदार्थ साठवून त्याला चांगले झाकले जात असे. त्यावर बर्फाचा थर पसरवून गवताचा थर बर्फ वितळू नये म्हणून, घालण्यात येत असे. कृत्रिम संयंत्रांच्या म्हणजेच फ्रीजच्या शोधापूर्वी असे अन्नधान्य सुरक्षित ठेवण्याचे अनेक उपाय करत.
पुढे कृत्रिम यंत्राच्या निर्मितीचा प्रयत्न संशोधकांनी सुरू केले. यामध्ये सर्वप्रथम १७४८ मध्ये स्कॉटलंडमधील प्राध्यापक विल्यम कलेन यांनी शीतकरण प्रक्रिया कशी करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी कायइथाईल इथरचे जो भाग थंड करायचा त्यावर बाष्पीभवन करून तापमान कमी केले. त्यांनी कृत्रिम पद्धतीने प्रथमच पदार्थांना थंड करून दाखविले. यानंतर अनेकांनी अशी शीतगृहे उभारण्यास सुरुवात केली. अशा खोल्या आणि पेटीच्या बाह्य बाजूस उष्णतेच्या दुर्वाहक पदार्थाचा थर देत. त्यामुळे खोली किंवा पेटीच्या आतील वातावरण दीर्घ काळ थंड रहात असे. पुढे या पेट्यांच्या रचनेत बदल करण्यात आले. पेटीच्या भिंतीमध्ये बर्फ भरण्याची सोय करण्यात आली. पेटीचा बाह्य भाग ऊष्णतेचा दुर्वाहक पदार्थाचा तर आतला भाग ऊष्णतेचा सुवाहक असे. आजही आईसकँडी विकणारे अशाच प्रकारच्या पेट्या वापरतात. शीतकरणाच्या इतिहासात दररोज सकाळी बर्फाच्या लाद्या किंवा शीतपेट्या घरोघरी भाड्याने पुरवण्याचा अनेक लोकांचा व्यवसाय होता.
पुढे १८५० मध्ये ज्युल-थॉम्सन परिणाम शोधण्यात आला. यानुसार उच्च-दाबाखाली असणारी हवा प्रसरण पावताना थंड होते. याच तत्त्वाचा वापर करून एकोणिसाव्या शतकात व्हेपर-कॉम्प्रेसन पद्धतीचा शोध लागला. मात्र त्याहीपूर्वी १८३४ मध्ये जेकब पर्किन्स यांनी याच तत्त्वाचा वापर करून पदार्थ थंड करण्यासाठी यंत्र बनवले होते. मात्र ज्यूल-थॉम्सन परिणामाचा वापर करून बर्फ बनवणारे पहिले यंत्र १८५४ मध्ये विकसित करण्यात आले. १८७६ मध्ये कार्ल वोन लिंडे यांनी वायुंना द्रवरूपात आणण्याची प्रक्रिया विकसित केली. त्याचे स्वामित्त्व हक्कही घेतले. पुढच्या पन्नास वर्षांत विद्युत ऊर्जेचा वापर करून शीतकरण करण्यासाठीचे यंत्र म्हणजेच रेफ्रिजरेटर किंवा प्रशीतनी बनवण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिकन संशोधक फ्रेड वोल्फ ज्यु. यांनी १९१३ मध्ये पहिले असे यंत्र बनवले. मात्र याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे तंत्र शोधले गेले नव्हते. सन १९१८ मध्ये विल्यम ड्युरंट यांनी हे कार्य केले. त्यानंतर घरोघरी शीतकपाट किंवा रेफ्रिजरेटर पोहोचण्याची खात्री वाटू लागली.
लवकरच १९२० मध्ये क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) शीतकरणासाठी वापरता येईल हे संशोधकांच्या लक्षात आले. अवघ्या तीन वर्षांत फ्रिजिडायर यांनी असा फ्रिज बनवला. हे घरात सहज वापरता येऊ शकेल असे उपकरण होते. १९३० मध्ये शीतयंत्रासाठी फ्रिऑनचा वापर सुरू झाला. त्यापूर्वीचे वायू विषारी होते. फ्रेऑनमुळे हा धोका संपला. वाढत्या शहरीकरणामध्ये अन्न सुरक्षा हा विषय महत्त्वाचा बनला. अन्नधान्य, इतर खाण्या-पिण्याचे पदार्थ ताजे मिळावेत, ही अपेक्षा असते. अन्न खराब होऊ नये यासाठी प्रत्येकाला असे यंत्र हवे होते. दुकानातील फळे, भाज्या, अन्नपदार्थ, दूध, मद्य, औषधे खराब होऊ नयेत यासाठी ते गरजेचे बनले. शेतापासून किंवा उत्पादन स्थलापासून दुकानापर्यंतचा प्रवास, दुकान आणि घरामध्ये शीतगृहाची किंवा अशा यंत्राची गरज भासू लागली.
विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या घरगुती रेफ्रिजरेटरची किंमत ५०० ते १००० डॉलर्स इतकी असायची. महागाई वाढीचा दर लक्षात घेता आज त्यांचे मूल्य ६५७५ ते १३१५० अमेरिकन डॉलर्स इतके भरते. सुरुवातीच्या काळात घरामध्ये फ्रिज असणे ही उधळपट्टी मानली जात असे. फ्रिज घरात असणे म्हणजे चैन करणे मानले जाई. रेफ्रिजरेटर लोकप्रिय झाले तरी या क्षेत्रामध्ये होणारे संशोधन सुरूच राहिले. त्याचे दिसणे आणि अधिक उपयुक्तता महत्त्वाची समजून त्यावर संशोधन कार्य सुरूच राहिले. रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये एकापेक्षा जास्त कप्पे बनवले जाऊ लागले. भाज्या ठेवण्यासाठी मोठी पेटी सर्वात खालच्या बाजूला, त्यानंतर इतर अन्नपदार्थ ठेवण्यासाठीची जागा, सर्वात वरती बर्फ बनवण्यासाठीची जागा आणि दरवाज्यालाच पाण्याच्या शीतपेयाच्या बाटल्या ठेवण्यासाठीची जागा असे सर्वकाही एका बॉक्समध्ये बसवण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या आकाराचे उभे कपाटसदृष्य फ्रीज घरोघरी आले आहेत. फ्रीज गरज बनला आणि आता तर त्याशिवाय उन्हाळा सुसह्य होत नाही.
लोकांना गोठवलेले अन्न खाण्याची सवय साधारण १९४० च्या दरम्यान लागली. तेव्हापासून अंतर्गत रचना अधिकाअधिक पदार्थ साठवण्यासाठी कशी वापरता येईल, यावर भर देण्यात आला. बर्फ बनवण्यासाठी विविध आकाराचे ट्रे बनवण्यात आले. १९८० मध्ये केवळ पाणी थंड करणारे डिस्पेंसर तयार करण्यात आले. थेट पाण्याच्या नळाला हा डिस्पेंसर जोडून बाहेर पडणारे थंड पाणी लोकांची तहान भागवू लागले. काही वर्षांपूर्वी अनेक हॉटेल्स, कार्यालये आणि वसतीगृहांच्या दर्शनी भागात असे डिस्पेंसर दिसत.
स्वच्छता आणि ऊर्जा बचत यावर पुढील काळात संशोधन सुरू झाले. स्टील स्वच्छतेच्या दृष्टिने सोईचे आहे, हे लक्षात आले. पुढच्या काळात तापमान बदल सहन करणारे रंग शोधण्यात आले. आज स्टील कलर असणारे फ्रिज घराघरात दिसू लागले आहेत. अपवाद वगळता फ्रिज नाही, असे घर सापडणार नाही. …आणि फ्रिज कितीही मोठा घेतला तरी तो काही पुरत नाही. इतका तो आपल्या सवयीचा झाला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.