रानभाज्या या खऱ्या तर आरोग्याचा खजिना असतात. ‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत कवळी..
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते,
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
मो. क्र. 9403464101
स्थानिक नावे – सफेस मुसळी, कोळू, कोवळी, फोडशी
इंग्रजी नाव – इंडियन स्पायडर प्लंट, Indian Spider Plant
हिंदी नाव – मुसली, सफेद मुसली, ढोली मुसली
शास्त्रीय नाव – Chlorophytum borivilianum (क्लोरोफायटम बोरिव्हिलियनम)
ही पावसाळ्यात उगवणारी एक महत्त्वपूर्ण रानभाजी आहे. महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, ही भाजी तिच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखली जाते. कवळी भाजी साधारणपणे पावसाळा सुरू झाल्यानंतर आठ ते दोन आठवड्यांच्या आत डोंगराळ भागात किंवा शेतात आपोआप उगवते. ही भाजी शिजवून खाण्यासाठी योग्य असते. अनेक घरांमध्ये कुलदेवतेच्या पूजेनंतर ही भाजी देवाला नैवेद्य म्हणूनही अर्पण केली जाते. कवळीची पाने लांबट आणि पन्हट स्वरूपाची असतात. या भाजीला बाजारातही चांगली मागणी असते, कारण ती सहज उपलब्ध नसते आणि तिच्यातील औषधी गुणधर्मांमुळे लोक ती आवर्जून खरेदी करतात.
ही केवळ एक रानभाजी नसून, ती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तिच्या विविध भागांचा उपयोग पारंपरिक औषधोपचारात केला जातो. कवळीच्या मुळांना अनमोल औषधी गुणधर्म असल्याने बाजारात त्यांना मोठी मागणी असते. साधारण पावसाळ्यात सुरुवातीच्या पंधरा दिवसांत कवळीची भाजी जंगलात उगवते. या भाजीच्या मुळाला सफेद मुसळी असेही संबोधले जाते. ही मुसळी अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरली आहे. कवळीच्या मुळामध्ये ‘सॅपोनिन्स’ हा उत्तेजक घटक असतो, ज्याचा उपयोग शक्तिवर्धक, टॉनिक म्हणून केला जातो.
कवळीच्या मुळांचा उपयोग कावीळ, दमा, लघवीची जळजळ, अतिसार आणि पोटदुखी यांसारख्या आजारांवर केला जातो. हे गुणधर्म तिला एक प्रभावी औषधी वनस्पती बनवतात. ही भाजी लहान मुलांना दूध पचनासाठी आणि दूधवाढीसाठी उपयुक्त आहे, असे मानले जाते. त्यामुळे ज्या मातांना दूध कमी येत असेल, त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरू शकते.
शुक्रजंतुपोषक आणि मधुमेही लोकांसाठी गुणकारी मानली जाते. तिच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. कवळी भाजी ही केवळ एक चवदार रानभाजी नसून, ती अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. निसर्गाने दिलेल्या या देणगीचा योग्य वापर करून आपण अनेक आरोग्य समस्यांवर मात करू शकतो. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे, कवळी भाजीला आपल्या आहारात आणि पारंपरिक औषधोपचारात एक महत्त्वाचे स्थान आहे.
पाककृती –
फोडशीची कोवळी पान वेगळी करावी. माती साफ करावी. कडक पान, सुकलेला पान काढून टाका.
भाजी ला दोनदा पाण्यातून धुवून चिरून घ्या.
2 चमचे तेल, बारीक चिरलेला 1 कांदा घाला
यात लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि भिजवलेली छान डाळ घालून भाजी परतून घ्या 5 मिनिटे.
यात भाजी घाला व चवी पुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून भाजी डाळ शिजे पयंत झाकून ठेवा.
5-7 मिनिटानंतर डाळ शिजली की खोबरं घालून वाफवून घ्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.