तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं मन हळवं असतं हे खरं आहे. धरणेच्या कविता अशाच समाजातील वेदनेला साद घालतात.
बाबाराव मडावी, आकांतकर
दूर कोणत्या महाली असेल तुझा मुक्काम
ही झोपडी बापाची तिची वाढव शान।
चंद्रमौळी झोपडीत तुझे सपान बिल्लोरी
तुझ्या जन्माचे आठव माझे पोसलेत उरी।
हे अंगण रुसलं तू जाता गं सासरी
नाही होणार सडा-रांगोळी नाही बजणार बासरी।
ती तुळस बघ नाही हसणार कालच्यावाणी
वाट बघल आई तिच्या लोचनात पाणी।
सण येता राखी पुनवचा दादा घेईल ग साडी
तुझ्यासाठी असेल ती त्याच्या काळजाची घडी।
वाट मोकळी दिसल तव्हा हंबरतील गायी
तिच्या पाडसात तुला रोज पाहते तुझी आई।
लेक चालते सासरी बाप रडतो धाई धाई
या कठोर पहाडाची होते क्षणातच राई।
तानाजी धरणे, महाड, रायगड
काव्यसंग्रह – नांगरतो तळहाताच्या रेषा
कवी – तानाजी धरणे
प्रकाशक – ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक 2024
किंमत – १५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
