October 25, 2025
शनिवारवाड्यात दोन मुस्लिम महिलांनी नमाज पढल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच पुण्यात राजकीय वादंग पेटला. खासदार मेधा कुलकर्णी यांनी मजारी हटविण्याची मागणी केली.
Home » शनिवारवाड्यातील नमाज…
सत्ता संघर्ष

शनिवारवाड्यातील नमाज…

मुंबई कॉलिंग –

दोन मुस्लिम महिलांनी नमाज पढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मेधा कुलकर्णींनी थेट शनिवारवाडा गाठून आंदोलन केले. मजारी हटविण्याची मागणी केली. या मजारीची नोंद १९३६ च्या दस्तऐवजात आहे, मग मेधा कुलकर्णी तिला अनधिकृत कोणत्या आधारावर ठरवतात, असा रूपाली ठोंबरेंचा सवाल आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

गेल्या पंचवीस वर्षात पुणे वेगाने बदलले. दर्जेदार उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचे मोठे जाळे या महानगरात आहे. लहान-मोठ्या उद्योगांनी पुण्याला वेढलेले आहे. अनेक आयटी हब या शहरात उभे राहिले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांची गर्दी झाली. शिक्षणासाठी व रोजगारासाठी हजारो परप्रांतीयांचे लोंढे गेल्या दोन दशकांपासून पुण्यावर आदळू लागलेत. पेशव्यांचे पुणे आता पुस्तकात शोधावे लागते. मराठा साम्राज्य आणि पेशव्यांची वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिवारवाड्यात जाऊन दोन मुस्लिम बुरखाधारी महिलांनी नमाज पढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुण्यात राजकीय पक्षांना एकमेकांवर हल्ले चढविण्यासाठी नवे शस्त्र मिळाले. हिंदु मुस्लिम तेढ निर्माण केली जात असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. विशेष म्हणजे राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमधेच शनिवारवाड्यातील नमाजावरून जुंपली असल्याचे बघायला मिळाले. ऐन दिवाळीत उद्धव ठाकरेंची उबाठा सेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींवर तुटून पडले होते. राजकीय पक्षांच्या दंगलीत पुणेकर बिचारे शांत राहिले. मग शनिवारवाड्यातील नमाजावर राजकीय पक्ष रान का पेटवत होते ?

शनिवारवाडा ही मराठा साम्राज्याची शान आहे. पेशव्यांच्या यशाची घोडदौड आणि अस्त या वास्तुने पाहिला आहे. शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते. नमाज पढल्यावरून आणि तिथे असलेल्या मजारीवरून राजकीय पक्षातील वाद विकोपाला गेला आहे. तिथे असलेल्या कबरीवर हजरत ख्वाजा सैयद शाह पीर मकबुल हुसेरी पीर असा फलक दिसतो. पण ही कबर कधी बांधली, कोणी बांधली यासंबंधीच काहीच माहिती मिळत नाही. याच शनिवारवाड्यात मस्तानी राहिली होती. अधिकृत कबर हटवा अशी मागणी मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यानी व पतित पावन संघटनेने केली आहे.

मेधा कुलकर्णी या भाजपच्या धाडसी लोकप्रतिनिधी आहेत. नगरसेवक, आमदार आणि आता खासदार असा त्यांचा प्रवास आहे. विधानसभेला त्यांचे तिकीट कापून पक्षाने कोल्हापुरच्या चंद्रकांतदादा पाटील यांना दिले तेव्हा पुण्यात भाजपमधे असंतोषाला तोंड फुटले होते. नंतर भरपाई म्हणून पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मेधा कुलकर्णी या नेहमीच हिंदुत्वाचा अजेंडा जिद्दीने राबवताना दिसतात. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना स्वत:च्या भाजपसह विरोधी पक्षात अनेक राजकीय शत्रू निर्माण झाले आहेत. शनिवारवाड्यातील नमाजावरून वादंग पेटले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा ) च्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे, उबाठा सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या त्यांच्यावर तुटून पडल्याच पण शिवसेना ( शिंदे ) नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंनीही घरचा आहेर दिला.

दोन मुस्लिम महिलांनी नमाज पढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मेधा कुलकर्णींनी थेट शनिवारवाडा गाठून आंदोलन केले. मजारी हटविण्याची मागणी केली. या मजारीची नोंद १९३६ च्या दस्तऐवजात आहे, मग मेधा कुलकर्णी तिला अनधिकृत कोणत्या आधारावर ठरवतात, असा रूपाली ठोंबरेंचा सवाल आहे. भाजपचा मुस्लिम विरोध सर्वांना ठाऊक आहे. पण मेधा यांना खोटे ठरविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा सेनेने चंग बांधलाय. मेधाताईंचा राजकीय स्टंट आहे, नौटंकी आहे, हिंदु मुस्लिम यांच्यात त्या तेढ निर्माण करीत आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या विरोधकांनी केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने तर मेधा कुलकर्णींची अक्कल काढली, शिक्षिका असून कसे कळत नाही, त्यांची पदवी तपासायला हवी अशी मागणी केली. मेधांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी बुरखाधारी महिलांनी नमाज पढला, त्या जागेवर गोमुत्र शिंपून ती जागा शेणाने सारवून घेतली. तिथे भगवा झेंडा लावावा असा आग्रह धरला. नंतर पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले व छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या लाल महालात जाऊन मेधाताईंनी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन केले.

याच शनिवारवाड्यात मस्तानी राहात असे, तिथे किती वेळा नमाज पढला गेला असेल याची गिनती करता येणार नाही, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. शनिवारवाड्यात नमाजाला बंदी असेल व कबर अनधिकृत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या खासदार असलेल्या मेधाताईंनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा पुरातत्व विाभागाकडे तक्रार द्यायला हवी होती हे निलम गोऱ्हे यांचे म्हणणे रास्त आहे. मुळात नमाजाचा व्हिडिओ कधीचा आहे, त्यात नेमके कोण आहे हे स्पष्ट झालेले नाही. सारस बागेतील नमाजानंतर आता शनिवारवाड्यातील नमाजाने पुण्यातील राजकारण ढव‌ळून निघाले आहे. हाजी अलीला जाऊन कोणी हनुमान चालिसा वाचला तर चालेल का ? असा मार्मिक प्रश्न मंत्री नितेश राणेंनी विचारलाय. शनिवारवाडा नमाजावरून राजकीय रण पेटले असताना राजकीय पक्षांचे प्रमुख दिवाळीत फराळ खाण्यात व्यस्त होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading