प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असते. भौतिक सुखाच्या वस्तूत आणि ऐशआरामात लोळणाऱ्या लोकांनाही कोरोना काळानं शिकवलं की आपलं भावनिक सुख हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते आपण चांगल्या वाचनातून मिळवू शकतो. ती वाचण्याची प्रेरणा आवडलं ते निवडलं हे पुस्तक देतं.
दयासागर बन्ने सांगली
अबीरगुलाल उधळत आयसीओच्या काचेतून आरपार पाहणारा डोळस कवी म्हणून आपण सांगलीच्या कवी अभिजीत पाटील यांच्याकडे पाहतो. कोरोना काळात रुग्णांना वाचवण्याबरोबरच त्यांना भावनिक आणि मानसिक आधार देणे गरजेचे होते. तो आधार देत त्यांना आवडलेल्या कवितेतून त्याच्या विश्लेषणातून आणि उत्तम रसग्रहणातून ते समाजमाध्यमात व्यक्त होत राहिले. त्याचं पुस्तक सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत घुले यांनी आपल्या शब्दशिवार प्रकाशनामार्फत प्रकाशित केलं. ज्याचं नावच आहे ‘आवडलं ते निवडलं’
प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असते. भौतिक सुखाच्या वस्तूत आणि ऐशआरामात लोळणाऱ्या लोकांनाही कोरोना काळानं शिकवलं की आपलं भावनिक सुख हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते आपण चांगल्या वाचनातून मिळवू शकतो. ती वाचण्याची प्रेरणा आवडलं ते निवडलं हे पुस्तक देतं. कविता-रती या नियतकालिकाच्या पंचवीस वर्षे पूर्ततेनंतर कवितारती ने मराठीतील आघाडीच्या कविता संपादित करून काव्यमुद्रा नावाने प्रकाशित केला. त्यातील आवडलेल्या चाळीस कवितांचे रसग्रहण कवी अभिजीत पाटील यांनी त्यांच्या या पुस्तकातून केले आहे.
या निवडलेल्या कवितांतून आपला प्रेमाचा, निसर्गाचा, भोवतालाचा, गावपणाचा, नात्यांचा, स्वतःबद्दलचा, सोबत्यांबद्दलचा, कवी कवितेबद्दलचा समकालीन दृष्टिकोन विकसित होतो. प्रथितयश कवींच्याबरोबरच कविता रतीत प्रकाशित झालेल्या कविता अभिजीत पाटील यांना आवडल्या. त्या आपल्याही हृदय पटलावर निवडण्यास भाग पाडण्यासाठी अभिजीत यांचे रसग्रहण आपणास मार्गदर्शक ठरते. हे रसग्रहण सुलभ जितके आहे, तितकेच आस्वादक आणि साहित्यिक मूल्य ठरवणारे ही आहे.
कवी, कवितांबद्दल असणाऱ्या कवितांचे विश्लेषण करताना अभिजीत पाटील यांनी लिहिलेले आहे की, कलावंतांच्या गुढ व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितेतून करावा, त्यांच्या शोधवाटेवरची कविता ही आपल्याला जबाबदारीचे भान देते.
निसर्ग कवितांच्या बद्दलचे भान जपताना अभिजीत पाटील यांनी नैसर्गिक कृतीचे गूज मांडणाऱ्या कवितांचे आश्वासक चित्र शब्दातून मांडले आहे. नात्यांच्या बद्दल बोलताना आई बाप पत्नी आणि स्वबद्दलची ऋणानुबंधांची नाती घट्ट केली आहेत. वर्तमानाविषयी आणि अस्वस्थ भोवतालाबद्दल स्वतःचे प्रांजळ मत व्यक्त केले आहे. माणसं सहज विकली जाण्याच्या काळात सत्य मांडण्याची ताकत ज्या शब्दांच्याकडे असते ते शब्द फितूर होऊन चालणार नाहीत असे या पुस्तकातून आपणास कळते.
अभिजीत पाटील यांनी केलेले कवितांबद्दलचे भाष्य चिंतनशील आहे. या चिंतनातून समीक्षेचा एक नवा प्रवाह त्यांना सापडेल आणि ते या क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करतील. प्रत्येकाला काही नवं आवडावं आणि ते त्यांनी निवडून आपलं जीवन आनंददायी आणि भाषिक समृद्ध करावं. असा समर्थ प्रत्यय देणारा हा संग्रह आपल्या प्रत्येकाच्या जवळ हवाच.
पुस्तकाचे नाव – आवडलं ते निवडलं (कवितासंग्रह)
कवी – अभिजित पाटील
प्रकाशक – इंद्रजित घुले, शब्दशिवार प्रकाशन, सांगली
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.