August 22, 2025
Map showing Powar community migration from Malwa to Vidarbha and evolution of Powari language
Home » पोवारीचा घाट मालवी तर थाट नागपूरी
मुक्त संवाद

पोवारीचा घाट मालवी तर थाट नागपूरी

पोवारी बोली
इ. स. १६९१ ते १७७५ या कालावधीत मालवातून (मध्यप्रदेश) विदर्भात मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेल्या पोवार (पंवार) समाजासोबत पोवारी बोली महाराष्ट्रात आली. त्यामुळे हिंदीची उपभाषा असलेल्या या बोलीवर हिंदी, मालवी, राजस्थानी, गुजराती, बघेली, मरारी, बुंदेली सोबतच मराठीचा प्रभाव दिसून येतो. विदर्भातील दिर्घकालीन वास्तव्यामुळे पोवारी बोलीचा मूळ तोंडवळा बदलून गेला आहे. तिचा घाट जरी मालवी असला तरी थाट मात्र नागपूरी आहे.

गुलाब बिसेन
मो. नं. 9404235191
इमेल – gulab0506@gmail.com

पोवारी बोली महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला असलेल्या भंडारा, गोंदिया आणि लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट आणि सिवनी जिल्ह्यांत बोलली जाते. एकेकाळी आपल्या तलवारीने रणांगण गाजवणार्‍या पोवार सरदारांनी गोंड राजा बख्त बुलंदशहा यांच्या विनंतीवरून विदर्भात येत औरंजेबाच्या सैन्याचा बंदोबस्त केला. पुढे मराठा सैन्यात (नागपूरकर भोसले) कटकपर्यंत धडक देत पराक्रम गाजवला. त्यानंतरच्या काळात हातात नांगर धरत शेतीसोबत नोकरी आणि व्यवसायात रमलेल्या पोवार (पंवार) समाजाची ही ‘पोवारी’ बोली आहे. पोवारी बोली पोवार समाजाची बोली असली तरी दिर्घकाळापासून पोवार समाजाच्या संपर्कात असलेल्या इतर जाती धर्माचे लोकही पोवारी बोली बोलतात.

इ. स. १६९१ ते १७७५ या कालावधीत मालवातून (मध्यप्रदेश) विदर्भात मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेल्या पोवार (पंवार) समाजासोबत पोवारी बोली महाराष्ट्रात आली. त्यामुळे हिंदीची उपभाषा असलेल्या या बोलीवर हिंदी, मालवी, राजस्थानी, गुजराती, बघेली, मरारी, बुंदेली सोबतच मराठीचा प्रभाव दिसून येतो. विदर्भातील दिर्घकालीन वास्तव्यामुळे पोवारी बोलीचा मूळ तोंडवळा बदलून गेला आहे. तिचा घाट जरी मालवी असला तरी थाट मात्र नागपूरी आहे. मराठीच्या संपर्कात असल्यामुळे या भागातील झाडीबोलीतील शब्दांसह पोवारी समृद्ध झाली आहे.

अलीकडे इंग्रजीच्या प्रभावामुळे अनेक इंग्रजी शब्दही पोवारी बोलीचे रूप घेऊन नांदताना दिसत आहेत. उदा. गिलास (ग्लास), इस्कूल (स्कूल), टावेल(टॉवेल), बाटल (बॉटल), ठेसन (स्टेशन) इत्यादी. असे असले तरी पोवारी बोली आपले वेगळेपण टिकवून आहे. याचा प्रत्यय आपल्याला अस्सल पोवारी बोलीतील शब्दांवरून येते. उदा. गदुल्या (दंगा/मस्ती करणे), नोन (मीठ), इंधारो (अंधार), भेली (गूळ), कथळी (वाकळ), पच्या (धोतर), टुरा – टुरी (मुलगा- मुलगी), दलखा (खड्डा), भुम्सारो (पहाट), फतई (बनियान), सांदोडी (छोटी गल्ली) इ. शब्द हे पोवारी बोलीचा अस्सल ऐवज आहेत.

