कोल्हापूर – येथील राजारामपुरीमधील व्ही. टी. पाटील स्मृतीभवनामध्ये ०१ मार्च २०२५ रोजी ‘मिलेट (तृणधान्य) व फळ महोत्सव’ २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहिर केलेले होते. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने ०१ ते ०५ मार्च, २०२५ या कालावधीमध्ये ‘मिलेट व फळ महोत्सव – २०२५ चे ‘व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या मिलेट व फळ महोत्सवाचे उद्धघाटन शनिवारी (०१ मार्च २०२५ रोजी) सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल फुलारी, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, एस. कार्तिकेन, महेंद्र पंडीत, संजय कदम, विनायक कोकरे, महेश कदम, निळकंठ करे, उमेश पाटील, जालिंदर पांगारे हे उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियेमध्ये काम करणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या व सांगली जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये ४० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असुन, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासुन तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपुर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने व द्राक्षे थेट उत्पादकांकडुन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
मिलेट महोत्सवामध्ये ०१ ते ०५ मार्च २०२५ या कालावधीत मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व या विषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृति स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास करवीर वासियांनी उपस्थित राहुन मिलेट व फळ महोत्सवास भेट देण्याचे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.