March 14, 2025
Are Women Truly Free and Safe Sarita Patils Womens Day Article
Home » खरंच स्त्रिया स्वतंत्र व सुरक्षित आहेत का ?
विशेष संपादकीय

खरंच स्त्रिया स्वतंत्र व सुरक्षित आहेत का ?

आंतरराष्ट्रीय महिला दिन अगदी जवळ आलाय आणि मनात विचार आला कि खरेच आज एकविसाव्या शतकात तरी महिला स्वतंत्र व सुरक्षित आहेत का ? कारण आता रोजच वर्तमान पत्र उघडले कि महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. बातम्या वाचून, दूरदर्शन वरील दृष्ये पाहून मन अगदी सुन्न होते, अश्या नराधमांचा  खूप राग येतो आणि डोक्यात विचारांचे काहूर माजते. असे वाटते कि समाजात अजुनही पुरुषप्रधान संस्कृतीची पाळेमुळे किती जखडलेली आहेत.

अॅड. सौ. सरीता पाटील (पंडित),
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे      

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील स्वारगेट येथील घटनेने  पुणे येथे या चार- पाच वर्षात गुन्हेगारी वृत्ती फोफावत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. पाठोपाठ जळगाव मध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची व तिच्या मैत्रीणीची  छेडछाड, त्याआधी मुंबईत अक्षया म्हात्रे हत्या, उरण येथे यशश्री शिंदे हत्या तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात, गावात दार महिन्याला बलात्कार, खून, हुंडाबळी अश्या घटना सातत्याने घडत असतात पण त्यामध्ये शिक्षा कितीजणांना होते ? यातून काय दिसते तर पुरुषांना महिला अजूनही अबलाच वाटते आणि त्यामुळे तिच्या  आवाजाचा गळा घोटला जातो. पुरुषी अहंकार अजून किती निष्पाप मुली व स्त्रियांचा बळी घेणार आहे व त्यांचा अहंकार कधी समूळ नष्ट होणार हे काळच ठरवेल.

आजकाल शाळेतल्या कोवळ्या मुली पण या पापी नजरेतून सुटलेल्या नाहीत. अजून कितीतरी मुली व स्त्रिया  समाज्याच्या लाजेसाठी तक्रार न करता निमुटपणे सहन करत असतात. अलीकडे अनेकांना नाते पण समजेनासे झाले आहे हे सर्व पाहून मन अगदी उद्विग्न होते व समाज किती अनैतिकेकडे चालला आहे हे स्पष्ट होत आहे. “शिवशाही” गाडीत बलात्कार होणे हि गोष्ट लांच्छनास्पद आहे आणि तेही ‘ताई’ म्हणून विश्वासघात करणाऱ्या नराधमाला शरम कसी वाटली नसेल?               

जोपर्यंत समाजातील किंबहुना पुरुषांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी नव्हे दृष्टीकोन बदलत नाही तोवर हे असेच घडत राहणार. शिवाय कायद्यांचे सर्वानीच कडक पालन केले पाहिजे. आज कित्येक क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत पण खरेच नोकरीच्या ठिकाणी किंवा घरी त्यांच्या मतांना किंमत दिली जाते का ? नोकरीच्या ठिकाणी  किंवा कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या स्त्रिया खरेच सुरक्षित आहेत का ? हा प्रश्न अनुत्तरीच आहे. गृहिणीला तर अगदी किरकोळ अपवाद सोडले तर नवरा आणि मुलांच्याकडून कायम गृहीतच धरले जाते. ती तिचे पूर्ण आयुष्य नवऱ्याचे आणि मुलांचे सर्व काही करण्यात खर्ची घालत असते. कितीही शिकली आणि कितीही कमवती असली तरी ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ हे तिला चुकलेले नाही हेच घरोघरी दिसत आहे.

काही पुरुष अभिमानाने सांगतात कि मी उठून पाण्याचा ग्लास सुद्धा घेत नाही किंवा खाल्लेले ताट उचलत नाही. दिवसभर कार्यालयात काम करुन येवून ती घरी आली कि लगेच पदर खोचून स्वयंपाकाला लागते. बऱ्याच घरांत उच्चशिक्षित स्त्रीलाही तिचा नवरा आपल्या स्वभावाच्या व विचारांच्या तालावर नाचायला लावतो व तिचे जीवन स्वतः नियंत्रित करत असतो. याला काय म्हणावे ? बरेच नवरे स्वतःच्याच मताने अख्खे आयुष्य तिला वागायला लावतात. सगळे काही माझ्याच मताने झाले पाहिजे असा काही नवऱ्यांचा अट्टाहास असतो.

नव्वदच्या दशकातील किंवा एकविसाव्या शतकातील ती नोकरी करणारी असो कि उच्चशिक्षित एकदाचे लग्न झाले कि तिचे सर्व आयुष्य नवऱ्याचे ऐकण्यातच जाते किंबहुना तिने ते तसेच घालवायचे असते असेच सामाजिक संकेत असतात. त्यामुळे नवरा कसाही वागला तरी तिने त्याची कधीही तक्रार न करता निमुटपणे सोसत राहायचे असा सामाजिक अलिखित नियम प्रमाण मानून घरासाठी, मुलांसाठी अहोरात्र कष्ट करत असते. त्यातून ती एकत्र कुटुंबात असेल तर तिचे जगणे अधिकच कठीण होऊन जाते.

अजूनही खेड्यांतून मुलग्यालाच जास्त महत्व दिले जाते. खेड्यांमध्ये कितीतरी पुरुष, तरुण मुले काहीही कामधंदा न करता केवळ पुरुष म्हणून बसून खातात. त्या घरातील म्हातारी आई काम करत असते पण तरुण मुलगा, नातू, तिला मदत करत नाही आणि ती आई सुद्धा त्याचीच बाजू घेऊन त्याना  प्रोत्साहन देत असते. त्यामुळे कितीही स्त्रिया सक्षम बनल्या तरी गाव-खेड्यातून स्त्रीलाच कमी लेखले जाते.

असेच काही दिवसांपूर्वी एक उच्चशिक्षित स्त्री म्हणाली कि रोज-रोज आम्हीच किती जेवण, चहा नवऱ्याच्या हातात द्यायचा आम्हाला कधीतरी हातात चहा मिळावा असे वाटते त्यावर तिच्या खेड्यातल्या अडाणी  सासूबाई बोलल्या कि पुरुष बायकांना कधी देत नसतात बायकांनीच सगळे पुढे होऊन करायचे असते यावर ती स्त्री काय बोलणार ?

अजून एक माझ्या पाहण्यातील उदाहरण  म्हणजे एका उच्चशिक्षित, चांगला पगार असणाऱ्या स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या अकाली मृत्युनंतर तिच्या मुलाचे सगळे ऐकून घ्यावे लागते तो प्रत्येक गोष्टीत आपल्या आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या आईला त्याच्या तालावर नाचवतो म्हणजे  पिढ्यानपिढ्या पुरुषावर असे संस्कार होत असतात कि बायका म्हणजे “कीस झाड की पत्ती”. त्यामुळे बायकांनी, आयांनी वेळीच सावध होऊन अश्या नवऱ्यांना, मुलांना मर्यादेत ठेवले पाहिजे नाहीतर बायकांच्या कमकुवत पणाचा समाजात, कार्यालयात, घराघरात गैरफायदा घेतला जातो.    

प्रतिष्ठेसाठी सून, बायको उच्चशिक्षित पाहिजे पण तीने आपली मते न मांडता तिला नाही पटले तरी निमुटपणे ऐकणारी सून व पत्नी हवी असते. मग एखादीला नाही पटले आणि आपले विचार ठामपणे मांडले कि ती बंडखोर ठरते किंवा आगाऊ ठरते. बरे काही झाले आणि तिने माहेरी तक्रार केली तरी माहेरची म्हणावी तशी तिला साथ मिळत नसते त्यामुळे तिला कोणाचाच आधार मिळत नाही. माहेरी मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हणून बालपणापासून ती दुसऱ्या घरी जाणार म्हणून तिला स्वातंत्र्य नसते आणि लग्न झाल्यावर सासरी तिला सून , बायको म्हणून आपली  ठाम मते मांडता येत नाहीत. त्यामुळे तिची परिस्थिती ‘ना घाट की ना घर की’ अशी होते.  

शाळेमध्ये, महाविद्यालयात शिकवलेले स्त्रियांचे अधिकार, कायदे कागदावरच राहतात प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडत असते. आता काळ झपाट्याने बदलला आहे. मुलींना आर्थिक स्वातंत्र्याबरोबर वैचारिक स्वातंत्र्याची जाणीव झाली आहे. आतापर्यंत अनेक स्त्रियांनी हे सहन केलंय पण आताच्या मुली हे सहन करत नाहीत त्यामुळे घराघरातील परिस्थिती थोडी-थोडी का होईना सुधारत आहे.  ही जमेची गोष्ट.

एकीकडे आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्त बऱ्याच कर्तृत्वान स्त्रियांचा गौरव होत असताना. स्त्रीजातीचा उदोउदो होत असताना काही निष्पाप मुली, स्त्रिया नराधमांच्या अत्याचाराला बळी पाडत आहेत हे खूप क्लेशदायक आहे. समाजातील या वाईट गोष्टी कायमच्या उखडून टाकण्यासाठी सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत असे मला वाटते. चांगले संस्कार कोवळ्या वयात केले तर नराचा ‘नारायण’ होतो व नाही केले तर नराचा ‘वानर’ होतो नाही का?        

हे सर्वांनीच करायला हवे

१) पहिले तर सरकारने  राज्याराज्यात शक्ती कायदा सुधारणेसह  अंमलात आणला पाहिजे.
२) बलात्काराच्या घटना अतिजलद कोर्टात चालवल्या पाहिजेत                
३) मुलगा- मुलगी समान वागणूक घराघरातून लहानपणापासून दिली पाहीजे                   
४) विशेषतः मुलांना आईवडिलांनी मुलींचा, स्त्रियांचा आदर करण्यास शिवाय घरात तसेच बाहेर कोणत्याही स्त्रीकडे किंवा मुलीकडे वाकड्या नजरेने न बघण्याची कडक ताकीद दिली पाहिजे.
५) स्त्रीकडे ‘मादी’ म्हणून नव्हे तर माणूस म्हणून पाहिले पाहिजे.
६) नवरा म्हणून मुलांसमोर लहानपणापासून बायकोला आदराने वागवले पाहिजे कारण मुले अनुकरणीय असतात.            

                               


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading