- समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे वार्षिक पुरस्कार जाहीर
- इतिहासकार केळुसकर पुरस्कार नाटककार अतुल पेठे यांना
- तर जयंत पवार स्मृती पुरस्कार संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन’ कादंबरीला
कणकवली – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आद्य इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. तर यावर्षीपासून ज्येष्ठ कथालेखक आणि नाटककार जयंत पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू करण्यात आलेल्या आणि कथा – नाटक आणि कादंबरी या साहित्य प्रकारात देण्यात येणाऱ्या जयंत पवार पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड लिखित ‘मनसमझावन’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
प्रत्येकी दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे स्वरूप असलेल्या या पुरस्कारांची निवड ज्येष्ठ कादंबरीकार प्रा.डॉ.राजन गवस आणि समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या निवड समितीने केली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही साहित्य चळवळ कोकणसह महाराष्ट्रातील गुणवंत साहित्यिकांचे लेखन चांगल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी अतिशय गंभीरपणे कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. 2024 सालच्या या पुरस्कारांची आता घोषणा करण्यात आली असून साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एकूण कामासाठी दिल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू आद्य इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी रंगकर्मी अतुल पेठे यांची निवड करण्यात आली आहे.
अतुल पेठे गेली ४५ वर्षे मराठी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सादर झाली आहेत. त्यांनी लिहिलेली – अनुवादित केलेली अनेक नाटके प्रकाशित झाली असून ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हे नाट्यविषयक पुस्तक महत्वाचे मानले जाते. रंगभूमीवर सातत्याने रंगभाषेचे नवे प्रयोग करणे आणि नाट्य संस्कृती रुजवणे याकरता त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांनी वंचित, शोषित, पीडित अशा समाजातील अनेक लोकांना घेऊन नाटक केले. त्यांच्या या एकूण कामाची दखल घेऊन केळुसकर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
तर यावर्षीपासून सिंधुदुर्ग सुपुत्र ज्येष्ठ कथाकार नाटककार आणि समीक्षक जयंत पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंत पवार यांचे मित्र ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांच्या सहयोगातून पुरस्कार सुरू करण्यात आला असून या पुरस्कारासाठी रोहन प्रकाशन प्रकाशित संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन ‘ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसलो आहोत, याचं भान ही कादंबरी वाचकाला देते.’हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’चा शोध ही कादंबरी घेते. यामुळे परीक्षकांनी मनसमझावन या कादंबरीची निवड जयंत पवार पुरस्कारासाठी केली असल्याची माहितीही श्री मातोंडकर आणि श्री बिले यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.