ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये अक्कल काढा या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804
वनस्पतीचे नाव- अक्कल काढा
वनस्पतीचे वर्णन–
कॅपोझेटीव झुडुपवर्गीय कुळातील वार्षिक २५ ते ३० सेमी बुटकी व गुच्छासारखी वाढणारी झुपकेदार वनस्पती आहे. याच्या खोडावर व फांद्यांच्या कातडीवर अनेक गाठी असतात. पानांच्या कडांवर लहान लहान खाचा असतात. फुले गुच्छात येतात. या झाडाची मांसल फुले ७ ते १० सेमी लाल व 1 ते 1.५ सेमी जाड असतात. मधेच अधिक जाड व खालच्या व वरच्या बाजूस निमुळती असतात.
औषधी उपयोग–
मुळांचा उपयोग औषधात केला जातो. मुळ्या तिखट, उष्णतावर्धक, कफ वात शामक आहे. वात विकारात तेलात चूर्ण मिसळून मालिश करावी. अक्कल काढा हा बलवर्धक, शुक्रजंतू वर्धक, कामशक्तीवर्धक, वातनाशक, दुख निवारक म्हणजे त्रिदोषनाशक आहे. मुळामध्ये सुगंधी तेल पाथरेथ्रीन हे मुलतत्व आहे. त्यामुळे दातदुखी असल्यास याच्या मुलाच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.
हवामान व जमीन–
ही वनस्पती समशीतोष्ण वातावरणामध्ये चांगली वाढते. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हि वनस्पती चांगली वाढते. मध्यम व खोल जमीन या पिकासाठी चांगली असते.
लागवड–
बियापासून रोपे तयार करून लागवड करावी. नियमित हलकेच झारीने पाणी द्यावे. दहा दिवसानंतर बियाणाची उगवण दिसून येते. ५० ते ६० दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात.
खते–
भरपूर प्रमाणात शेणखत व सेंद्रिय खते द्यावीत. रासायनिक खतांचा उपयोग करू नये.
काढणी–
अक्कलकाढा हे वार्षिक झुडुप आहे. फुले पक्व झाल्यावर पिवळसर व नंतर राखाडी रंगाची होतात. अशा वेळेस फुलांची देठविरहीत तोडणी करून सावलीत सुकवावी. फेब्रुवारी, मार्चमध्ये फुलांचा आकार लहान होण्यास सुरुवात होते. तेव्हा पाणी देणे बंद करून झाडे सुकू द्यावीत. अर्धवट सुकल्यावर पाणी देवून झाडे उपटून घ्यावी व सुकवून फुलांची प्रतवारी करावी.
उत्पन्न–
हेक्टरी 6 ते १० क्विंटल उत्पादन मिळते. संपूर्ण झाडाचे ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. सध्या फुलाचा दर ५०० ते १००० रुपये किलो व पंचाग १५ ते ४० रु. किलो असे आहे. चूर्ण ८०० ते १४०० रु. प्रतिकिलो जातो. लागवड व मजुरीचा खर्च उत्पन्नाच्या ५० टक्के आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.