September 9, 2025
'बोद' हे प्रशांत आंबी यांचे आत्मकथन कचरा वेचक लेकरांच्या संघर्षमय जीवनाचा जिवंत अनुभव देतं. आईच्या कष्टांपासून शिक्षणाच्या ध्यासापर्यंतचा हा प्रवास हृदय हेलावून टाकतो.
Home » बोद – कचरा वेचक लेकरांच्या व्यथा
मुक्त संवाद

बोद – कचरा वेचक लेकरांच्या व्यथा

‘बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सारं जग आहे ही भावना मनात निर्माण करणारा तो कोंडाळा आम्ही जेव्हढे कष्ट करू तितका मोबदला आम्हाला द्यायचा.’ पुस्तकाच्या ब्लर्ब वरील ही वाक्ये वाचत असताना कोणताही संवेदनशील वाचक सुन्न होतो.

सरिता सदाशिव पवार,
कणकवली, जि. सिंधुदुर्ग

‘बोद’ म्हणजे भंगार वेचण्यासाठी कचरा वेचकांच्या पाठंगुळीला मारलं जातं ते पोतं. पाठीवर त्या पोत्याचं ओझं घेऊन शहरातील जागोजागीच्या कचरापेट्यांच्या अवतीभवती वावरणारी मूलं दिसणं ही इतर समाजासाठी सर्वसामान्य गोष्ट असते आणि तितकीच दुर्लक्षित सुद्धा. कधी त्याकडे आत्यंतिक तिरस्काराने, हेटाळणीने पाहिलं जातं तर कधी तुच्छतेने. पण त्या मुलांकडे ‘माणूस’ म्हणून पाहण्याची दृष्टी असणारे मात्र विरळाच. या पुस्तकात आपण वाचतो ‘प्रशांत आंबी’ या कचरावेचक मुलाच्या बालपणापासून तरुणाईच्या उंबरठयापर्यंतचा प्रवास. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीय. त्याच्यासारख्या अनेक वंचितांचा, त्याच्यासोबतच्या पीडित समाजाचा आणि आजही कचरा वेचून जीवन जगणं भाग असणाऱ्या अनेक कुटुंबांचा आहे जो प्रस्थापित समाजाला कधीही दखलपात्र वाटला नाही.

बाप नावाच्या व्यक्तीचं पुसटसं अस्तित्व आयुष्याला लाभलेल्या लेखकाच्या जगण्यावर आई नावाच्या योद्ध्याची कणखर, डेरेदार सावली होती. ‘इस दुनिया में सबसे बडी योद्धा माँ होती है!’ हा डायलॉग आपल्या आईच्या बाबतीत तंतोतंत खरा असल्याचं लेखक सुरुवातीलाच नमूद करतो आणि पुस्तक वाचत पुढे जात असताना त्यातली सत्यता आपल्यालाही पटत जाते. धुण्या-भांड्यांची कामं करत कोल्हापूर मधील ‘राजेंद्रनगर’ झोपडपट्टीत आपल्या लेकरांना घेऊन स्वाभिमानाने राहणारी ‘आक्का’ आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पराकोटीची आग्रही होती. घरच्या परिस्थितीमुळे भंगार वेचायला जाणाऱ्या छोट्या बहीणीसोबत हळूहळू लेखक स्वतः सुद्धा त्या कामात सहभागी झाला. पाठीला ‘बोद’ लटकवून कचऱ्यातील श्रीमंती शोधणाऱ्या या लेकरांचा जगण्याचा हा संघर्ष वाचकाला हेलावून सोडतो.

जिथे सर्वसामान्य माणूस उभा सुद्धा राहू शकत नाही अशा घाणीमधून भंगार वेचताना पांढरपेशा माणसांच्या हेटाळणीयुक्त नजरा झेलाव्या लागायच्याच पण सारं जग निवांत साखरझोपेच्या अधीन असताना पहाटेच्या निर्मनुष्य अंधारात कचऱ्यासाठी वणवण फिरणं, अनवाणी कोवळ्या पायात काटा, तारा, दगड घुसणं, कुत्र्यांशी – सापांशी होणारा जीवघेणा सामना, अनेकदा केले जाणारे चोरीचे आरोप आणि मारहाण, पावसात चिखलातून पाय घट्ट रोवत तर कधी अगदी हागणदारी सुद्धा पायाखाली तुडवत त्या चिमूकल्या पायांनी पोटासाठी संघर्षाच्या नवीन वाटा शोधणं, त्या अभावग्रस्त परिस्थितीत सुद्धा भावंडांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम करणं, एकमेकांना आधार देणं, आईच्या अपार कष्टांची जाणीव ठेवणं आणि तरीही शिक्षणाचा ध्यास न सोडणं हे त्यांच्या जगण्याचं वास्तव आपल्याला थक्क करतं. सरळ साध्या शब्दांत लिहिलेलं हे आत्मकथन खूपच प्रांजळ, प्रामाणिक आणि निखळ आहे. सहज अनुभव वर्णनातून समाजाच्या दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या, समाजाने अव्हरलेल्या चतुर्थ दुनियेतील जगणं जगलेल्या लेखकाने कुणाही विषयी जाणूनबुजून कोणतीही कटुता न दर्शविता हे लेखन केले आहे.

‘जगाला जे जे नकोसं, ते ते सगळं कोंडाळ्याला चालायचं त्यावरच अनेकांचं पोट भरायचं. घंटागाड्यांमुळे कोंडाळा ही संकल्पना नष्ट होण्याच्या आनंदाची दुसरी दुखरी बाजू म्हणजे त्यामुळे कचरावेचकांच्या पोटापाण्याचं साधन संपेल’, हे वास्तव मांडणारं हे पुस्तक वाचताना कोणताही संवेदनशील वाचक अंतर्मुख होऊन जातो. ज्यांच्याकडे अगदी सहजपणे कानाडोळा करून आपण पुढे निघून जातो त्या कचरा वेचक लेकरांच्या व्यथा-वेदना समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी नक्कीच हे पुस्तक वाचायला हवं.

पुस्तकाचे नाव – बोद
लेखक – प्रशांत आंबी
प्रकाशक – संघर्षा बुक गॅलरी
किंमत – २५० रुपये
पुस्तक घरपोच विकत घेण्यासाठी संपर्क – प्रशांत आंबी – 8421249899


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading