October 4, 2023
Dnynasagar Become Spiritual Guru in Sadguru Sea of Knowlege article rajendra ghorpade
Home » सद्गुरुंच्या ज्ञानाच्या सागरात ज्ञानसागर व्हावे
विश्वाचे आर्त

सद्गुरुंच्या ज्ञानाच्या सागरात ज्ञानसागर व्हावे

बाह्यरुपावरून त्या व्यक्तीचे सामर्थ कधी दिसत नसते. अंतरंगात त्यांचे कार्य काय आहे. यावर त्या व्यक्तीचे सामर्थ्य ठरते. तो कोणत्या जातीचा आहे ? तो किती श्रीमंत आहे ? या सर्व गोष्टी आत्मज्ञानी व्यक्तीच्या समोर गौण आहेत. त्यांना येथे काहीच महत्त्व नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

मग जातिव्यक्ती पडे बिंदुले। जेव्हा भाव होती मज मीनले ।
जैसे लवणकण घातले । समुद्रामाजीं ।। ४६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ – जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररुप होऊन त्याचा कणपणा नाहीसा होतो. त्याप्रमाणे सर्व वृत्ती मद्रुप होतात, तेव्हा त्या जाति व व्यक्ति यांच्या नावानें शुन्य पडतें.

मिठाची चव खारट आहे. पण जेवणात मीठ नसेल, तर जेवणाला चवच येत नाही. तुरट, आंबट पदार्थावर मीठ टाकले, तर त्याची गोडी वाढते. स्वतःचा अंगभूत गुणधर्म खारट आहे, पण तो इतरांची गोडी वाढवतो. अनेक मोठ्या व्यक्तींच्या यशामागे एखादा सर्वसामान्य नोकर मागदर्शक असतो. मोठमोठे उद्योगपतीही अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेत असतात. मग येथे महान कोण ? कधीकधी एखादी न शिकलेली आजीसुद्धा महान तज्ज्ञांची मार्गदर्शक असते. तिने सांगितलेले सल्ले अशी व्यक्ती जीवनात कधीही विसरत नाही. मग येथे हुशार कोण ? प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सहाय्यकाने मोठे शोध लावल्याची उदाहरणेही आहेत. मग येथे शास्त्रज्ञ कोण ? यशोदा कृष्णाची कोण होती ? ती किती शिकलेली होती ? पण तिने कृष्ण घडवला हे मान्य करावेच लागेल.

शाळेचा गंधही नसणारा कीर्तनकार उच्च पदवीधारकांना ज्ञानेश्वरीवर उत्तम निरूपण देताना पाहायला मिळतो. मग येथे श्रेष्ठ वक्ता कोण ? चौथी शिकलेली व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होऊन उत्तम प्रशासन करू शकते. देशाच्या विकासासाठी आवश्यक असणारी अनेक महत्त्वाची ध्येय धोरणे ठरवते. देशाच्या, राज्याच्या विकासासाठी मोठमोठे उद्योग उभारू शकते. मग येथे प्रशासक कोण ? सांगण्याचा हेतू इतकाच की, बाह्यरुपावरून त्या व्यक्तीचे सामर्थ कधी दिसत नसते. अंतरंगात त्यांचे कार्य काय आहे. यावर त्या व्यक्तीचे सामर्थ्य ठरते. तो कोणत्या जातीचा आहे ? तो किती श्रीमंत आहे ? या सर्व गोष्टी आत्मज्ञानी व्यक्तीच्या समोर गौण आहेत. त्यांना येथे काहीच महत्त्व नाही. यामुळेच तर चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, बाळूमामा अशा अनेक जातीतील व्यक्ती येथे महान संत झाले. त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे.

वारकरी संप्रदायाची पताका त्यांच्या कार्यामुळेच आजही ताठ मानेने फडफडत आहे. यासाठी आत्मज्ञानी कोणत्या जातीचा आहे. याला महत्त्व नाही. येथे अंतरंगातील भावाला महत्त्व आहे. त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञानाला महत्त्व आहे. त्याच्या भक्तीला महत्त्व आहे. नाथ संप्रदायामध्ये सर्व जातीधर्माचे संत झाले. व्यक्ती कोणत्या जातीची आहे. यापेक्षा त्याची भक्ती किती आहे ? त्याचा भाव कोणता आहे ? यानुसार येथे ज्ञानदान होते. हे ज्ञान मिळवण्याची त्याची ओढ किती आहे ? हेच पाहिले जाते. जागतिकीकरणाने आता जातीधर्माच्या भिंती मोडल्या गेल्या आहेत. सर्वांना ज्ञानाचा हक्क मिळाला आहे. पण पैशाने आज हे ज्ञान तोलले जात आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी या पैशाचीही गरज नाही. सद्गुरुंच्या ज्ञानाच्या सागरात या व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्ती, व्यक्ती न राहाता ज्ञानाचे सागर होऊन जातात. सद्गुरुरुप होऊन जातात.

Related posts

सद्गुरु हे आनंदाचा अखंड झरा

ज्ञान पक्व झाले तरच अज्ञान दूर होईल

वैज्ञानिक नजरेतूनच होते अध्यात्मिक प्रगती 

Leave a Comment