August 16, 2025
भुईआवळा (Phyllanthus Niruri) ही औषधी रानभाजी आहे. याचे औषधी गुणधर्म, पारंपरिक उपयोग, कावीळ, मूत्रपिंड, मधुमेह व यकृतविकारांवरील फायदे व भाजी करण्याच्या पाककृती जाणून घ्या.
Home » आजीची भाजी रानभाजी – भुईआवळा
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – भुईआवळा

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे भुईआवळा..

प्रशांत सातपुते.
माहिती जनसंपर्क अधिकारी
94034 64101

शास्त्रीय नाव – Phyllanthus niruri
हिन्दी : भुंई आमला, भूआमलकी, हजारदाना, जरमाला, जंगली आंवला

भुई आवळा ही औषधी वनस्पती रस्त्याच्या कडेला, बागेत, पडीक जागेत किंवा शेतात आढळते. ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या वनस्पतीची ताजी पाने काढून ती पाण्यात मिसळून वस्त्रगाळ केलेला रस उचकी लागल्यास व कफ झाल्यास देतात. पारंपारिक औषधोपचारात या वनस्पतीचा मूत्रपिंडाच्या वृद्धीसाठी, शरीर शुद्ध करण्यासाठी, मूत्रमार्गाशी, जननमार्गाशी निगडीत व्याधीवर व मधुमेहावर वापर केला जातो. या वनस्पतीचा वापर शक्तीवर्धक म्हणून व ज्वर निर्मूलनाबरोबरच मलेरिया मध्येही वापरतात.

भुईआवळा वनस्पतीत फायलॅनथीन नावाचे द्रव्य आहे. काविळ झाल्यास भुईआवळा वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात. यकृतवृध्दी व प्लीहावृध्दी कमी करण्यास याचा वापर करतात. या वनस्पतीमुळे लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मूतखडा, जंतूसंसर्ग आदी विकारांतही या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो. भुईआवळ्याची भाजी आंबट असून, या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. कावीळमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे दिसून आले आहे. रक्तदाबवृध्दी, चक्कर येणे या आजारातही ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.

कढईत तेल घेऊन त्यामध्ये फोडणीसाठी लसूण परतावा. मोहरी, हिंग घालून फोडणी घ्यावी. आधी स्वच्छ केलेली भाजी व अर्धी वाटी तूर, मसूर किंवा मुगडाळ कुकरमध्ये शिजवून घोटून घ्यावी. त्यात डाळीचे पिठ लावावे. नंतर ती भाजी फोडणीत घालावी. हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचे कुट, थोडासा गुळ आणि चवीपुरते मीठ घालून भाजी शिजवावी. दुसऱ्या कृतीमध्ये स्वच्छ धुवून भाजी बारीक करुन घ्यावी. तेलात कांदा, लसूण, हिरवी मिरची परतून घ्यावी. चिरलेली भाजी घालून चांगली परतून घ्यावी. त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading