सुखाची पालवी आणि दुःखाचे काटे: बांधावरची बाभळ
लेखकाचं उत्तूर हे गाव सोडून मुंबईत हॉटेलमध्ये काम करून रात्र शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेणं.. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून हॉंगकॉंग, मकाऊ, दुबई, दोहाकतार अशा देशांत टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणं …यातूनच मनात साचलेलं लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटत गेलं आणि त्याचं गावाकडच्या आठवणीत रूपांतर होऊन कथाबीज मिळालं तेच कथासंग्रहाला जन्मदेतं झालं.
रवींद्र शिवाजी गुरव,
98 22 25 40 47
‘बांधावरची बाभळ’ हा लेखक प्रकाश नावलकर यांचा ग्रामीण बोलीतला कथासंग्रह न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. वीस कथांचा हा संग्रह मधुमिता शिंदेंच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचनीय आहे. ‘आठवणीतल्या प्रकाशवाटा’नंतर आलेला त्यांचा हा संग्रह लेखकासवे वाचकांच्याही मनात आशादायी कोकुरउड्या मारणारा आहे. गाव मातीशी लेखकाच्या भोळ्या भावड्या निवेदनशैलीतून नाळ जुळलेला हा कथासंग्रह लेखकाच्या अवतीभोवती आठवणींच्या माध्यमातून फिरत राहतो आणि त्याचंच कथाबीज होऊन कथा आकार घेते.
गाव मातीशी आणि शेत-शिवाराशी ऋणानुबंध जपणारा, गण-गोतावळा आणि नात्यांचा पीळ घट्ट करणारा हा कथासंग्रह लेखकानं आई-वडिलांना अर्पण केला आहे.
बैलांना चाबूक न लावता शर्यत जिंकणारा म्हादबा आणि ढवळ्या-पवळ्याचा लळा जिव्हाळा कौतुकास्पद वाटतो. गाडीचं चाक तुटून पडल्यावरही कण्यावर गाडी वडत फज्जापर्यंत आणणारी निष्ठावंत, इमानदार बैलजोडी गाडीतून पडलेल्या धन्याची विचारपूस गाठ घेत मुलखा वेगळीच ठरते.
‘बांधावरची बाभळ’ ही शीर्षक कथा रात्री मेंढरांच्या कळपात घडलेला सारा प्रकार कथन करत मेंदूला झिणझिण्या आणते ते सारं भयाण दृश्य समोर उभं करत ….तीच बांधावर बाभळीची ढांपी होऊन भूतकाळातल्या वेदनेच्या कळीसरशी कधी उगवते आणि तिला कथा पालवी फुटते ते भयान अंधारात कळतच नाही.
अशा सरस बीज घेऊन आलेल्या वीस कथांचा हा संग्रह ढांप्या, चौथाई, आडास, बेनल्या, परड्यात, फरशी, पोतीरा, गोरण, बुकणा, करडं, वताड, बेजमी, इरागत, कोरड्यास, सप्पय, जिनगाणी, चपरात, चगाळा, बी- बिवाळा अशी डालगंभर शब्द शिदोरी घेऊन आला आहे ते गाव बोलीतली चपखल वाक्यं मिरवतच. डोळ्यांच्या पापणीवर मनभर वझं…. चुलीत काय पाय घालू ? असं काळजातून म्हणत आणि प्रसंगानुरूप माझ्या हांट्याच्या असं एखादं शिवी शिवाय पाणी न पिणारं कोल्हापुरी भाषेतलं उत्तूर भागातलं शेलकं वाक्य हासडत..
लेखकाच्या आईचं अचानक जाणं… लेखकाचं उत्तूर हे गाव सोडून मुंबईत हॉटेलमध्ये काम करून रात्र शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेणं.. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून हॉंगकॉंग, मकाऊ, दुबई, दोहाकतार अशा देशांत टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणं …यातूनच मनात साचलेलं लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटत गेलं आणि त्याचं गावाकडच्या आठवणीत रूपांतर होऊन कथाबीज मिळालं तेच कथासंग्रहाला जन्मदेतं झालं.
दोहाकतारमध्ये ग्रंथपाल म्हणून सेवा बजावत असताना लेखकानं या कथांमध्ये अध्ये मध्ये सहज काव्यही पेरलं आहे. एखाद्या कवीच्या कवितेच्या ओळी त्याच्या नावानिशी पात्रांच्या तोंडी टाकत त्यात जीव आणण्याचा प्रयत्न केला आहे. लांबलचक असा गावाकडच्या लग्नातला उखाणा तर लगीन मांडव सजवत सोहळा देखणापान करून सोडतो. या कथा कधी लघुकथा तर कधी त्याहूनही लहान होत गावाकडची वड कायम ठेवत गाव मातीशी, माणसांशी इमान राखत लेखकाच्या निवेदनातून, वर्णनातून, उपदेश, संदेशातून पुढं दीर्घ प्रवासाकडं सरकतात. कथेत मध्ये मध्ये डोकावणारी लेखकाची भोळीभाबडी शैली वाचकाला ठेचाळल्यागत, गुतपाळल्यागतही करणारी वाटली तरी या कथा वाचक मनात रुजून उगवणाऱ्या आहेत. सुखाची पालवी आणि दुःखाचे काटे सांगणाऱ्या आहेत. दुःखाचे काटे बगलेला सारत पालवीतून तृप्ती देणाऱ्या आहेत…
या कथा वाचकांशी मनमोकळं करतात… गुजगोष्टी करतात… मनावर हेंदकाळत राहतात त्या एक ककीचं मन मोकळं होईस्तोवर. हितगुज हाच एक एकीचा ध्यास आहे म्हणूनच ती भूतकाळापासून भविष्यापर्यंत वाचकाचा पाठलाग करतच राहते. यातील एक एक कथा आयुष्याची गाव पांढरीतली मागं पडलेली आयुष्य पानं साठवत काट्याकुट्यातून काळजावर स्वार होऊन काळजातला कवळाजार पाला होते तर कधी रक्तबंबाळ करत अलगद मलमपट्टी करते.
साचेबद्ध अशी मीटर पट्टी नसलेल्या या कथा व्हगालणाऱ्या जरी वाटल्या तरी यातला लेखकानं मन कणगीत लिपाण लावून ठेवलेला बी- बिवाळा खडकाव व्हलपटला तरी जोमानं उगवणारा आहे. उत्तूर, आजरा परिसरातील बोलीतून साहित्य माहेरी नांदायला आलेल्या या गोष्टी स्वानुभवातूनच असल्यानं त्या वाचकालाही गुरफटून टाकतात ते त्याला त्याच्या सुख-दुःखांशी समरस करतच.
मात्र एक यातील ब्याणं टपोर आहे. ते जोमानं उगवेल हे नक्की. लेखक देवा झिंजाड यांनी या सकस बियाण्याची पाठ राखण केली आहे ती दीर्घ प्रस्तावनेच्या माध्यमातून.
मुद्रितशोधनातून लेखकाच्या मनीचे भाव घाव घातल्यागत कधी तुटू नयेत…. लेखकाच्या मनातले शब्द गिळून ध चा मा होऊन हिरमोड होऊ नये हीच अपेक्षा लेखक आणि वाचकाची असते ती बहुतांशी नेटानं पाळली आहे.. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचं कव्हर भारी जाडजूड भक्कम झाला आहे. छपाई सुबक आहे. संग्रहास आकर्षक असं मुखपृष्ठ लाभलं असून मलपृष्ठावर संग्रहाच्या पोटातलं ओठावर यावं तसं आलं आहे.
गावाकडच्या आठवणी गाजावाजा करत यातील एक एका कथेला भेटायला आल्या आहेत त्या कथेला सावरत बगल न देत छप्पन फाटे न फोडता चाकोरीत बसवून व्हगलू नयेत याची काळजी घेत राहतात. परिचयातून स्वतःबद्दल लेखकालाच बोलतं करतात… आणि एखादी झीज भरून काढण्यासाठीही धजतात.
भविष्यात साहित्य साच्यातलं चाकोरीबद्ध, तंतोतंत मिळतं जुळतं, वाचकाला हवं ते ललित, कथा, काव्य, कादंबरी असं मनाचा तळ ढवळून काढणारं नाविन्यपूर्ण सवता सुभा मांडणारं टुमदार लेखन या लेखकाच्या हातून घडेल अशी आशा वाटते. या पुढचं नवं अपत्य, आवृत्ती साहित्याच्या प्रांतात धाडताना अनुभव आणि प्रतिभेचं मुरवाण घालून मुरवतीनं प्रकाशात … हां उजेडात येईल आणि स्वतःच स्वतःच्या उराव सगळं घेऊन न बसता वाचकांवर ते मोठ्या विश्वासानं सोडलं जाईल अशी भरीव आशा आहे. या भरीव आशेच्या पूर्ततेसाठी आणि तटृयाभरून दमदार, कसदार मोत्यागत दाणेदार लेखन कणसासाठी आभाळभर शुभेच्छा…..
पुस्तकाचे नाव – ‘बांधावरची बाभळ’ (कथासंग्रह)
लेखक – प्रकाश नावलकर
प्रकाशक – न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.
पृष्ठे – 172.
किंमत –280 ₹

Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.