२० डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजन
कणकवली – कोकणातील परिवर्तन साहित्यिकांना जोडून घेऊन त्यांना हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेच्या दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली येथे संस्थेच्या झालेल्या बैठकीत एकमताने संमेलनाच्या अध्यक्षपदी कांडर यांची निवड करण्यात आली तसेच सदर संमेलन शनिवार २० डिसेंबर रोजी कणकवली नगर वाचनालय येथे दु.३.३० वा. आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी दिली.
दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला संस्था कार्यवाह सूर्यकांत साळुंके, उपाध्यक्ष संदीप हरी कदम, कोषाध्यक्ष नेहा कदम, इतर पदाधिकारी संतोष कदम,धम्मपाल बाविस्कर,शशिकांत तांबे, सत्यवान साटम, रीना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्य रसिकांना संमेलनात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सम्यक संबोधी साहित्य संस्था कोकणात विविध महत्त्वपूर्ण साहित्यिक कार्यक्रम आयोजित करते.यावर्षी बाबूराव बागुल पुरस्कार कथा स्पर्धा आणि नामदेव ढसाळ पुरस्कार काव्य स्पर्धा घेतली. त्याला महाराष्ट्रातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या परिवर्तन विचाराला चालना देणाऱ्या साहित्यिकाची या दुसऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर यावेळी झालेल्या चर्चेत कोकणात परिवर्तन विचाराने सगळ्यांना सोबत घेऊन गेली ३५ वर्षे निष्ठेने साहित्य काम करणाऱ्या मराठीतील आजचे आघाडीचे कवी असलेल्या अजय कांडर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अजय कांडर हे 90 नंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे मराठी कवितेतील नाव असून त्यांचे चार कवितासंग्रह बहुचर्चित झाले आहेत. 12 विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आणि एका शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश झाला असून हिंदी, इंग्रजी, उर्दू, मल्याळम, कानडी, पंजाबी, गुजराती आदी भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. तर कोकण बरोबर महाराष्ट्रातील आपल्याबरोबरच्या साहित्यिकांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी मुंबई इचलकरंजी कोकण आदी भागात सांस्कृतिक कामाचे महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. असं अपवादात्मक दुर्मिळ काम करणाऱ्या कवी अजय कांडर यांची सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही आमच्या संस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना असल्याचेही शेवटी संस्था अध्यक्ष किशोर कदम यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
