या पुस्तकाची निर्मिती करण्यापूर्वी गायकवाड द्वयींनी आदिवासींचे जीवन जाणून घेतले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांच्या जीवनातील समस्या आणि उपाय जगासमोर मांडले पाहिजेत या विचारधारेतून त्यांनी हा प्रयत्न केलेला दिसतो. स्वातंत्र्याच्या एवढ्या दिवसानंतरही आदिवासी जमात आज भारताच्या नकाशावर कुठे आहे? कशी जगते याचे परीक्षण व्हायला हवे असे त्यांना वाटले. त्याच चिंतनातून अतिशय अभ्यासपूर्वक, आखीव रेखीव, वास्तवदर्शी विचारातून हे पुस्तक आकारास आलेले आहे.
साहित्यिक डॉ. नरसिंग कदम,
सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
९४०४७३१०१०
सोमनाथ गायकवाड आणि यादव गायकवाड यांनी ‘आदिवासी समाज : अभ्यास आव्हाने आणि वाटचाल’ या पुस्तकाचे संपादन केले आहे. हे पुस्तक म्हणजे आदिवासी समाजाच्या अंतर्मनाचा वेध आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांच्या जोखडातून मुक्ती मिळाली. त्यावेळी भारतातील माणसाने खूप स्वप्न रंगवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जीवनाचा आयाम खूप बदललेला असेल असे त्यांना वाटले. पण अल्पावधीतच त्यांच्या स्वप्नांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. कुणीतरी टाचणी मारून त्यातली हवा काढावी अशी अवस्था झाली. या परिस्थितीला पाहिल्यानंतर इंग्रजच बरे होते की काय ? असे तरंग मनात तरळू लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतातील अनेक भाग त्या त्या भागातील सत्ताधिशाच्या अधिपत्याखाली होताच. त्यांना त्यातून बाहेर पडायला अनेक दिवस संघर्ष करावा लागला. यासाठी अनेक क्रांती उभ्या राहिल्या. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे संबंध भारतावर स्वातंत्र्याची पहाट उगवली.
अखेर प्रत्येक परिसर पारतंत्र्यातून मुक्त झाला. साखळदंड निखळून पडले. सुखाचे काही दिवस जातात तोपर्यंतच पुन्हा सुरू झाला आपुलाचि वाद आपणासी. या वादामध्ये जात, धर्म, पंथ, ज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचे फास अजगराच्या विळख्या प्रमाणे गळ्याभोवती आवळले जाऊ लागले. अनेक समाजसेवकांनी या फासातून मुक्त करण्यासाठी लढे उभे केले. सोयी सुविधाच्या झळा जास्तीत जास्त खेड्याला बसल्या. त्याचे कारण शिक्षणाचा अभाव आणि ज्ञानाची गंगा त्यांच्या दारापर्यंत न पोहोचणे. आपल्याला दोन प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असते. एक म्हणजे जगण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जगायचं कसं हे शिकण्यासाठी. त्यामुळे येथील मानसे सर्वप्रथम जगायला शिकली. त्यानंतर जगायचं कशासाठी हे कळायला लागलं. हे कळण्यासाठी अनेक पिढ्यांना दुःखभोग भोगावे लागले. त्यानंतर बदलाचे, प्रगतीचे वारे वाहू लागले ते त्यांच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले.
बदलाचे वारे खेड्यापर्यंत गेले. त्याचे कारण महात्मा गांधीजींनी दिलेली ‘खेड्याकडे चला’ ही हाक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य. समाजसेवकांनी उभे केलेले लढे. यामुळे हा परिसर बदलला. पण हे बदलाचे वारे आदिवासीपर्यंत गेलेच नाही. यापासून ते कोसोदूर राहिले. स्वातंत्र्य कशाला म्हणतात. याचा लवलेशही त्यांना शिवला नव्हता. आज स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाली, दळणवळणाची साधने आली, माहिती तंत्रज्ञानाचे युग आले पण आदिवासी आहेत तिथेच आहेत. भारतीय संविधानाने मानवतावादी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले असले तरी येथील आदिवासींना त्यांच्या मूलभूत हक्कापर्यंत पोहोचूच दिले नाही. त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले. विषमतावादी विचारधारेने चालणाऱ्या मानसिकतेत लोकशाही मूल्य अजूनही रुजली नाहीत. नव्हे तर ती रुजू दिली नाहीत. त्यामुळे आदिवासी समाज यापासून मैलो दूर राहिला.
आदिवासी समाज नैसर्गिक अधिवासात राहणारा. वनस्पती आणि प्राणी यावर अपार प्रेम, श्रद्धा बाळगून जगणारा. अन्न, वस्त्र, निवारा, औषध आणि विधी समारंभासाठी वनस्पती व प्राण्यावर अवलंबून राहणारा आहे. परंतु त्यांच्या अधिवासावर जेव्हा हल्ले व्हायला लागले तेव्हा त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. प्रगतीच्या नावाखाली स्वार्थापोटी माणसांनी निसर्गावरच हल्ले सुरू केले. कारखानदारी, सुधारणेच्या नावाखाली जंगलतोड सुरू केली. त्यामुळेच नैसर्गिक अधिवासातील प्राणी मानव वस्तीवर हल्ले करू लागले. मग आदिवासी तर माणसे होती. त्यांनी करायचे काय ? मग त्यांच्या अधिवासाचा, शिक्षणाचा, संस्कृतीचा प्रश्न निर्माण झाला. जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही शोधले जातात आणि त्याच मार्गाने आदिवासी समाज जाऊ लागला. परंतु परिवर्तन, बदल हे सहजासहजी शक्य नसते. ते पचनी पडत नसते. यातून द्विधा मनस्थिती तयार होते. आदिवासींच्या या सगळ्या जीवनपद्धतीचा अभ्यास, चिंतन, मंथन संपादक द्वयींनी या पुस्तकातून केलेले दिसून येते.
हजारो वर्षे या भूमीत राहिलेला समाज आपल्या स्वतंत्र खुणा घेऊन जगतो. ते खूप प्राचीन असल्यामुळे ते तेथील मूळ रहिवासी. भारतामध्ये जवळपास ३६० जमातीत आदिवासी विभागलेला आहे. महाराष्ट्रातील ४० आदिवासी जमातींना अनुसूचित जमाती म्हणून सरकारने मान्यता दिली. यांचा स्वतंत्र भूभाग आहे, भाषा, आचार, विचार आहे. जंगलच त्यांचे विश्व आहे. त्यांच्यात सर्व काही मौखिक पद्धतीने चालते. त्यांना ना कोर्ट ना शाळा. जात पंचायत ही त्यांची न्याय देवता. न्यायदेवतेचे नियम ठरलेले. तेथेच न्यायनिवाडे. त्यांचा नियम त्यांना शिरसावंद्य असायचा. त्यांच्या अर्थव्यवस्थेत पैशाचे चलन नसते. फक्त वस्तूंची देवाण घेवाण. ते शब्द प्रामाण्यवादी असतात. शिकार, मासेमारी करणे, पशुपालन, शेती हेच प्रमुख व्यवसाय. संगीत, लोकनृत्य, अंगाई गीते, प्रीती गीते, युद्ध गीते, भजने हे त्यांचे छंद. प्रासंगीक गीते, कोळी गीते, धार्मिक गीते, स्त्री गीते, बोध गीते, म्हणी, उखाणे हे परंपरेने वाहत आलेली. याची जोपासना करत जीवन जगणारी जमात. शिक्षणामुळे हळूहळू प्रवाहात यायला लागली. यासाठी अनेकांनी हात दिला. त्यातलेच काही अधिकारी, काही नोकरदार, काही राजकीय, काही समाजसेवक, काही आमदार, खासदार, काही मंत्री बनले. आज त्यातलेच एक नाव म्हणजे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हे होय.
या संपादनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या जीवनपद्धतीला, कार्याला उजाळा देण्याचे कार्य केले. कोणत्याही गोष्टीला इतिहास असतो. तो इतिहास सर्वांसमोर गेला पाहिजे, कळला पाहिजे. याचा प्रयत्न गायकवाड यांनी केला. कारण परिवर्तन ही जगाची रहाटी आहे. ते परिवर्तन गायकवाड चिंततात. सर्वांसमोर आदिवासींचे जीवन मांडावे, संघर्ष, व्यथा, वेदना मांडाव्यात. त्यांच्यात झालेले परिवर्तन, त्यांना गरज असलेल्या मदतीची अपेक्षा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळणे या विचारधारा मनात बाळगून संबंधित पुस्तकाची निर्मिती झालेली दिसते. अशा ज्वलंत विषयावरील लेखन होणे काळाची गरज आहे. हीच गरज गायकवाड यांनी ओळखली असे म्हणावे लागेल. त्याचीच परिपूर्ती म्हणजे त्यांचे हे पुस्तक होय.
यामधून आदिवासींची जीवनशैली आणि पर्यावरणाशी नाते, आदिवासींची लोकगीते, त्यांच्यापुढील आव्हाने, संस्कृती, कथा, मिथके, रूढी, विधी, आरोग्य, पोषण, शिक्षण, स्त्री भूमिका, लोकनृत्य, कायदे, लोकदेवता, चळवळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, जयपाल सिंह मुंडा सारखे अनेकांचे योगदान, विविध जाती, उपजाती आदीवर चिंतन आणि मंथन केलेले आहे. या पुस्तकाची निर्मिती करण्यापूर्वी गायकवाड द्वयींनी आदिवासींचे जीवन जाणून घेतले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांच्या जीवनातील समस्या आणि उपाय जगासमोर मांडले पाहिजेत या विचारधारेतून त्यांनी हा प्रयत्न केलेला दिसतो. स्वातंत्र्याच्या एवढ्या दिवसानंतरही आदिवासी जमात आज भारताच्या नकाशावर कुठे आहे? कशी जगते याचे परीक्षण व्हायला हवे असे त्यांना वाटले. त्याच चिंतनातून अतिशय अभ्यासपूर्वक, आखीव रेखीव, वास्तवदर्शी विचारातून हे पुस्तक आकारास आलेले आहे.
अनेक जन आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढले, लढत आहेत. आदिवासी हा शब्द १९३० च्या दशकात राजकीय कार्यकर्त्याकडून वापरण्यात आला. तोच आदिवासी भारताचा अविभाज्य घटक आहे. ज्याला आपण वनात राहत असल्यामुळे वनवासी म्हटले. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण दिले. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि नागरी सुविधांची तरतूद करून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आदिवासी बांधवांसाठी वसतीगृहे, आश्रमशाळा व शिष्यवृत्ती सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली. नवी पिढी शिक्षणाकडे वळल्यामुळे अस्तित्वाची जाणीव झाली. शासनाने आरोग्य व इतर सुविधाचा लाभ दिल्यामुळे परिवर्तनाचे वारे त्यांच्या भागामध्ये वाहू लागले. भौगोलिक आणि सामाजिक अडचणी पार करून ते सुखाचे चार घास खाऊ लागले. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, समान संधी मिळवून देण्यासाठी शासनातर्फे, समाजसेवक साहित्यिकांनी जनजागृती केली. त्याच कार्याला या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य संपादक द्वयींनी केले. त्यांनी केलेला हा प्रयत्न खूप कौतुकास्पद म्हणावा लागेल.
भूमी आणि निर्सगाचा समृद्ध वारसा लाभलेल्या आदिवासी समूहाकडे
अभिजनांच्या सांस्कृतिक अधिसत्तेने कायमच रोमँटिकपणे पाहिले आहे. त्यामुळे आदिवासींचे मूळ जगणे खरेतर समाजपटलावर अद्यापही आलेले नाही. विकासाच्या आधुनिक प्रारूपामुळे आदिवासींच्या वाट्याला आलेले विस्थापन ही खूप गंभीर गोष्ट आहे. ज्यांचे अस्तित्वच मुळात जंगल आणि तत्सम नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहे, त्या समूहाला त्याच्याच मूळ अधिवासातून हद्दपार केले गेले आहे. आदिवासी संस्कृती आणि साहित्याला स्वतंत्र अस्तित्व असूनही त्यांच्या अभिव्यक्तीची पुरेशा गांभीर्याने नोंद घेतली गेलेली नाही. आदिवासींची एकूणच जीवन पद्धती स्वतंत्र आहे. शिवाय भाषिक वेगळेपणही आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संरचनेत आदिवासींच्या कलेलाही खूप महत्त्व आहे. म्हणूनच आदिवासींच्या संस्कृतीला, प्रथा-परंपरांना समजून घेण्याच्या व्यापक भूमिकेतून श्री. सोमनाथ गायकवाड आणि श्री. यादव गायकवाड या संपादक द्वयीने 'आदिवासी समाज : अभ्यास आव्हाने आणि वाटचाल' या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ आदिवासी समाज संस्कृतीच्या अनेक मितींचा वेध घेतो. आदिवासींच्या ऐतिहासिक परंपरा, त्यांचे धार्मिकजीवन, लोकपरंपरा, लोकदैवते, उपासना पद्धती, सण-लोकोत्सव, तत्त्वज्ञान, भौतिक सृष्टीचे आकलन, सामाजिक दर्जासह त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक स्थितीगतीचे आणि संविधानातील हक्कांच्या तरतुदींचे व्यापक आरेखन या संपादनात करण्यात आहे. एवढेच नव्हे तर आदिमतेचे काळानुरूप होत गेलेले विकसनही यातून समजून घेता येते. हा आंतरविद्याशाखीय ग्रंथ असल्यामुळे त्याची उपयुक्तता मोठी आहे. बहुतेक सर्वच अभ्यासकांनी वेगवेगळ्या पैलूंवर लेख लिहिले आहेत. या लेखनाच्या मागे प्रत्येक अभ्यासकाची निश्चित अशी भूमिका आहे. हे संपादन आदिवासी जाणिवेचा एक महत्त्वाचा इतिहास आहे. अभ्यासक या ग्रंथाचे नक्कीच स्वागत करतील.
पी. विठ्ठल
पुस्तकाचे नाव – आदिवासी समाजः अभ्यास, आव्हाने आणि वाटचाल
संपादक – सोमनाथ गायकवाड, गायकवाड यादव कामाजी
प्रकाशक – न्यू व्हिजन, नाशिक
किंमत – ५०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
