कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वी
प्रभा प्रकाशनच्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर कवितासंग्रहाचे मुंबईत प्रकाशन
कवी सायमन मार्टिन, कवी अजय कांडर, अभिनेत्री मेघा घाडगे यांची उपस्थिती
कणकवली – कणकवलीच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कोकण सुपुत्र कवी उदय जाधव यांच्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर काव्यसंग्रहातील कविता समकाळातील अनिष्ट गोष्टीवर प्रहार करून व्यवस्थेलाच प्रश्न विचारते असे प्रतिपादन विख्यात नाटककार तथा कवी प्रेमानंद गज्वी यांनी केले.
दीप तारांगण क्रियेशन्सतर्फे मुंबई गोरेगाव केशवराव गोरे स्मारक सभागृहात श्री गज्वी यांच्या हस्ते पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि त्यावरील चर्चा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कवी सायमन मार्टिन, कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे आदी सहभागी झालेल्या या कार्यक्रमाला कवयित्री आणि अभिनेत्री कविता मोरवणकर, दीप तारांगण क्रिएशनच्या संचालिका दीपा सावंत खोत,कवी उदय जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रेमानंद गज्वी यांनी आजच्या काळाशी समर्पक अशा कविता या संग्रहातून आपल्यासमोर येतात. आताचा काळ आणि बुद्धतत्त्वज्ञान, आंबेडकरी विचार यांची उत्तम सांगड सदर काव्यसंग्रहातून चित्रित केली आहे असेही आग्रहाने सांगितले.
उदय जाधव यांनी लिहिलेल्या त्यांच्या या कविता खऱ्या अर्थाने स्व अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या आहेत. याचे कारण एकाच वेळी आत्मलक्षी आणि बाह्यलक्षी ही कविता आहे. समाजाची जी काही सुखदुःख आहेत ती कवितेतून व्यक्त झाली आहेत. भेदाचा आक्रोश व्यक्त केलेला आहे.
सायमन मार्टिन
उदय जाधव हे मूळचे रंगकर्मी आहेत. एक चांगला नाट्य लेखक हा चांगला कवी असू शकतो याचे उदाहरण म्हणजे कवी उदय जाधव. काळाचे भान, समकालीन गोष्टी, त्यांचे अंतर्विरोध समजून घेऊन या कविता जाधव यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे जाधव यांच्या संग्रहातील कविता खूप पुढे जाणारी आहे. जाती-धर्म त्यातला भेद आणि सांस्कृतिक राजकारण हे समजून घेत ही कविता लिहिली आहे. या पातळीवर ही कविता समजून घेताना आजचे आजूबाजूचे वातावरण वाचकाला खुणावत राहते आणि वाचकालाच अंतर्मुख करते.
अजय कांडर
उदय जाधव यांनी लिहिलेल्या त्यांच्या कवितेत सामाजिक वास्तव तीव्रपणे येते. मात्र माणूस समजून घेऊन माणसाला जपायला पाहिजे ही भावना हरवल्याने त्या विरोधातील पडसादही या कवितेत उमटतात म्हणून ही कविता वाचकांनी आवर्जून वाचायला हवी.
मेघा घाडगे
यावेळी महादेव जाधव, सुशांत पवार, अमित कांबळे, स्वप्नील जाधव, दीपा सावंत खोत आदिनी कार्यक्रमाच्या प्रारंभी पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर काव्यसंग्रहातील काही कवितेचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केले. यावेळी संबंळ चित्रपट लेखिका रुपाली कुटे, बि. एन. जाधव, दीपक कांबळे, अशोक चाफे ,अनिल कदम, लेखक प्रवीण धोपट, प्रसिद्ध वेषभूषाकार मंदार तांडेल आणि देवानंपिय असोक या बहुचर्चित नाटकातील अनेक नाट्यकर्मी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.