चित्रपटासाठी गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करा : नाईक
शिवाजी विद्यापीठात ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ कार्यशाळेला प्रतिसाद
कोल्हापूर : चित्रपट निर्मिती म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायला शिकवणारी कला आहे. ही कला आत्मसात करायची असेल तर गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ निमति, दिग्दर्शक सुनील नाईक यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभाग व पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी नाईक बोलत होते. डॉ. प्रसाद ठाकूर व डॉ. सुमेधा साळुंखे आदी उपस्थित होते. दिग्दर्शक नाईक म्हणाले, कलेचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरातूनच मराठी चित्रपटाची निर्मिती व चित्रपट सृष्टीशी निगडित सेन्सॉरसह अनेक बाबींची सुरुवात झाली. चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा एक सक्षम उद्योग आहे. कोणत्याही विषयावरील चित्रपट तयार करण्यासाठी लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, कॅमेरा साऊंड, संकलन याबाबी आवश्यक असतात.
चित्रपट आणि नाटकाविषयी सखोल माहिती देत त्यांनी उपस्थितांना स्क्रिप्ट देऊन त्यावर अभिनय व चित्रीकरणाचे प्रशिक्षण दिले. स्क्रिप्ट टू स्क्रीन ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीकडे वळण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नाईक यांनी उत्तरे दिली. डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविकातून मास कम्युनिकेशन व पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासन केंद्राच्या वतीने सुरू असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात १२ वी नंतर बी. ए. इन फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रसाद ठाकूर यांनी दिग्दर्शक सुनील नाईक यांच्या कार्याचा परिचय करून दिला. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.