कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सविस्तर विकास आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण कामाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पर्यटन मार्गदर्शक डॉ. अमर अडके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आदी उपस्थित होते.
शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण करताना त्यांच्या मुळ सौंदर्याला कुठेही बाधा येवू नये यााप्रमाणे सविस्तर कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना देवून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, पावसाळ्यामध्ये पाण्याचा योग्य निचरा होईल यासाठी ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात यावी. पावसाळ्यानंतर तलावातील पाणी खराब होवू नये याासाठी पाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविण्यासाठी आराखड्यात समावेश करावा. तलावातील पाण्यावर कारंजे बसविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेवून याबाबत यंत्रणांनी नियोजन करावे, असे सांगून सुशोभीरणाासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.
आमदार चंद्रदीप नरके व पर्यटन मार्गदर्शक डॉ. अमर अडके यांनी सुशोभिकरण विकास आराखडा व निधी प्रस्तावाबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. बांधकाम विभागाने सुशोभीकरणाबाबतचा नकाशा यावेळी सादर केला.
गगनबावडा पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा- -जिल्हाधिकारी अमोल येडगे
गगनबावडा पर्यटन तालुका म्हणून विकसित केला जाणार आहे. पर्यटन तालुका विकसीत करण्यासाठी पर्यटकांना सोयी- सुविधांची आवश्यकता आहे. पर्यटन वाढीसाठी तालुक्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे विकसीत करणे गरजेचे आहे, याासठी ग्राम, तालुका व जिल्हा पर्यटन समित्यांच्या माध्यमातून कामे करण्यात येतील. पर्यटनस्थळे विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील सल्लागारांची नियुक्ती करुन पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा अशा सूचना, जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.
गगनबावडा तालुक्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे विकसीत करुन पर्यटनला चालना देण्यासाठी प्राथमिक सोई-सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, पर्यटन विकासाबाबत स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे,असे सांगून जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, गगनबावडा तालुक्यातील बोरबेट, मोरजाई परिसर, कोदे तलाव परिसर, लखमापूर कुंभी धरण, गगनगिरी गड, पळसंबे रामलिंग देवस्थान या प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास आराखडा तयार तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात यावी. तालुक्यातील ट्रेकींग पाँईंट निश्चित करण्यात यावेत. धरण क्षेत्राच्या ठिकाणी वॉटर स्पोटर्स, वॉटर गेम्स, होमस्टे यासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखड्यात समावेश करावा. लवकरच पावसाळा सुरु होणार असून पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक येतील याचेही नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गगनबावडा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषीत करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पर्यटन मार्गदर्शक डॉ. अमर अडके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, गगनबावड्याचे तहसीलदार बी.जी.गोरे, गट विकास अधिकारी अलमा सय्यद आदी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.