January 29, 2023
ground-nut infatuation short story by mira utpat tashi
Home » मोह मोह के धागे
मुक्त संवाद

मोह मोह के धागे

मोह!!! आपल्या षडरिपू पैकी एक… जन्मलेल्या बाळापासून ते शंभर वर्षांच्या व्यक्तीपर्यंत सगळे मोहात गुरफटलेले आहेत. मोह उपजतच असतो. छोट्या बाळाला बाकी काही कळत नाही पण आईचा स्पर्श कळतो. तिच्या मोहात गुरफटलेलं असतं ते बाळ. जसं जसं मोठं व्हायला लागतं तसतसे आणखीन मोहाचे पडदे आयुष्य व्यापून टाकतात.

मीरा उत्पात-ताशी, 9403554167.

मला पडलेल्या मोहाच्या दोन घटना आठवल्यावर आजही ओठावर हसू येतं. मला शेंगदाणे प्रचंड आवडतात..खारे शेंगदाणे तर जीव की प्राण!! मी कुर्डूवाडी ला नूतन विद्यालय पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतरची ही गोष्ट आहे.

चिंकहिलला शाळा अगदी हाकेच्या अंतरावर होती. आणि आता ही नूतन शाळा घरापासून दोन-तीन मैलावर दूर होती. पण त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे माझे काका सुरेश उत्पात त्याच शाळेत शिक्षक होते. त्यामुळे काळजी नव्हती. सायकलवरून त्यांच्याबरोबर शाळेत जायचं आणि परत यायचं होतं. माझे चिंकहिलचे सवंगडी मात्र रोज रेल्वेने ये-जा करत असत. चिंकहिलला एक शिक्षकी शाळा होती. इथं मात्र भरपूर वर्ग होते. नवीन जग, नवे चेहरे. मी जरा भांबावून गेले होते. काका माझी खूप काळजी घ्यायचे. आई डबा देत असे. पण काकाला वाटलं हिला परत भूक लागली आणि आपण वर्गावर असलो, काहीतरी कामात असलो तर हिला सांगता येणार नाही..मग त्यांनी मला औदु मामाची ओळख करून दिली.

औदुंबर मामा शाळेत शिपाई होते. शिवाय खेळाचे साहित्य ठेवायच्या खोलीत मधल्या सुट्टीत ते खारेमुरे वटाणे फुटाणे विकत असत. त्या छोट्या खोलीत लेझीम ढोल असं साहित्य असे. तिथंच जागा करून खाऱ्यामुऱ्याचा स्टाॅल त्यांनी टाकला होता. मधल्या सुट्टीत खूप मुलं तिथं गर्दी करून खारेमुरे घेत असत. आमच्या कडे लहान मुलांकडे पैसे देण्याची पद्धत नव्हती.. काकांनी औदुमामाला सांगितलं की हिला जेव्हा हवं असेल तेव्हा शेंगदाणे फुटाणे काय मागेल ते दे आणि वहीत मांडून ठेव. मी तुला पैसे नंतर देईन.

मला म्हणाले की ‘रोज नाही घ्यायचं.. कधीतरी जास्त भूक लागली तर घे.’ चार दिवस ही गोष्ट माझ्या डोक्यात घोळत होती. कधी एकदा त्या औदु मामाच्या दुकानातले खारे शेंगदाणे खाते असं झालं होतं. चार दिवसांनी स्टाफ रूम मध्ये जावून काकांना म्हटलं मला फार भूक लागली आहे.

काका म्हणाले की ‘जा औदु कडून तुला शेंगदाणे फुटाणे काय पाहिजे ते घे.’ पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून मी लगेचच औदू मामा कडे आले. दहा पैशाचे खारेमुरे घेतले गरम गरम नुकतेच भट्टी वरून भाजून आणलेले खारेमुरे खाल्ले अन् जीभ खवळली.. परत अजून जाऊन दहा पैशाचे घेऊन आले..परत एकदा.. असं करत करत जवळपास दहा पुडे झाले. त्यावेळी दहा पैशाला मोठं माप भरून शेंगदाणे मिळत असत. एक रुपयाची उधारी खात्यावर जमा झाली. एक रुपया म्हणजे खूप होते त्यावेळी.. शाळा सुटल्यावर औदूमामानं ‘सर तुमच्या मुलींनं एक रुपयाच्या शेंगा घेतल्या बर का’ असं सांगितलं. फारच मोठी बाब झाली. काका चाटच पडले. ‘होय गं’ असं मला विचारलं. मी मानेनेच होकार दिला. ‘अगं इतके शेंगादाणे एका वेळी खाल्लेस तर आजारी पडशील की’ असं म्हणून चिंकहिल येईपर्यंत ‘असं वेड्यासारखं वागायचं नाही..एकाचवेळी एवढे शेंगदाणे खाल्लेस तर तब्येत बिघडेल ना..’ असं समजावत होते.

मलाही खूप वाईट वाटलं. असं करायला नको होतं हे पटलं. नंतर मात्र असा औदुमामाच्या दुकानातून परस्पर शेंगदाणे घेण्याचा आगावूपणा मी कधी केला नाही. पुढे मी कुर्डूवाडीहून पंढरपूरला शिकायला आले काका मात्र कुर्डूवाडीत होते. त्यांच्याकडे मी जेव्हा जात असे तेव्हा गुरुवारच्या बाजारात जाणे होतच असे. बाजारात औदूमामा चुरमुरे फुटाणे शेंगदाणेचा स्टॉल लावून बसलेले असत. त्यांची भेट झाली की आम्हाला सगळ्यांना या प्रसंगाची हमखास आठवण येत असेच.
दुसरी मोहाची गोष्ट शेंगादाण्याचीच आहे.

पंढरपूरला ओसरीवर घरात खाण्यासाठी आणि शेतात पेरण्यासाठी भुईमुगाच्या शेंगा फोडण्याचे काम सुरू होतं. दुपारच्या वेळी सात-आठ बायका हे काम करत होत्या. त्यात आमच्या घरी येणाऱ्या गोदाबाई पण होत्या. त्यांची माझ्यावर खूप माया होती. मला सुरकुतलेले म्हाताऱे शेंगांचे दाणे आवडतात हे त्यांना माहीत होतं. फोडता फोडता गोदाबाई माझ्यासाठी म्हाताऱ्या शेंगा बाजूला वेगळ्या काढून ठेवायच्या. आणि हाक मारून ‘घ्या मीरा बाई’ म्हणत द्यायच्या. एकदा त्यांनी मोठ्या वाटीभर म्हाताऱ्या शेंगा बाजूला काढून ठेवल्या आणि मला दिल्या. नुकताच माईनं शेतातल्या हिरव्या चिंचेचा हिरवी मिरची हिंग घालून चटकदार ठेचा केला होता. मी ती शेंगाची वाटी आणि अर्धी वाटी ठेचा घेऊन माडीवर गेले. चार शेंगा आणि चिमूटभर ठेचा असं खात खात ठेचा आणि शेंगा कधी संपल्या ते कळालंच नाही. मिरचीनं जिभ हुळहुळत होती म्हणून भांडंभर पाणी प्यायलं. झालं..

दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच पोटानं असहकार पुकारला. आणि परसाकडेच्या फेऱ्या सुरू झाल्या. न सांगता ही माईनं सारं ओळखलंच. ‘न ऐकण्याचे परिणाम आहेत हे’ ती ओरडली. मग तिनं नाना घरगुती उपाय केले. आणि परिस्थिती आटोक्यात आणली. जेव्हा जेव्हा शेंगा फोडायचा कार्यक्रम असे तेव्हा तेव्हा सर्वांना हा प्रसंग हमखास आठवे…
मला अजूनही शेंगांचा मोह आहे. पूर्वी मी कोल्हापूरला निघाले की नागेश काका खाऱ्या शेंगदाण्याचा पुडा अगदी न चुकता आणून पिशवीत घालून ठेवत असे..आता माझा भाऊ श्रीकृष्ण ही परंपरा पुढे चालवतो आहे.

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यातितरिष्यति।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्यच।।

खरं तर असं व्हायला हवं.. पण मोहाचे धागे चिवट असतात..तोडू म्हणता तुटत नाहीत.. मग ते शेंगदाण्यांचे असोत अथवा आपल्या माणसांचे…

Related posts

आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…

उजळता एक पणती…

वसंत ऋतूरूपी राजाचं आगमन…

Leave a Comment