आकाशात १७ ला लिओनिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी
कोल्हापूर – खगोलप्रेमींसाठी एक खास पर्वणी येत आहे. १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सिंह राशीतील मघा नक्षत्रात ‘लिओनिड’ उल्कावर्षाव पहायला मिळणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे.
उल्का वर्षाव पाहण्यासाठी शहराच्या बाहेर जाऊन निरीक्षण केल्यास उल्कावर्षाव चांगला दिसून येईल असे डॉ. व्हटकर यांनी सांगितले. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवतीच्या भ्रमणात दर वर्षी ‘५५पी टेंपल टटल’ या धूमकेतूच्या मार्गातून जाते तेव्हा या धूमकेतूच्या मार्गात असलेले धूलिकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचले जातात. हे धूलिकण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा वातावरणातील हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे जळून जातात. त्यामुळे उल्कांची प्रकाशित रेषा आपणास दिसते. हे धूलिकण ७५ ते १०० किलोमीटर उंचीवर दर सेकंदास ७२ किलोमीटर या वेगाने वातावरणात शिरतात.
या वर्षी आकाशात चंद्रप्रकाशाचा अडथळा येणार आहे. तरीही तासाला १०-१५ उल्का सिंह राशीतून पडतांना दिसतील अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.