पोवारी बोली ही वाक्प्रचार, म्हणी, लोकगीते, जात्यावरच्या ओव्या, विवाहगीते यांनी समृद्ध आहे. यातील विवाहगीते आजही पारंपारीक पद्धतीने लग्नसमारंभात गायली जातात. विवाह समारंभात लग्न लागल्यानंतर वधूचे आई – वडील वधू – वराचे दूधाने पाय धुतात. त्यावेळी गायले जाणारे हे गीत-
‘धरतरी मायकी दुबारी
कपिला गायको दूध
पिताकं खांदपर पच्याकी घडी
मायकं हातमा दूधकी झारी
पाय का धोयीता राधेशाम बाप
हात थुलथुला कापं
दूध का सोडीता सेवागन माय
नवसुत्री पनाव दाटं’
म्हणजे धरतीमातेकडून घेतलेली दुर्वा आणि कपिला गायीचे दूध घेतलेल्या वधूपित्याच्या खांद्यावर धोतराची घडी आहे. आईच्या हातात दुधाचा लोटा आहे. अशावेळी लेक आणि जावयाचे पाय धुताना वडिलांचे हात थरथरत आहेत. लोट्यातील दूध सोडताना आईचे मातृत्वप्रेम दाटून येत आहे. लग्न होऊन मुलगी सासरी चालली. यावेळी वधू मातापित्याच्या मनाची झालेली अवस्था या गीतातून व्यक्त झाली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे पोवारी अनुवाद जयपालसिंह पटले यांनी केले आहे. त्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अस्सल पोवारीमध्ये बघा.
गाव रस्ता, बेहेर अना घर ।
गायवाडा कोठा ठेवनं सुंदर ।।
जागा जागा पर मुत्रीघर
नाली बी बनाय लेनं ॥७०।। (अध्याय-१३, ओवी-७०)

रस्ता दुही बाजूला सबन् ।
वृक्षारोपन करन् ।।
बीच बीचमा ढोला ठेवन् ।
कचरा काड़ी डाकन ला ।। ७१।।(अध्याय – १३, ओवी -७१)
म्हणजे गावातील रस्ते, विहिरी, घरे, जनावरांचा गोठा स्वच्छ, सुंदर ठेवावे. जागोजागी मुतार्‍या आणि रस्त्याकडेला नाल्या बांधाव्यात. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे. मध्ये मध्ये कचरा टाकायला कचराकुंड्या ठेवाव्यात. असा राष्ट्रसंतांचा हा संदेश आहे.

पोवारी बोली बोलायला मृदू आणि ऐक‌णार्‍याला आपलेसे करून घेणारी मायाळू बोली आहे. पोवारी बोलीचा गोडवा पोवारी बोलताना त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या म्हणी आणि वाक्प्रचारांनी अधिकच वाढला आहे. भाषिक व्यवहारात आणि लिखाणात म्हणी आणि वाक्प्रचारांचा होणारा अर्थपूर्ण वापर पोवारी बोलीचे सौंदर्य खुलवतो.

आता काही म्हणी आणि वाक्प्रचार आपण बघूया –

नविन वस्तू घरात येताच जुन्या वस्तूचा विसर पडून तिला अडगळीत टाकली जाते किंवा तिला कमी लेखले जाते. यासाठी पोवारीत जी म्हण वापरली जाते, ती खूपच अर्थपूर्ण आणि समर्पक अशी आहे. ‘जूनीला लगी रुनी, नविनला पडदूनी’. मराठीतील ‘खाण तशी माती या अर्थाची पोवारी म्हण पाहा- ‘माय तशी बेटी, ना गहू तसी रोटी’. लग्न जोडताना पूर्ण माहीती काढूनच लग्न जोडावेत, या अर्थाची पोवारी म्हण -‘बइल लेनं मुलकी, टुरी मांगनं कुलकी’ अशी आहे. अशा असंख्य वाक्प्रचार आणि म्हणींनी पोवारी बोली समृद्ध आहे.

माझ्या एका कथेतील हा नवरा आणि बायको यांच्यातील संवाद बघा –
“आमला कोन सांगसे बाई बंगडी भरन. अजकालकं बहुबयदीनला सांगनो नही पडं. दुय च्यार डजन लेयस्यान ठेवंसेत बंगडी. आमला कोन सांगसे गा बंगडी भरन.” बडी भरेव गरोलक बोलन बसी.
“अवो, पर तोला कोनं अडाईतीस का कयेव बंगडी भरन? का पैसा नोहता तोरोजवर? अना नयीबी रह्या रयेत पैसा तं दुय रोज उधार ठेय सकत होती ना कचारीन.” बडो बोलेव. अशा ठसठशीत संवादाने नटलेली पोवारी बोली मनाशी मनाची नाळ जोडणारी आहे.

