January 27, 2026
Political leaders campaigning during Maharashtra local body elections amid rivalry, money power and intense factionalism
Home » निवडणुकांचा पोरखेळ…
सत्ता संघर्ष

निवडणुकांचा पोरखेळ…

स्टेटलाइन

नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीत विरोधी पक्ष दिसला नाही, भाजप विरूध्द एकनाथ शिंदे व अजितदादा पवार असा संघर्ष दिसून आला. भाजपाच्या बलाढ्य यंत्रणेपुढे एकनाथ शिंदे सर्व शक्ति एकवटून लढताना दिसले. या निवडणुकीत जनतेच्या समस्या, लहान शहरातील प्रश्नांची चर्चा झाली नाही, विकासाचा मुद्दा नाही, साम दाम दंड भेद अशी रणनिती राबवली गेली.

डॉ. सुकृत खांडेकर

राज्यकर्त्यांची अनिच्छा आणि न्यायालयात तारीख पे तारीख अशा चक्रात गेली आठ दहा वर्षे सापडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी २०२६ पूर्वी घेण्यात याव्यात असा बडगा सर्वोच्च न्यायालयाने उगारल्यानंतर २२२ नगर परिषदा व ४२ नगर पंचायती यांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. निवडणूक प्रक्रियेतील घोळ, त्रुटींवर पुन्हा न्यायालयाने ताशेरे मारल्यानंतर जवळपास वीस नगर परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या, आता तेथे वीस डिसेंबरला मतदान होईल आणि राज्यातील सर्व नगर परिषदांच्या व नगर पंचायतींच्या निवडणुकींची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होईल.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर गेल्या पासष्ट वर्षात नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका एवढ्या कधी गाजल्या नव्हत्या. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एवढा कधी रस घेतला नव्हता. पैशाचा पाऊस एवढा कधी पडला नसावा. साड्या वाटपाची चर्चा एवढी कधी झाली नसावी. दरमहा पंधराशे रूपये देतोय ना मग मतदान आम्हालाच करा असे यापुर्वी लाडक्या बहिणींना वारंवार कोणी बजावून सांगितले नव्हते. नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी खाजगी विमाने व हेलिकॉप्टरचा एवढा कधी वापर झाला नव्हता.

विधानसभा निवडणुकीप्रमाणे भाजप, शिवसेना ( शिंदे ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या तिन्ही पक्षांनी या निवडणुका लढवल्या. सरकारमधे नंबर एक कोण आणि नंबर दोन कोण, आजी कोण नि माजी कोण, फाईलीवर पहिली स्वाक्षरी कोणाची व नंतर मंजुरी कोण देतो अशीही महायुतीच्या मंत्र्यांनी व आमदारांनी जनतेपुढे फुशारकी मारावी हे सर्व लाजीरवाणे होते. प्रसिध्दीचा सर्वात जास्त फोकस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिसला. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात स्टिंग ऑपरेशन करून पैशाच्या थैल्यांचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर अन्य पक्षातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी व पैशाच्या थैल्यांच्या वाटपाचे गंभीर आरोप झाले. अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत सावंत हे कुठे होते हे शोधावे लागत होते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा प्रसिध्दी पत्रकांवरच भर असावा.

या निवडणुकीत महायुतीतच रणधुमाळी बघायला मिळाली. सत्ताधारी पक्षांतच परस्परांवर कुरघोडी आणि एकमेकांची खेचाखेची याचे दर्शन रोज घडत होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे फारसे कुठे दिसलेच नाहीत. ठाकरेंची शिवसेना व पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात मोठी तोड फोड झाल्यानंतर अगोदर एकनाथ शिंदे व नंतर देवेंद्र फडणवीस असे दोन मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील राजकारणाची संभाव्य दिशा कशी असेल याचे संकेत नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीतील प्रचाराने दिले.

विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे सर्वात जास्त १३२ आमदार निवडून आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीतही भाजपला सर्वत्र नंबर एक स्थान मिळवायचे आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मित्र पक्ष या सत्ता स्पर्धेत आहेत. निवडणूक पूर्व पाहणीनुसार भाजपचे १७५ नगराध्यक्ष निवडून येतील. तसे झाले तर काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसेल आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांना भाजपपुढे नमती भूमिका घ्यावी लागेल.

भाजपच्या अजेंडावर आज टार्गेट म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरच्या क्रमांकावर आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबर महत्वाकांक्षा आहे. त्यांनी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेमुळेच महायुतीला सत्ता मिळवून दिली असे ते वारंवार सांगत असतात. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत बंड केल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले व महाघाडीचे सरकार कोसळले. राज्यात भाजप सत्तेवर आली व फडणवीस मुख्यमंत्री झाले ते शिंदेंच्या धाडसी निर्णयामुळे. पण भाजपच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच शिंदे मुख्यमंत्री झाले, हे कसे विसरता येईल. भाजपच्या संरक्षक कवचामुळेच मुंबई, सुरत , गुवाहटी, गोवा अशी चाळीस आमदारांसह पंचतारांकीत सफर झाली. शिवसेना हा पक्ष व धनुष्य बाण भाजपमुळेच मिळाला, हे शिंदे यांनी विसरू नये असे भाजपला वाटते. दोन मोठे पक्ष फोडल्यानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे हे कमकुवत झाले आहेत.

भाजपने ज्यांच्यावर गंभीर आरोप करून जेलमधे पाठविण्याची भाषा केली ते आता सरकारमधे मंत्री आहेत. आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांची भाजपच्या दृष्टीने गरज संपली आहे, त्यांचे माघारीचे दोर कापले आहेत. ते सत्ता सोडून जाऊ शकत नाहीत. गरज म्हणून आणखी काही काळ त्यांना बरोबर ठेऊन राज्याच्या ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार कसा करता येईल , स्थानिक स्वराज्य संस्थांमधे पक्षाचा पाया भक्कम कसा करता येईल यावर भाजपने सारे लक्ष्य केंद्रीत केले आहे. म्हणूनच देवाभाऊ नंबर १ आहेत, देवाभाऊ हेच सर्वेसर्वा आहेत, तिजोरीची चावी त्यांच्याकडे ( अजितदादा ) असली तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे आहेत, असा प्रचार नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक प्रचारात भाजपने केला.

ठाणे, कल्याण- डोंबिवली, तसेच सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेटवर्क मोडून काढण्याची जबाबदारी भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री गणेश नाईक यांच्यावर दिली आहे. हे दोघेही ठाणे जिल्ह्यातील आहेत, त्यांना शिंदेंची पाळेमुळे ठाऊक आहेत. शिंदे यांच्या पक्षातील अनेक लहान मोठे मासे त्यांनी आपल्या गळाला लावले आहेत. आमची माणसे फोडतात व भाजपत घेतात म्हणून एकनाथ शिंदे यांनी अमितभाई शहांकडे तक्रारी केल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. आपली माणसे आपणच संभाळली पाहिजेत हे शिंदे यांना कळून चुकले आहे.

डहाणूतील एका सभेत एकनाथ शिंदे म्हणाले- एकाधिकारशाहीच्या विरोधात आपण एकत्र आलात, रावणाची लंका जळून खाक झाली, ती अहंकारामुळेच… ते रावण कोणाला म्हणाले, लंका जाळायची म्हणजे कोणाला धडा शिकवायचा हे त्यांनी सांगितले नाही. नंतर देवेंद्र फडणवीस पालघरमधे म्हणाले- आपण रामाचे सैनिक आहोत, आपण लंकेत राहत नाही, आपण रावण नाही, आपला उमेदवार भरत हा रामाचा भाऊ आहे….

मंत्री दादा भुसे म्हणतात- जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असे विचारले तर लोक म्हणतात- एकनाथ शिंदे…
दुसरे मंत्री माणिकराव कोकोटे म्हणातात- भाजप हा पूर्ण बरबटलेला पक्ष आहे. फोडाफोडीत भाजप नेत्यांचे आयुष्य गेले…
प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांच्या दोन विधानांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपला आता कुणा मित्र पक्षांची गरज नाही, हाच त्यांचा इशारा आहे. अमित शहा मुंबईत आले असताना म्हणाले – आता स्वबळावर लढायचे, शतप्रतिशत हे आपले ध्येय आहे, भाजपला कुणा कुबड्यांची गरज नाही… निलेश राणे यांनी जेव्हा रवींद्र चव्हाण यांचे नाव घेऊन त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला तेव्हा चव्हाण म्हणाले- मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे… नंतर म्हणाले- जो भी है, देवाभाऊ है.. नंबर दोन ला काही अर्थ नसतो….

नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीत विरोधी पक्ष दिसला नाही, भाजप विरूध्द एकनाथ शिंदे व अजितदादा पवार असा संघर्ष दिसून आला. भाजपाच्या बलाढ्य यंत्रणेपुढे एकनाथ शिंदे सर्व शक्ति एकवटून लढताना दिसले. या निवडणुकीत जनतेच्या समस्या, लहान शहरातील प्रश्नांची चर्चा झाली नाही, विकासाचा मुद्दा नाही, साम दाम दंड भेद अशी रणनिती राबवली गेली. नेत्यांच्या निकटवर्तीयांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले गेले. नगर परिषद व नगर पंचायत पातळीवर भाजपची नवीन घराणेशाही उदयाला आली. पैसे, पार्ट्या, बोगस मतदान, हाणामारी, दगडफेक, चाकू, पिस्तुल, धमकी, सर्व साधनांचा मुक्त वापर झाला. समोर कोणी विरोधक असता कामा नये या तत्वानुसार निवडणुका लढवल्या गेल्या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

महापालिका निवडणुका: नवीन पद्धत आहे तरी काय ?

बिहारमध्ये जंगलराज, सत्ताबदलाचे शस्त्र

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading