January 25, 2026
Marathi Japanese film To Ti Ani Fuji team at Pune International Film Festival 2026
Home » प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश
मनोरंजन

प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश

इरावती कार्णिक यांना मराठी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार; ललित प्रभाकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता – ज्युरी विशेष उल्लेख पुरस्कार

मुंबई : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी – जपानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी स्पर्धा विभागातील सात निवडक चित्रपटांपैकी एक होता आणि त्याचे सर्व शोज् हाऊसफुल्ल झाले.

महोत्सवातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत ‘तो ती आणि फुजी’ने मानाचे २ पुरस्कारही पटकावले—ललित प्रभाकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी विशेष उल्लेख) आणि इरावती कार्णिक यांना सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले.

जपान आणि भारतात चित्रीत झालेला ‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट पुण्यात राहणाऱ्या एका जोडप्याची कथा सांगतो—जिथे प्रेम नैसर्गिक न राहता ते मोजून-मापून केलं जातं, त्याला गुणांकनात आणि भाकितांमध्ये अडकवलं जातं. अशा जगात त्यांची तीव्र, सर्वस्व झोकून देणारी प्रेमकहाणी उलगडते.

या सन्मानाबद्दल बोलताना ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ, झोंबिवली, स्माईल प्लीज) म्हणाले, “तो ती आणि फुजी हा माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि वेगळा अनुभव होता. प्रतिष्ठित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष उल्लेख मिळणे खरोखरच भारावून टाकणारे आणि मनापासून समाधान देणारे आहे. प्रेक्षक आणि परीक्षक—दोघांचंही अभिनयाशी इतक्या खोलवर नातं जुळलं, याचा विशेष आनंद आहे. पुण्यातला हा माझा दुसरा पुरस्कार असल्यामुळे तो अधिकच खास वाटतो—विशेषतः आंतरराष्ट्रीय ज्युरीसमोर. मी जे काही केलं त्याचं श्रेय दिग्दर्शक मोहितला जातं; त्याने मला माझ्या मर्यादांपलीकडे जायला प्रवृत्त केलं. आणि इरावतीसोबत हा माझा पाचवा चित्रपट आहे. जापानमध्ये चित्रीत झालेल्या मोजक्या भारतीय चित्रपटांपैकी एका चित्रपटाचा भाग असणं हा प्रवास अजूनच संस्मरणीय बनवतं.”

पटकथालेखिका इरावती कार्णिक (झिम्मा, आनंदी गोपाळ) म्हणाल्या, “PIFF सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात निवड होणं हेच मोठा सन्मान आणि सौभाग्य आहे. त्यावर कळस म्हणजे पुरस्कार मिळणं—हे खरोखरच अतिशय समाधानकारक आहे. तो ती आणि फुजी साठी संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीची दखल घेतली गेली आहे, याचा खूप आनंद आहे. या पुरस्काराबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.”

निर्माते शिलादित्य बोरा—जे Platoon One Films या भारतातील आघाडीच्या स्वतंत्र चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत ‘बयान’ (TIFF 2025), ‘घात’ (Berlinale 2023) आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘पिकासो’ यांसारख्या क्रिएटर-फर्स्ट चित्रपट निर्मितीसाठी ओळखले जातात—म्हणाले, “पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ललित आणि इरावतीला सन्मान मिळताना पाहणं खूप प्रेरणादायी आहे. या चित्रपटावर माझा नेहमीच विश्वास होता. तो खरा आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलीही तडजोड करत नाही. ज्या प्रेक्षकांसाठी तो बनवला गेला, त्यांच्याशी तो अखेर जोडला गेला, हे पाहणं अतिशय समाधानकारक आहे. धाडसी, वेगळा दृष्टीकोन असलेल्या दिग्दर्शकांना पाठिंबा देणं, यावर माझा ठाम विश्वास आहे—आणि मोहित अशा दिग्दर्शकांपैकी एक आहे. या चित्रपटामुळे मराठी सिनेमा जागतिक स्तरावर नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आधीच रस दाखवला जात आहे आणि हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

‘तो ती आणि फुजी’मुळे ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र आली आहे. २०१७ मधील सुपरहिट ‘ची व ची सौ का’ नंतर हे दोघे पुन्हा एकदा पडद्यावर झळकले आहेत. यशस्वी जागतिक प्रीमियर, समीक्षकांची प्रशंसा आणि पुरस्कारांच्या मान्यतेनंतर ‘तो ती आणि फुजी’ २०२६ मधील लक्षवेधी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. हा चित्रपट यंदा उन्हाळ्यात जगभर प्रदर्शित होणार आहे.

Platoon One Films विषयी

Platoon One Films ही भारतातील आघाडीची स्वतंत्र चित्रपट निर्मिती संस्था असून, तिची स्थापना Berlinale Talentsचे माजी सहभागी शिलादित्य बोरा यांनी केली आहे. भारतीय सिनेमातील वेगळे, ठळक आवाज घडवण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.
संस्थेच्या गौरवशाली चित्रपटयादीत ‘युअर्स ट्रुली’ (Zee5), राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘पिकासो’ (Amazon Prime Video) आणि ‘भगवान भरोसे’ (Amazon Prime Video, Channel 4) यांचा समावेश आहे. अलीकडेच हुमा कुरेशी अभिनीत ‘बयान’ चा २०२५ च्या टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डिस्कव्हरी’ विभागात जागतिक प्रीमियर झाला. सर्जनशील कक्षा विस्तारत Platoon One Films ने ओडिया चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले असून ‘बिंदूसागर’ चा प्रीमियर ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), गोवा येथे झाला.
या वर्षी ‘बयान’, ‘बिंदूसागर’, ‘मिनिमम’ आणि ‘तो ती आणि फुजी’ असे चार चित्रपट प्रदर्शित होणार असून, हे वर्ष Platoon One Films साठी मैलाचा दगड ठरणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तेजश्री प्रधान : अभ्यासू व्यक्तिमत्त्व….!

प्राजक्ता माळीला माधुरी पवारने दिल्या अशा शुभेच्छा…

प्रेम, आठवणी आणि फुजी पर्वत : ललित–मृण्मयींचा नवा मराठी-जपानी सिनेप्रवास

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading