प्रभा प्रकाशनाचा लक्षात राहील असा साहित्य संमेलन सोहळा
प्रभावती कांडर स्मृति आवानओल कादंबरी पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘ कोल्हाळ’ या कादंबरीला
शालिनी कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘ नांगरमुठी’ या कादंबरीसाठी प्रदान
वैभववाडी – बोलून, लिहून काय होणार आहे ? ही अफवा त्यांनीच पसरवलेली असते ज्यांना बोलणाऱ्याची आणि लिहिणाऱ्याचीही भीती वाटत असते, असे मत ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्यात प्रकाशन संस्थेच अपवादानेच साहित्य संमेलन आयोजित केलं जातं. मात्र आमच्या प्रभा प्रकाशनातर्फे गगनबावडा घाटाच्या तळाशी वैभववाडी येथे ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली अक्षरवैभव साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्याला साहित्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मार्टिन बोलत होते.
यावेळी प्रभा प्रकाशनातर्फे देण्यात येणारा प्रभावती कांडर स्मृति आवानओल कादंबरी पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘कोल्हाळ’ या कादंबरीला तर शालिनी कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. प्रा एस एन पाटील आणि प्रा. संजीवनी पाटील या साहित्य रसिक दांपत्याच्या योगदानातून यशस्वी झालेल्या या कार्यक्रमातील कवी संमेलन प्रसिद्ध मालवणी कवी प्राचार्य नामदेव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली उत्तरोत्तर रंगत गेले. सुमारे 60 कवीनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
आजच्या ग्रहण लागलेल्या काळात लेखकाने प्रश्नच विचारायला हवेत
कठीण काळात कवी लेखक कुणाच्या बाजूने उभा असतो यावर त्याच्या लेखनाचा कस लागत असतो. म्हणून आजच्या ग्रहण लागलेल्या काळात लेखकाने प्रश्नच विचारायला हवेत. कवी लेखक हा या समाजाचाच एक भाग असल्यामुळे साहित्यिकांनी समाजाचाच भाग बनून समाजाचे प्रश्न मांडायला हवेत.
सायमन मार्टिन
सायमन मार्टिन म्हणाले, बोलून काय होणार आहे? लिहून काय होणार आहे? ही अफवा त्यांनीच पसरवलेली असते ज्यांना बोलणाऱ्याची आणि लिहिणाऱ्याची भीती वाटत असते. आपण त्यांच्या कटाला जर बळी पडलो तर एक एक करून आपलाही बळी जाईल. म्हणून ऐकणाऱ्याला आपली भाषा अवगत नसली तरीही आपण बोलत राहायचं असत. त्यांना काही कळणारच नाही असं नाही. आपण बोलत असताना ते आपला चेहरा वाचतील आणि त्यातून आपला संवाद होईल.
मार्टिन पुढे म्हणाले, अनेकदा नकारात्मक भावाचं, द्वेष पसरवणारं आणि माणसा माणसामध्ये धर्म, जात, पंथ व भाषेच्या मुद्द्यावरून फूट पाडणारे विचार पसरवले जातात. त्यामुळे एकूणच वातावरण अस्वस्थ आणि भीतीग्रस्त होते. या सर्व अशांत काळात लेखकाची जबाबदारी मोलाची असते. या अंधाराच्या काळात सर्व धोके पत्करून म्हणूनच बोलत राहणे, लिहीत राहणे गरजेचं आहे.
ज्या काळात कविता लिहिणे हा दखलपात्र अपराध झालेला असताना, न्यायालयं कोसो मैल दूर गेलेली असताना, न्यायाधिशाच्या डोळ्यावरची पट्टी हरवलेली असताना, बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी योग्य काळ नसतानाच्या युगात बोलत राहिलं पाहिजे. याच विश्वासावर की, कुठलीच कबर सत्य दडपू शकत नाही, असे प्रबोधनात्मक विचार मार्टिन यांनी व्यक्त केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
