December 12, 2025
A collage showing the evolution of mobile phones from early bulky models to modern smartphones with 5G and satellite technology.
Home » भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल !
संशोधन आणि तंत्रज्ञान

भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल !

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे शिकवण्यात येते. अन्न, हवा आणि पाणी या प्रत्यक्षात आपल्या मूलभूत गरजा आहेत. आज या गरजामध्ये नव्या ज्या वस्तूची भर पडली, ती म्हणजे भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल. मोबाईल सुरू होत नसला, बंद पडला किंवा हरवला तर माणूस दुर्धर रोगाने आजारी पडल्याचे समजल्यावर जितका अस्वस्थ होतो, त्यापेक्षा जास्त अस्वस्थ होतो. मोबाईलने आपले आयुष्य बदलले. कॅमेरा, घड्याळ यांचे महत्त्वच संपवून टाकले. माणसाचे जगणे मोबाईलशी जोडले गेले. मानवी स्वभावावरसुद्धा प्रभाव टाकणारे हे उपकरण माणसाचा वेळ खाणारे साधन बनले.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मोबाईलचा इतिहास सुरू होतो, तो विनावाहक संदेशवहनापासून अर्थात वायरलेस टेक्नॉलॉजीपासून. १९०८ मध्ये प्रा. अल्बर्ट जान यांच्यासह ओकलँड ट्रांसकॉन्टिनेंटल एरियल टेलिफोन आणि पॉवर कंपनीने सर्वप्रथम वायरलेस फोन बनवल्याचा दावा केला. पुढे हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे उघड झाले आणि त्यांचा दावाही फोल ठरला. पुढे १९१७ मध्ये एरिक टायगरस्टेटनी खिशात बसेल अशा मोबाईलसाठीचे पेंटंट दाखल केले आणि मिळवलेही. वर्षभरातच जर्मनीमध्ये बर्लीन आणि झोसन या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेसाठी अशा प्रकारच्या भ्रमणध्वनीची चाचणी घेण्यात आली. १९२४ मध्ये बर्लीन आणि हम्बर्ग या दरम्यान असेच संदेशवहन करण्यात आले. १९२५ मध्ये रेल्वेसाठी अशी संदेशवहन सेवा पुरवण्यासाठी झुकटेलिफोन कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढच्या काही वर्षांतच ही सेवा आणि रेल्वे यांचे अतूट नाते निर्माण झाले.

मोबाईलच्या विकासात दृष्ट्या लेखक आणि कलाकारांनीही मोठे योगदान दिले. १९०६ मध्ये लेवीस बौमर यांनी ‘पंच’ नियतकालिकामध्ये पुरूष आणि स्त्री दूर अंतरावरून मोबाईलवर बोलतानाचे व्यंगचित्र प्रकाशित केले. तर १९१९ मध्ये व्यंगचित्रकार डब्ल्यू.के. हसेल्डन ‘दि पॉकेट टेलिफोन: व्हेन विल इट रिंग?’ प्रकाशित केले. १९२३ मध्ये इलिया इरेनबर्ग यांनी आपल्या ‘थर्टिन पाईप्स’ कथेत मोबाईल फोनचे चित्र रंगवले होते. १९२६ मध्ये कार्ल अर्नोल्ड यांनी मोबाईल फोनसंदर्भात ‘दि स्ट्रीट’मध्ये ‘वायरलेस टेलिफोनी’ हे व्यंगचित्र प्रकाशित केले. १९६४ मध्ये डिक ट्रेसी त्याहीपुढे गेले आणि त्यांनी अणूऊर्जा वापरणारे मोबाईलचे वर्णन केले.

दुसऱ्या महायुद्धात वायरलेस टेक्नॉलॉजीचा प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. हातात घेऊन वापरता येतील असे वायरलेस हँडसेटस १९४० मध्ये उपलब्ध झाले. त्यापूर्वीच्या उपकरणांचे वजन जास्त होते. त्यांना मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागत असे. तसेच त्या प्रणालीमध्ये असणाऱ्या उपकरणांशीच संवाद होत असे. १७ जून १९४६ मध्ये अमेरिकेने वाहनातून संवाद साधता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन सुरू केले. त्यानंतर लगेचच एटी अँड टी बेल कंपनीने मोबाईल टेलिफोन सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. तसे तंत्रज्ञान विकासाचे, कंपनीचे कार्य १९४० मध्येच सुरू झाले होते. शहरातील ठराविक भागात ही सेवा उपलब्ध असे. ही सेवा ॲनालॉग तंत्रावर आधारित असल्याने, ती वारंवारिता धारण करणारे उपकरण ज्याच्याजवळ असेल, अशी कोणतीही व्यक्ती संभाषण ऐकू शकत असे. १९५६ मध्ये स्वीडनमध्ये वाहनात वापरता येतील, असे मोबाईल वापरण्यास सुरुवात झाली. १९७९ मध्ये जपानमध्ये ठराविक भागात अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

आज वापरात असलेल्या मोबाईल तंत्रज्ञानाकडे खऱ्या अर्थाने पाऊल पडले ते १९७३ मध्ये. मिलिकॉम इनकॉर्पोरेशनच्या इ.एफ. जॉन्सन यांनी पहिले सेल्युलर नेटवर्क वापरून मोबाईल फोन तयार केले. स्वीडनमध्ये यांचा वापर १९८१ मध्ये सुरू झाला. त्याचवेळी मोटोरोला कंपनीचे मार्टीन कुपर या तंत्रज्ञानावर कार्य करत होते. कुपर यांच्या संशोधनावर १९७३ मध्ये मोटोरोला कंपनीची मोबाईल सेवा सुरू झाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी एटी अँड टी बेल कंपनीतील जोएल एंजेल यांच्याशी पहिले संभाषण झाले. या फोनचे वजन दोन किलो होते. हा फोन प्रभारित करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागत असे. एवढा वेळ चार्जींग केल्यानंतर ३० मिनिटे संभाषण करता येत असे. मात्र यांचा व्यावसायिक वापर सुरू झाला नव्हता. मोटोरोलाचे प्रमुख जॉन मिशेल यांना वजनाने हलके, सहज हाताळता येतील असे मोबाईल बनवायचे होते. त्यांनी सर्व संशोधन यावर केंद्रीत केले आणि मोटोरोलाने सुरुवातीला मोबाईल विश्व व्यापले.

संदेशवहनासाठी या क्षेत्राचे महत्त्व ओळखून या क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या. यातील पहिल्या पिढीतील मोबाईल फोन ॲनालॉग तंत्रावर आधारित होते. यांना एक-जी मोबाईल फोन म्हणतात. जपानमध्ये १९७९ मध्ये असे फोन तयार झाले. अमेरिकेमध्ये असे मोबाईल १९८३ मध्ये वापरात आले. १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियातील पाच ग्राहकांसह ही सेवा कार्यान्वीत झाली. यानंतर मोबाईल व्यवसायामध्ये मोठी क्रांती झाली. या फोनच्या चार्जींगलाही दहा तासांपेक्षा जास्त वेळ लागत असे. लोकांना कमी वेळात प्रभारित होणारे आणि जास्त वेळ बोलता येणारे फोन हवे होते.

लोकांची गरज ओळखून १९९० मध्ये युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेत दुसऱ्या पिढीचे (२जी) मोबाईल विकसित झाले. या पिढीत डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यात आले. या काळात प्रि-पेड सुविधा सुरू झाली. त्याचवेळी बेल प्रयोगशाळेतील जेस रसेल आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी स्वामित्त्व हक्कासाठी अर्ज दाखल केले. हे अर्ज अनेक वर्षे प्रलंबीत होते कारण हे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत होते. त्यांच्या तंत्रज्ञानाचा आधार घेत नोकिया आणि मोटोरोलाने आपले फोन विकसित केले. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या वारंवारितेपेक्षा जास्त वारंवारिता युरोपमध्ये वापरत. १९९३ मध्ये आयबीएम या क्षेत्रात उतरली. मोबाईल अनेकांपर्यंत पोहोचले. आता लोकांच्या मागणीप्रमाणे त्यात सुधारणा करणे गरजेचे बनले. यातूनच २००० मध्ये तिसऱ्या पिढीचे मोबाईल विकसित झाले. यामध्ये इंटरनेट सुविधाही उपलब्ध झाली. मोबाईल, घड्याळ, गणक अशी विविध सुविधा आल्या. अँड्रॉइड तंत्राने तर कमाल केली, गुगल मोबाईलमध्ये आले आणि वेगवेगळी ॲप, मनोरंजनाची साधने मोबाईलमध्ये आली. मोबाईल बहुपयोगी उपकरण बनले. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत २००९ मध्ये चवथ्या पिढीचे मोबाईल आले. इंटरनेटच्या गतीसाठी तंत्रज्ञान असणारे पाचव्या पिढीचे मोबाईल २०१९ मध्ये आले.

आता पाचव्या पिढीचे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सातव्या पिढीच्या मोबाईलची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे जगाचे स्वंयघोषीत त्राता एलॉन मस्क यांनी उपग्रह मोबाईल अर्थात सॅटेलाईट मोबाईलचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. मोबाईलने जग जवळ नव्हे तर खिशात आणि हातात आणले असताना माणसांना मात्र दूर केले, प्रत्यक्ष भेटणेच कमी झाले. मोबाईलने माणसाचे विश्व व्यापून टाकले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading