कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी १७ एप्रिल रोजी वाघाचे दर्शन झाले. वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे.
कोल्हापूर: वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून 100 ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते.
हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून पंचवीस दिवस वन्य जीवन निरीक्षणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. 11 एप्रिल 2022 रोजी सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये 17 एप्रिल 2022 रोजी पुर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ छायाचित्रीत झाला आहे.
यापूर्वी 2019 मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते. परंतु त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नाही. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेरा करिता निधी मिळाल्यामुळे वन्यजीव प्रेमी पालकमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहेत. या वाघाचे अस्तित्व यामुळेच आता स्पष्ट झाले आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली आहे.
-अनिरुद्ध माने, मानद वन्यजीव रक्षक
वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा- वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरी वाघाचे पट्टे सॉफ्टवेअर वर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी त्याची तुलना करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ते वाघाचे पट्टे जुळले तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला आहे, असा निष्कर्ष काढण्यात येतील. जर ते पट्टे जुळले नाहीत तर या वाघाची उत्पत्ती राधानगरी अभयारण्यातच झाली असा निष्कर्ष काढण्यात येईल.
प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.