सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेतर्फे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका नीरजा यांची निवड करण्यात आली आहे. तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे उपस्थित राहणार आहेत. येत्या 28 डिसेंबर रोजी येथील आरपीडी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत सभामंडपात हे संमेलन साजरे होणार आहे, अशी माहिती प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिली.
या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रा. प्रवीण बांदेकर यांनी हे जाहीर केले. यावेळी संमेलनाच्या विविध समित्या गठीत करण्यात आल्या. संमेलनाची रूपरेषाही निश्चित करण्यात आली. या बैठकीस सतीश लळित, उषा परब, गोविंद काजरेकर यांच्यासह वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड संदिप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, सुमेधा धुरी, कल्पना बांदेकर, विजय ठाकर, वाय पी नाईक, मंजिरी मुंडले, विनया बाड, पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, विजय देसाई, रूपेश पाटील तसेच जिल्हाभरातून आलेले अनेक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षा कवयित्री नीरजा यांचा परिचय
कवयित्री नीरजा यांचे निरन्वय, वेणा, स्त्रीगणेशा, निरर्थकाचे पक्षी, मी माझ्या थारोळ्यात इत्यादी सहा संग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसे इत्यादी चार कथासंग्रह, थिजलेल्या काळाचे अवशेष ही कादंबरी, अनेक ललित लेख संग्रह, संपादने वगैरे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा परिचय
डॉ. लवटे यांचे खाली जमीन वर आकाश हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. शिरोडा व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांच्या स्मृती जतन करणारी भव्य दालने उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. खांडेकरांचे वैनतेय साप्ताहिकातील लेखन संपादित करून त्यांचे चार खंड त्यांनी प्रकाशित केले आहेत. याशिवाय, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्मयाचे दहा खंड त्यांनी संपादित केले आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
