January 21, 2026
‘वाचनगंध’ हा प्रीती जगझाप यांचा बालचित्रकथासंग्रह मुलांमध्ये वाचनाची आवड, लेखनकौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करणारी प्रेरणादायी कथा सांगतो.
Home » वाचनसंस्कृती रुजवणारा बालचित्रकथासंग्रह – वाचनगंध
मुक्त संवाद

वाचनसंस्कृती रुजवणारा बालचित्रकथासंग्रह – वाचनगंध

प्रीती जगझाप या कृतिशील शिक्षिका मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व जाणून आहेत. बालवय संस्कारक्ष वय असते. या वयात कथेच्या माध्यमातून वाचन संस्कार पेरण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातून साकारलेले ‘वाचनगंध’ हे सुंदर पुस्तक आहे.

गुलाब बिसेन, गोंदिया
मो. नं. 9404235191

लेखिका कवयित्री प्रीती जगझाप यांचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रकाशित झालेले वाचनगंध हे सुरेख असे पुस्तक. बालवयातल्या संस्कारक्षम वयामध्ये मुलांना वाचन लेखनाची गोडी लागण्याची गोष्ट सांगणारे हे पुस्तक. संपूर्ण सचित्र असलेले हे पुस्तक वाचकाचे लक्ष वेधून घेते. या पुस्तकातून आपला अथर्व आणि आरोही ही गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी गोड जोडी भेटते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही जोडी आपल्या अभ्यासातील हुशारीने सर्वांच्या कौतुकास पात्र होते.

आरोही आणि अथर्व हे दोघे नुसते अभ्यासातच हुशार नाहीत तर ते आपल्या अंगातील विविध कलागुणांमुळेही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करतात. आरोहीला कुंचला आणि रंगांच्या सहाय्याने सुंदर चित्रे रेखाटायला आवडतात. वाचनाची प्रचंड आवड असणारा अथर्व आणि आरोहीच्या वाचनवेडाचा परिणाम शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर होऊन त्यांनाही वाचनाची गोडी लागते. संपूर्ण वर्ग वाचनात रंगून जातो. हळूहळू हा वाचनगंध शाळा आणि गाव कसा व्यापून टाकतो, याची ही गोष्ट.

प्रीती जगझाप या कृतिशील शिक्षिका मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व जाणून आहेत. बालवय संस्कारक्ष वय असते. या वयात कथेच्या माध्यमातून वाचन संस्कार पेरण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातून साकारलेले ‘वाचनगंध’ हे सुंदर पुस्तक आहे. अथर्व आणि आरोही या जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या गोड जोडीच्या माध्यमातून लेखिका प्रीती जगझाप यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेले अंगभूत गुण आणि शिक्षिकेचे सकारात्मक प्रयत्न यांची सांगड घालत ही कथा फुलवली आहे. या जोडीच्या माध्यमातून लेखिकेने अभ्यासक्रमातील स्त्री पुरुष समानता हे मूल्य साध्य केलेले आहे.

वाचनाची आवड असणारा अथर्व आणि आरोही यांच्या वाचन सवयीने शाळेतील इतर विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून संपूर्ण शाळाच वाचनाच्या आनंद लहरीत न्हाऊन निघते. त्याला जोड देत शाळेतील शिक्षिका ‘कोण बनेल वाचनवीर’ या नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देतात आणि शाळेत सुरू होतो एक अभूतपूर्व वाचन सोहळा. ‘वाचनगंध’ या पुस्तकाच्या रूपात हा वाचनसोहळा विद्यार्थ्यांना वाचनाकडून लेखनाकडे कसा घेऊन जातो याचा सुरेख प्रवास या कथेतून वाचताना वाचकाला वाचनाची प्रेरणा देवून जातो.

शाळेतील बाईंनी सुरू केलेला ‘कोण बनेल वाचनवीर’ हा नवोपक्रम शाळेमध्ये वाचनाचा मळा फुलवतोच. परंतु लेखनाच्या माध्यमातून बालमनातील भाव भावना कागदावर उतरवण्याची प्रेरणा देतो. यातून विद्यार्थी गोष्टी, गाणी, कविता लेखनाकडे वळतात. यातून स्वयं अध्ययन हे मूल्य साध्य होते.

शाळेत दरवळणारा हा वाचनगंध केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता नवर्निर्मीतीच्या नवनविन कळ्या फुलवतो. शाळेतील बाईंचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून कवितांची निर्मिती होऊ लागते. हळूहळू कवितांचे हस्तलिखीत तयार होते. हे हस्तलिखीत शाळा भेटीला आलेल्या अधिकार्‍यांना आवडते. त्यांच्या प्रेरणेतून मग विद्यार्थ्यांचा बालकवितासंग्रह प्रकाशित होतो. असा हा प्रेरणेतून लेखनाचा होणारा प्रवास बालमनाला सर्जनशील बनवणारा ठरतो.

एका शाळेत सुरू झालेला वाचनउत्सव हळूहळू संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतो. सर्व विद्यार्थी कविता वाचू लागतात. वाचता वाचता कविता लिहू लागतात. यातून बाईंच्या नवोपक्रमाची किर्तीही सर्वत्र पसरते. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या उपक्रमाची दखल घेऊन गावात वाचनालय उभारण्यासाठी निधी देतात. यातून सुरू होतो लहानांसोबत मोठ्यांचाही वाचनाचा सोहळा. वाचनालयामुळे हा वाचनगंध लहानांकडून मोठ्यांपर्यंत पोहचतो. गावातील लहान मोठे, स्त्री पुरुष सारेच वाचनाच्या उत्सवात सहभागी होतात.

कथेच्या माध्यमातून लेखिका प्रीती जगझाप यांनी वाचनामुळे होणारा आंतरबाह्य बदल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनालयात वृत्तपत्रांचे वाचन, पुस्तकांचे वाचन, अभ्यास करणे, कविता लिहिणे या गोष्टी घडत जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळण्याकडे होणारा हा प्रवास प्रेरणादायी आहे. वाचन महोत्सवात मंत्रीमहोदय आले असताना अथर्व आणि आरोही आपला बालकवितासंग्रह मंत्रीमहोदयांना भेट देतात. मंत्रीमहोदय परत जाताना बालकवितासंग्रह सोबत घेऊन जातात. हार तुरे मात्र तिथेच राहतात. त्यामुळे हारफुलांपेक्षा शब्दफुलांचा सुगंध अधिक दरवळतो. हा लेखिका प्रीती जगझाप यांनी या कथेतून दिलेला विचार खूप प्रेरणादायी आहे.

प्रीती जगझाप यांच्या लेखनीतून साकारलेली ही कथा वाचकाला कल्पनारम्य जगात गुंतवून न ठेवता वाचनाचे महत्त्व सहज पद्धतीने बिंबवण्याचा प्रयत्न करते. वाचनातून आयुष्याची शिदोरी देते. असे हे संपूर्ण सचित्र रंगीत असलेले पुस्तक बालकांना वाचनाची गोडी लावेल असा विश्वास आहे.

पुस्तकाचे नाव – वाचनगंध
लेखिका – प्रीती जगझाप
प्रकाशक – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥

उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सुक्ष्म निरीक्षणांनी भारलेले प्रवासवर्णन

भारताच्या लोकसंख्याशास्त्राचे प्राक्तन काय ?

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading