चिंबोरवाडीतील चिबोर्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही ना ?असा प्रश्न ही कादंबरी निर्माण करते.
दामोदर मावजो
(ज्ञानपीठकार, गोवा)
“चिंबोरेयुद्ध” म्हणजे उत्तरआधुनिक कादंबरी-अंतर्गत एक अभिनव, अभिजात कादंबरी प्रकार आहे ज्याला अ-कादंबरी म्हणता येईल. साहित्यांतील सारे सिद्धांत, वाद, ‘इजम्स’ धाब्यावर बसवत ‘अँब्सर्डिटी’ संज्ञेला नजिक जाऊ पहाणारी ही संहिता म्हणजे चिंबोऱ्यांच्या मुखातून वर्तमान स्थितीवरील विशिष्ट शैलीतून केलेले ब्लँक सटायर आहे.
‘ज्याच्याकडे बंदा त्याचा नाही वांदा’ असे म्हणत उजेडात विरोध व अंधारात दिलजमाई करत सत्ता आहे तोवर हात धुऊन घेणाऱ्या व सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा आहे. म्हणजेच शासन व शोषण, नमन व दमन ही नीती स्वीकारलेल्यांची कथा आहे.
ह्या दोन्हीवृत्तींच्यांनी लोकशाहीच्या नावावर छुपी भांडवलशाहीच निर्माण केली आहे. जिथे पोषणकर्तेच शोषणकर्ते आहेत. इथे थिंकटॅंकवाले चिंबोरे किंगमेकर बनून जोमात वावरतात तर काही सत्तेत अथवा विरोधात न रहाता ‘वेट ॲण्ड वॉच’ ची भूमिका घेऊन संधीची वाट पहातात. बहुसंख्यांकांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवत मूळ विषयांना बगल देण्यात काही मग्न असतात तर काही आश्वासनांची खैरात करत मनोरंजन करणाऱ्या वावड्या उठवताना दिसतात. काही शहाणे तिव्र राष्ट्रभक्तीतून गुलाम निर्माण करायचे ते तंत्र विकसित करतात.व ज्यांना कोणतीच लायकी नाही ते सगळ्या समित्यांतून घुसताना दिसतात. मार्क्सवाद,आणीबाणी, जागतिकीकरण, सोशल मिडिया, निवडणुकांचं संख्याशास्त्र, आंतरराष्ट्रीय पुंजीवाद, ह्यांचा खल होतानाच आधुनिक युद्धतंत्र, सायबरहल्ले व रासायनिक युद्धसामुग्रीसह रोगजंतू शरिरात घुसडण्याच्या कारस्थानावरही उहापोह इथे होताना दिसतो.
चिंबोरवाडीतील चिबोर्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही ना ?असा प्रश्न ही कादंबरी निर्माण करते.
चिंबोरीमॅनचे हे ‘चिंबोर जग’ आहे. हे चिंबोरी युद्ध आहे. स्वप्न, वास्तव, अद्भुतता, फॅन्टसीची जाणीवपूर्वक आदिबंधात्मक रूपकांची योजना करून बाळासाहेब लबडे यांनी या नव्या कादंबरीचे बांधकाम केले आहे. त्यांच्या मागील तीन कादंबऱ्यांचा विचार करता, हे एक नवे विश्व साकारण्यात त्यांना कमालीचे यश प्राप्त केले आहे. ॲनिमेशनच्या जगात जावे तसे समुद्र खाडीच्या विश्वाला जगावेगळा लाईफ साईजचा आकार देऊन ते आपणाला सद्य:स्थितीची गोष्ट सांगत आहेत वास्तविक पाहता, ही गोष्ट नसलेली एक गोष्ट आहे). हा एक फार महत्त्वाचा मुद्दा या कादंबरीच्या निमित्ताने सांगायला हवा. पण वरकरणी हे असे दिसत नाही. यातच बाळासाहेब लबडे यांच्या कलात्मकतेचा अविष्कार दडलेला आहे. हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य त्यांना विसाव्या शतकातील पूर्वसुरीच्या मराठी कादंबरीकारांपासून वेगळे करणारे वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल.
डॉ. दीपक बोरगावे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.