September 8, 2024
The first creation of the word in the universe therefore the creation is the word creation
Home » विश्वात सर्वप्रथम शब्दाची निर्मिती, म्हणूनच सृष्टी ही शब्दसृष्टी… !
विश्वाचे आर्त

विश्वात सर्वप्रथम शब्दाची निर्मिती, म्हणूनच सृष्टी ही शब्दसृष्टी… !

एकदा शब्दाने जागृती आल्यानंतर मग झोपेत जरी हाक मारली तरी आपणाकडून प्रतिसाद दिला जातो. इतके शब्दाचे सामर्थ्य आहे. यासाठी गुरुमंत्राची साधना ही महत्त्वाची आहे. ही शब्दाची साधना आहे. स्वराची साधना आहे. कारण शब्द हेच आपले अस्तित्व आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तो महावाक्याचेनि नांवे । गुरुकृपेचेनि थांवें ।
माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ।। ४०४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थः त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने, गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेविला असेच नव्हे, तर त्यास थापटून जागे केले.

जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातही सद्गुरुंची अनुभुती येत राहाते. शिष्यास जागे करण्यासाठीच सद्गुरु ही अनुभुती देत राहातात. जे घडते आहे ते त्यांच्याच कृपेने घडते आहे. त्यात सद्गुरुंचा श्वास आहे. याचा बोध आपणास यायला लागतो. गुरुंचा प्रत्यक्ष वावर नसला तरीही त्यात सद्गुरुंचा वास असल्याचे अनुभवास येते. शिष्याला छोट्या छोट्या प्रसंगातूनच ते जागे करत असतात. सावध करत असतात. यासाठी शिष्याचे अवधान मात्र असायला हवे. या अनुभुतीतून शिष्यातील अहंकार, मीपणा जाऊन त्याला जागृती यावी, बोध व्हावा हाच त्यांचा या मागचा उद्देश असतो.

या विश्वात आपण आल्यानंतर प्रथम आपणास कशाचा बोध होतो ? आईच्या उदरात असतानाही आपला श्वास हा सुरु असतो. उदरातून आपला जन्म झाल्यानंतर विश्वात प्रथम आपला श्वासच सुरु होतो. म्हणजेच हा स्वर सुरु होतो. हा स्वर सोsहम या शब्दरुपात आहे. म्हणजेच प्रथम शब्दाची उत्पत्ती होते. एक स्वर, एक शब्द, सोsहम हेच आपल्या जीवनाचे मुळ आहे. संशोधकांच्या, शास्त्रज्ञांच्या तसेच ऋषीमुनींच्या मते विश्वात सर्वप्रथम शब्दाची निर्मिती झाली. म्हणूनच ही सृष्टी, हे विश्व हे शब्दसृष्टी आहे. सर्वप्रथम शब्द सृष्टीचीच निर्मिती झाली. सोsहम हेच या विश्वोत्पतीचे बीज आहे. म्हणूनच गुरु सोsहमची, ओंकाराचा गुरुमंत्र देतात.

सोsहम हा शब्द आहे. कारण हा शब्द हीच आपली ओळख आहे. या शब्दानेच आपणास हाक मारून ते आपणास जागे करतात. आपणाला या शब्दाच्या अनुभुतीतून स्वतःची ओळख करून देतात. मी कोण आहे याचा अनुभव घेण्यास ते शिकवतात. या शब्दातूनच ज्ञान होते, जागृती येते. म्हणूनच ही सर्व सृष्टी ही शब्दसृष्टी आहे. या शब्दाचे सामर्थ्य आपण जाणून घ्यायला हवे. शब्दाच्या महावाक्याने, उपदेशाच्या शब्दाने सद्गुरु आपणास जागे करत असतात. सद्गुरु अनुग्रह देतात म्हणजे काय करतात ? सोsहम शब्दाची साधनाच तर सांगतात. हे शब्दच आपणाला जागृती देतात. आपणास ज्या शब्दांनी जागृती येते त्या शब्दांचा मंत्र ते आपणास देतात. त्या शब्दांनी हाक मारल्यानंतर आपल्याकडून आपसुकच ओsss चा होकार मिळतो.

एकदा शब्दाने जागृती आल्यानंतर मग झोपेत जरी हाक मारली तरी आपणाकडून प्रतिसाद दिला जातो. इतके शब्दाचे सामर्थ्य आहे. यासाठी गुरुमंत्राची साधना ही महत्त्वाची आहे. ही शब्दाची साधना आहे. स्वराची साधना आहे. कारण शब्द हेच आपले अस्तित्व आहे. या शब्दातूनच आपली निर्मिती झाली आहे. यासाठीच या शब्दाची ही साधना आहे. ही जागृती येण्यासाठीच साधना ही करायची आहे. आपणच आपली ओळख करून घ्यायची आहे. आपणच आपला बोध घ्यायचा आहे. मी कोण आहे ? याची अनुभुती घ्यायची आहे. सद्गुरुंच्या कृपेने ही जागृती येते. यासाठी शब्दाची साधना आहे. शब्द हेच आपले विश्व आहे. यातूनच या सृष्टीची निर्मिती झाली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गुरुंची आज्ञा हा शिष्यासाठी महाप्रसाद

हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज

वैराग्यरुपी विषाने विषयांची शुद्धी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading