नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आज नामस्मरणाची, मनाच्या एकाग्रता साधन्याची खरी गरज आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
नामाचिया सहस्त्रवरी । नावा इया अवधारी ।
सजूनिया संसारी । तारू जाहलो ।। ९० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – माझी हजारो नावे ह्याच कोणी नावा त्या तयार करून संसारसागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज.
भगवंताला आपलेसे कसे करायचे ? नामामध्ये ते सामर्थ्य आहे. नाम जपातून तो आपला होतो. यासाठीच अखंड हरिनामाचा जप सांगितला जातो. भगवंत आपलासा व्हावा असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. यासाठी भक्ती केली जाते. विठ्ठल नामाचा जप केला जातो. कितीही कामात असो. अखंड त्याचा जप करणारे भक्त पाहायला मिळतात. अशा भक्तांसाठी भगवंत काहीही करायला तयार होतात. विशेष म्हणजे ही कामे करताना भगवंतांना लाजही वाटत नाही. कामे करताना त्याला कमीपणाही वाटत नाही. कारण ती त्याच्या सख्याच्या, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताची कामे असतात.
भक्ताच्या भक्तीपोटी, प्रेमापोटी भगवंत त्याला मदत करतात. संत गोरा कुंभाराच्या घरी तो कधी माती मळतो तर कधी मडकी घडवतो. कोणा भक्ताच्या घरी तो पाणी भरतो. तर कुणाच्या जात्यावर तो दळप दळतो. ही कामे तो भक्तांसाठी करतो. भगवंतांनी आपली कामे करावीत इतकी आपली भक्ती श्रेष्ठ असायला हवी. इतकी आस आपल्या भक्तीत असायला हवी. इतके सामर्थ्य आपल्या जपामध्ये असायला हवे. संताच्या जपामध्ये तितके सामर्थ्य होते. तितकी आस, आपुलकी होती. तितकी भक्ती होती. तितकी एकाग्रता होती. नामातूनच त्यांनी मुक्ती मिळवली. संसारसागरातून भगवंतांनी त्यांना बाहेर काढले.
नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आज नामस्मरणाची, मनाच्या एकाग्रता साधन्याची खरी गरज आहे. सतत नामस्मरणात राहील्याने मनात येणारे वाईट विचार आपोआपच नाहीसे होतात. नामामुळे सकारात्मक विचार वाढून प्रगती साधली जाते. यासाठी नामस्मरण हे आवश्यक आहे. पूर्वीचे संत हे यासाठीच सतत नामस्मरण करत असत.
खरे तर अखंड नाम सुरुच असते. फक्त आपले अवधान त्यावर नसते. अवधान साधता यायला हवे. श्वास अन् श्वास सोहमच्या नादात मिसळायला हवा. तो स्वर कानांनी ऐकायला हवा. या नामाच्या नावेतूनच आत्मज्ञानाचा तीर गाठायचा आहे. या नामाच्या नावेचा नावाडी स्वयं भगवंत आहे. स्वयं सद्गुरु आहेत. ते आत्मज्ञानाच्या तीरावर आपणास सोडून आपणाला संसाराच्या या सागरातून मुक्त करणार आहेत. यासाठी नामाची नाव आपण पकडायला हवी. या नावेत बसायला हवे. बाकी सद्गुरु पाहतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.