June 1, 2025
Singing life in the eyes of the blue sky book review by vishal Tayade
Home » निळ्या निळ्या आभाळाच्या डोळ्यातील जीवन गाणे
मुक्त संवाद

निळ्या निळ्या आभाळाच्या डोळ्यातील जीवन गाणे

बालकविता म्हणजे आईच्या कुशीतील सुंदर जिव्हाळ्याची मायाळू फुलं होय.’ इतकी तरल भावना ते बालकवितेविषयी बाळगतात. प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेल्या चित्रांनी या संग्रहाची गोडी आणखी वाढवली आहे. तर प्रसिद्ध कवी डॉ. दासू वैद्य यांनी मोजक्या शब्दांत या संग्रहाची पाठराखण करीत या कवितांचा गाभा सांगितलेला आहे.

– डॉ. विशाल तायडे
बालसाहित्यिक आणि लेखक
दूरभाष :९४२२२ १८१९८

कवी डॉ. हबीब भंडारे यांचा ‘निळे निळे आभाळाचे डोळे’ हा बालकुमार कवितांचा संग्रह वाचण्यात आला. उच्च निर्मिती मूल्य असलेल्या या कवितासंग्रहातील कविताही तितक्याच दर्जेदार आहेत. एकूण ४४ बालकुमार कविता या संग्रहात आहेत. खरं तर मोठ्यांसाठी कविता लिहीणारे कवी ही डॉ. भंडारे यांची ओळख आहे मात्र बालकवितेतही त्यांनी ठसा उमटविला आहे.

कवीवर बालपणापासून झालेल्या संस्कारांचे आणि त्यांना मिळालेल्या अनुभवांचे प्रतिबिंब या कवितांमध्ये दिसून येते. प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून काम करताना त्यांचा दररोज बालकांशी संबंध येतो. लहान मुलांच्या भावभावना त्यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळते. त्यातून त्यांची ही बालकुमार कविता फुलली आहे.

बालजीवनातील अतिशय साध्या साध्या प्रसंगांना कवीने आपल्या कवितांचा विषय केले आहे. विशेषतः स्वतः ग्रामीण भागात काम करीत असताना तेथील बालकांच्या भावभावनांनाही त्यांनी शब्दरूप दिलेले आहे.

‘ट्रिंग ट्रिंग सायकलवाला
पोरं भोवती झालीय गोळा,
लाल लाल बुढ्ढी के बाल
खाऊन होते तोंड लाल’

अशा गमतीदार रचनाही या संग्रहात आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या व्यथांकडेही कवी बालकाच्या नजरेतून बघताना या कवितांमधून दिसतो. जीवनाचे तत्वज्ञान किती साध्या-सोप्या पद्धतीने सांगता येते, हे पाहायचे असल्यास त्यांची

‘शेतशिवारातील सकाळ’ ही
कविता वाचायला हवी.
कवी म्हणतो की,

‘सुगरणीचे खोपे शिकवतात
जीवनाची कलाकुसरता,
सुख दिल्याने सुख वाढते
येते जगण्यात सुलभता.’

बालकवितेविषयी बोलताना कवी म्हणतात की, ‘बालकविता म्हणजे आईच्या कुशीतील सुंदर जिव्हाळ्याची मायाळू फुलं होय.’ इतकी तरल भावना ते बालकवितेविषयी बाळगतात. प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेल्या चित्रांनी या संग्रहाची गोडी आणखी वाढवली आहे. तर प्रसिद्ध कवी डॉ. दासू वैद्य यांनी मोजक्या शब्दांत या संग्रहाची पाठराखण करीत या कवितांचा गाभा सांगितलेला आहे.

ते म्हणतात की, ‘माणुसकीचं बाळकडू मुलांच्या मऊ मुलायम मातीत पेरु पाहणारी ही बालकविता नवी पायवाट तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे.’ छत्रपती संभाजीनगर येथील ‘कैलाश पब्लिकेशन्स’ यांनी हा देखणा बालकुमार कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.

पुस्तकाचे नाव – निळे निळे आभाळाचे डोळे – बालकविता संग्रह
कवी – हबीब भंडारे
प्रकाशक – कैलाश पब्लिकेशन्स , छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे – ६४ • मूल्य – १८०₹
पुस्तकांसाठी दूरभाष : ९३२५२१४१९१, ७५०७३२८३८३.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading