आजि ध्यानसंपत्ती लागी । तूंचि एकू आथिला जगी ।
हें परमभाग्य आंगी । विरंचीही नाहीं ।। 622 ।। अध्याय 11 वा
ओवीचा अर्थ – आज ध्यानरुप संपत्तीकरिता जगांत तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही.
ध्यानामध्ये अनुभुती येते. हे भाग्य एखाद्यालाच सद्गुरुकृपेने भेटते. सद्गुरु हजारो शिष्यांना अनुग्रह देतात. पण प्रत्येक शिष्याला लाभ मात्र वेगवेगळा मिळतो. जो जे वांछिल तो ते लाहो ज्याला जे हवे ते त्याला मिळावे असे पसायदान अर्थात प्रसाद माऊलीने सद्गुरुंकडे मागितला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याला त्याचे फळ मिळत असते. ध्यानामध्ये कोणाला अनुभुती येते. कोणाला स्वप्नातून अनुभुती येते. हाताची पाचही बोटे सारखी नाहीत. तशी प्रत्येक माणसाची विचारसरणी ही भिन्न आहे. प्रत्येकाची इच्छाही वेगवेगळी असते. कोणाला नोकरीत प्रमोशन हवे असते. तर कोणाला अमाप संपत्ती हवी असते तर कोणाला सुख समाधान हवे असते. प्रत्येकाची साधना एकच आहे पण विचारामुळे फळ मिळते. मनाची शांती मिळावी यासाठी जो प्रयत्न करतो. सद्गुरुकृपेने त्याला ते फळ प्राप्त होते. विश्वरुप दर्शन हे अर्जुनाला झाले.
संजयालाही झाले पण अर्जुनासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले. हे भाग्य केवळ अर्जुनालाच मिळाले. अन्य व्यक्तीला याचा लाभ झाला नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा वेगळी असते त्यानुसार त्याला लाभ मिळतो. सद्गुरुकृपेने हा लाभ होतो. सद्गुरु हजारोंना अनुग्रहीत करतात पण एखादाच आत्मज्ञानाचा लाभार्थी होतो. परंपरा पुढे नेणारा एखाद-दुसराच असतो. हे भाग्य सद्गुरुकृपेने लाभावे यासाठी ध्यानधारणा आहे. ध्यानरुपी संपत्तीचा हकदार होण्यासाठी नित्यनेमाने साधना करायला हवी. कारण त्या हजारोमधील लाभार्थी आपणही असू शकतो. हाच भाव मनात ठेऊन साधना करायला हवी. ते मिळणार नाही असा नकारार्थी विचार सोडून द्यायला हवा.
सकारात्मक विचारानेच अध्यात्मिक प्रगती होत राहाते. प्रत्येकाला होणारा लाभ वेगळा आहे. यासाठी आपल्या समाधानासाठी तो लाभ मिळतो. म्हणून ध्यानधारणा नित्य करायला हवी. ध्यानरुपीसंपत्तीचा लाभ, ध्यानाची अनुभुती यावी यासाठी अवधान ठेऊन प्रत्येकाने आपले प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. ते परमभाग्य आपणाला निश्चित मिळेल असा विश्वास मनात ठेऊन वाटचाल करायला हवी. तरच अध्यात्मिक प्रगती होईल.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी सहभागी फेसबुक ग्रुपवर लिंकवर क्लिक करून
https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy/
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.