भारत सरकारच्या भाषा सर्वेक्षणात पोवारी ही हिंदीची उपभाषा म्हणून गणली गेली आहे. महाराष्ट्रात वैनगंगेच्या खोर्‍यात आल्यावर पोवारी बोली आपला तोंडवळा बदलत प्रवाही झाली. पोवारी बोलीची ध्वनीव्यवस्था ही अधिकांश हिंदी भाषेप्रमाणे आहे. पोवारी बोलीमध्ये ‘ळ’ हा ध्वनी नाही. त्यामुळे मराठीतील ‘ळ’ चा ‘र’ करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे ‘काळी’ची ‘कारी’ आणि ‘मोळी’ची ‘मोरी’ होते. काहीवेळेला ‘ळ’ चा ‘ड’ देखील होताना दिसून येतो. पोवारी बोलीमध्ये ‘श’ हा ध्वनी नाही. त्यामुळे ‘श’ चा ‘स’ करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे ‘शेंग’ चा ‘सेंग’ ‘शेळी’ चा ‘सेरी’ होते. पोवारीमध्ये शब्दाच्या सुरूवातीच्या ‘व’ चा ‘ब’ होतो. उदा. वडेगाव – बडेगाव, वात – बात, वजन – बजन, विरसी – बिरसी इत्यादी. पोवारी बोलीत ‘ण’ हा ध्वनी नसल्याने ‘बाण’ चा ‘बान’ बनतो तर ‘वेणी’ ची ‘बेनी’ बनते. शब्दाच्या सुरूवातीच्या ‘ए’ आणि ‘ओ’ या स्वरांत ‘य’ आणि ‘व’ असा बदल होतो. त्यामुळे ‘एक’ चा ‘येक’ व ‘ओठ’ चा ‘वठ’ होतो.

पोवारीत एक ते दहा अंक येक, दुय, तीन, च्यार, पाच, सय, सात, आठ, नव, दस याप्रमाणे मोजले जातात. पोवारी बोलीमध्ये हिंदीप्रमाणे दोन लिंग आहेत. पुल्लिंग आणि स्रीलिंग हे दोन लिंगाशिवाय काही शब्द उभयलिंगी म्हणून वापरले जातात. मराठीतील नपुसकलिंगी शब्द पोवारीत पुल्लिंगी होतात. उदा. जंगल, आंगन, घुबड इ. पोवारी बोलीत नामांना वचनविकार होत नाही. वचन बदलत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असे रूप अविचल राहते. नामांचे सामान्यरूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय ‘को’ तर सप्तमीचा प्रत्यय ‘मा’ असा आहे. जसे – उनको मामा, वको भाई, खेतमा, गावमा इत्यादी.

पोवारी भाषिक भाग हा दोन राज्यांत विभागला असल्याने महाराष्ट्रात मराठी आणि मध्यप्रदेशात हिंदीचा प्रभाव पोवारी बोलीवर दिसून येतो. आधुनिक युगात शिक्षणाची कास धरलेल्या पोवार समाजात ज्ञानभाषांच्या प्रभावामुळे पोवारी बोलणार्‍यांचे सुशिक्षित शहरी लोकांमध्ये कमी प्रमाण दिसून येते. त्यामाणाने ग्रामिण भागात पोवारी बोली आजही जिवंत आहे. अलिकडे बोली वाचवण्याच्यादृष्टीने काही सामाजिक संघटणांनी केलेल्या प्रयत्नांच्या फलस्वरूप सुशिक्षित वर्गातही पोवारी बोली बोलण्यासंदर्भात उत्साह दिसून येत आहे. प्राचार्य ओ. सी. पटले, ॲड. लखनसिंह कटरे, ऋषी बिसेन (IRS), ॲड. देवेंद्र चौधरी, इंजी. गोवर्धन बिसेन, प्रा. प्रल्हाद हरीणखेडे, शारदा चौधरी, छाया पारधी, वर्षा पटले यांसारखे साहित्यिक पोवारी बोलीतून सशक्त लेखन करत आहेत. समाजमाध्यमांमधून पोवारी संस्कृती, पोवारी संवाद, पोवारी गाणी, पोवारी काॅमेडी, पोवारी संगीत अल्बम मोठ्याप्रमाणात बघितले आणि ऐकले जात आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून पोवारी साहित्य वाचले जात आहे. नविन पिढीत बोलीचे होणारे हे संक्रमण पोवारी बोलीच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने आशेचा किरण आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading