जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे 1990 च्या नंतर कविता व गझलांमध्ये बदल जाणवू लागले . ती एका गझलमध्ये साचा, ढाचा व वाचा असे तिन्ही अंगाने ती बदलत गेली. २००१ नंतरची गझल तर खूपच आश्वासक आहे. एक काळ असा होता ‘ गझल ‘ शब्द शब्दकोषात पाहिला जाई.
रोहिदास पोटे,
नवीन पनवेल, नवी मुंबई. मो. ९८९२१०३५०८
माणसाने असे जगले पाहिजे माणसासारखे वागले पाहिजे ” हा असा शेर लिहिणारे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे घेऊन आले आहेत. आपली “एक कैफियत. पुण्याच्या महाजन पब्लिकेशनने प्रकाशित केलेला हा गझलसंग्रह म्हणजे त्यांच्या नव्या शैलीची झलक आहे. ती नुसती शैली नाही तिला तत्त्वाधिष्ठित विचारांची धार आहे. तिच्यात अन्यायावर वार आहे अन् नाठाळांना शाब्दिक मार आहे . माणूस आणि मानवतावाद यांची ही गझल यार आहे. आज सगळ्यात महत्त्वाची गरज कोणती असेल तर ती माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. तसे घडले तर जगातले सगळे प्रश्न मिटतील. एकूण समाजाचे कल्याण, चांगली नजर अन् इतरांची कदर एवढे जरी सर्व माणसांनी केले तरी जगात देवांचे राज्य येईल. पण माणसं तशी वागत नाहीत म्हणून कवीला , विचारवंतांना लिहावं लागतं.
प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे कवी, कादंबरीकार आहेत. कविता आणि कादंबरी या दोन्ही क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. ‘ एक कैफियत ‘ घेऊन त्यांनी गझल प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे. त्यांची ही गझल एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातील आहे. या दशकातील गझल आकार, आशय व आकलन या त्रिमितीत ती आतून उमलते फुलते. तिच्यात सल आहे, बळ आहे. विचारांचा तळ आहे. ती जशी नीट आहे तशी ती धीट आहे. ही गझल जेवढी नाजुक तेवढीच कणखर, जेवढी संयमी तेवढीच वैचारिक आक्रमक, ती सत्याची चाड व अन्यायाची चीड व्यक्त करते. ती कुणाचाच मुलाहिजा ठेवत नाही. तिला वावग्याचा वीट आहे अन् संस्काराचा तीट आहे. ती तंत्रात जेवढी शुध्द तेवढीच विचारात प्रबुध्द आहे. तिच्यात इष्क आणि दिल आहे व संवेदनशील आहे.
‘एक कैफियत ‘ या गझलसंग्रहाला ज्येष्ठ गझलकार अे. के. शेख यांची प्रस्तावना लाभली आहे तर ज्येष्ठ गझलसंशोधक व गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा मलपृष्ठावरील अभिप्राय आहे . या गझलसंग्रहात एकूण ८७ गझला आहेत. प्रेम, इष्क, समाजकारण, राजकारण, जीवनचिंतन अशा विविध आशयसूत्रात या गझला गुंफल्या आहेत. तंत्राची शुध्दता, खयालांची समृध्दी, रचनेतील औचित्य व सुगम राबता यामुळे गझलेला एक घाट निर्माण झाला आहे म्हणूनच तिचा घाट व थाट वेगळा आहे. ‘ शेर ‘ हे गझलचे एकक आहे या एककाचा गझलकार कसा वापर करतो त्यावर गझलची उंची अवलंबून असते. म्हणूनच गझलकार जसा कवी असतो तसा तो ‘ कलावंत ‘ असतो . कला जशी तशी गझल प्रकटते , गझलेचा शेर खयालातून तंत्र तर तंत्रातून खयाल असा दुहेरीपध्दतीने येतो.
परमेश्वराला प्रार्थना करताना गझलकार म्हणतो
“आज नाही फार काही मागणे माझे दयाळा “
रंजल्यांना हात तू दे सांगणे माझे दयाळा “
‘ जे का रंजले गांजले ‘ या संत तुकारामाच्या अभंगाचे स्मरण होते. तुकारामांच्या अभंगाशी नाते सांगणारी ही वैचारिक भूमिका आहे. ‘ उजेडा तुला आत व्यापून घेतो तुझी प्रीत काळोख ‘ मापून ‘ घेतो ” काळोखाला मापून घेणारी व उजेडाला आत जागा देणारी ही वृत्ती एका व्यापक विचारांची अनुभूती देणारी ही दृष्टी आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी . प्रा . डॉ . बाळासाहेब लबडे यांची सामाजिक व मानवतावादी विचारसरणी आहे . ती सामान्य माणसांचा , कष्टकरी जिवांचा विचार करणारी आहे . त्यांच्या गझलेत माणूस आणि माणूस आहे . ‘ माणूस ‘ केंद्रबिंदू आहे आणि त्याचे कल्याण ही त्याची परिभाषा आहे . एका सुंदर विचाराची ही सुंदर गझल आहे.
” बाकी काही नाही एकच करतो आहे माणुसकीचा देव्हारा मी भरतो आहे ” माणसात देव आहे म्हणून माणुसकीचा देव्हारा त्यांना भरलेला पाहिजे. माणुसकीच्या देवालयात त्यांना माणसांची कदर व दुखितावर नजर पाहिजे. परार्थ जाणिले पाहिजे ही संतवृत्तीची जाणीव ते संवेदनशीलवृत्तीने मांडतात. सामाजिक आर्थिक विषमतेवर भाष्य करताना ते म्हणतात
” वाढल्या उंच मोठ्या हवेल्या
झोपड्यांवर पडे घाव येथे “
आहे रे व नाही रे ! या दोन वर्गातील अंतर वाढत आहे . झोपडीचे गीत गाणारा हा शायर आर्थिक दरीचे विषमतेचे नेमक्या शब्दात यथार्थ वर्णन करतो . सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या गझलेचा मध्यवर्ती कणा आहे . शेती आणि शेतकरी याबद्दलचे वास्तव वर्णन करताना गझलकार नेमका शेर देतात.
” जाहली बर्बाद शेती आमची ही
गंजलेल्या नांगरांचा फाळ आम्ही” गंजलेल्या नांगराचा फाळ ‘ या शब्द प्रतिमातून शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीचे वास्तव चित्र उभे केले आहे. शेती तोट्यात, गुरे नाहीत गोठ्यात, घर धुवून जातं कर्जाच्या रेट्यात आणि खाली उरते ” आत्महत्या ” या जीवघेण्या शेतकीचे चित्रण गझलकार नुसते सांगत नाहीत तर ती वेदना व्यक्त करतात. राजकारण म्हणजे गजकरण गजकरणाला कधी आणि कशी खाज येईल हे जसे सांगता येत नाही तसे राजकारणात सत्तेसाठी कधी कुठे अन् कशी खाज येईल अन् माज येईल त्याचा काही भरवसा नाही .
महात्मा गांधीचा भारत आज राजकारण्यांनी कसा ठेवला आहे हे सांगताना –
” देश माझा भोजनाची मेस बापू “
“लावली आम्ही इथेही रेस बापू “
देशाला मेस समजून फक्त खाणे व त्यातही स्पर्धा लागली आहे नेत्यांची . म्हणजे ‘ नेता ‘ या शब्दांचा अर्थ जो नेतो तो नेता . राजकारण गट – तट , पक्ष , संप्रदाय व त्यांची विचारसरणी यावर भाष्य करताना प्रा . डॉ . बाळासाहेब लबडे अचूक करतात
“असतोच बेफाम उजव्यात कावा
करतो आता मीच विद्रोह भावा “
त्या ‘ बेफाम ‘ काव्याला विद्रोह करण्याची धीट भाषा ही गझलेतील बदलत्या खयालाचे वैशिष्ट्य आहे.
” हिंदू , इसाई , मुस्लिम वा ख्रिस्ती
घेऊ नये धर्म पाहून चावा “.
अखिल मानव जातीचे कल्याण करणारा धर्म असावा . धर्मभेद , जातिभेद व विचारभेद यातून टोकाची भूमिका घेऊन केवळ ‘ धर्म ‘ म्हणून कोणीच कोणत्या धर्मावर हल्ला करू नये . आपल्या धर्मावर प्रेम करावे पण इतरांचा द्वेष करू नये . ‘ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ या सानेगुरूजींच्या विचारांचा विसर पडत आहे . विचार आचार आणि उच्चार यात सुसंगती असावी ही संतमहात्मांची शिकवण प्रा. डॉ . बाळासाहेब लवडे आपल्या विविध शेरातून उपरोध व उपहासातून व्यक्त करतात.
स्त्री आणि स्त्रीजीवन याबद्दल आदराची भावना व सन्मानाची भाषा त्यांनी केली आहे . स्त्री ,आई , पत्री , मुलगी , वाहिनी , बहीण , मावशी , आत्या , चुलती व या जगाची आई आणि शेवटी स्त्री अशा विविध भूमिका नात्यात निभावते . तिचा त्याग , कष्ट , मेहनत हे सर्व पुरुषांनी समजून घेतले पाहिजे म्हणून ते म्हणतात
” तोकड्या मेंदूनो खरे ऐका
नीट समजून जगात घ्या बाई”
बाईला स्त्रीला समजून घेतले पाहिजे. स्त्री जन्माचा आदर व कदर केली पाहिजे . “
“माणसांनी तोडल्या गर्भातल्या का सान कलिका
बांधण्याला सान राखी लागते ना गोड ताई” ‘
प्रेम , इष्क हा विषय गझलेचा स्थायीभाव आहे . प्रेमातील विविध कंगोरे दिल , दर्द , विरह , विफलता या गोष्टी प्रेमाबरोबर येतातच.
प्रा. डॉ. लबडे प्रेमातील उत्कटता आणि नशिली अदा व्यक्त करताना म्हणतात
“छान नशीली अदा ती गुलाबी हवा
वाढला श्वास अन् तू मला चाळले “
प्रेमभंग विरहावर कोणते औषध असेल तर ” मीलन ” ते व्यक्त करताना शायर लिहितात
“प्रेम जर भंगले कोणती दवा आहे
ना दवा कोणती फक्त ती हवा आहे” समाज व राजकारणावर लिहिताना त्यांची लेखणी निर्भीड होते मात्र प्रेम इष्कावर लिहिताना ती हळवी अन् भावूक होते किंवा 11
“‘ मी तुला पाहता तू मला माळले एकमेकावरी जीव ओवाळले ” “
” नजर ही चोरटी धुंद ही साजणी
लाजली हासली अधर झाकाळले “
माधव जूलियन व माधव जूलियन पध्दतीची गझल, सुरेश भट व सुरेश भट पध्दतीची गझल, सुरेश भटानंतरची गझल आणि आता एकविसाव्या शतकातील गझल असे गझलचे टप्पे पडतात . त्या त्या टप्प्यात कमीअधिक प्रमाणात अनुकरण झालेली, समीक्षकांनी म्हणावी तशी गझलेची दख्खल घेतली नसेलही पण एकविसाव्या शतकातील गझल आज एका नव्या वळणावर आली आहे.
जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे 1990 च्या नंतर कविता व गझलांमध्ये बदल जाणवू लागले . ती एका गझलमध्ये साचा, ढाचा व वाचा असे तिन्ही अंगाने ती बदलत गेली. २००१ नंतरची गझल तर खूपच आश्वासक आहे. एक काळ असा होता ‘ गझल ‘ शब्द शब्दकोषात पाहिला जाई. आज गझल झोपडीत, शहरात , खेड्यात अन् महानगरात पोहोचलीच नाही तर तिने चांगले बळ प्राप्त केले आहे. ती आज तारुण्यात आहे म्हणून तिचे कौतुक झाले पाहिजे . साचा म्हणजे तंत्र , ढाचा म्हणजे घाट व वाचा म्हणजे वाणी अर्थात खयाल या तिन्ही दृष्टीने गझल बदलत आहे . ”
प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची गझल बदललेली आहे. तिच्यात तंत्र आहे पण ते ‘ मंत्रात ‘ आहे. ढाचा म्हणजे घाट तिचा एक घाट आहे एक थाट आहे आणि वाचा म्हणजे खयाल समृध्द आहे. अशा तिन्ही अंगाने ती ‘ झोकात ‘ आहे म्हणून तिची दखल घेतलीच पाहिजे . रचना साधी आहे. प्रासादिक आहे पण त्यातील खयाल नाविन्यपूर्ण आहे, ती पोटतिडकीने लिहिते
“एवढा रक्तात माझ्या स्फोट व्हावा
” प्रेम देण्या बंधुत्वा प्रस्फोट व्हावा ” स्फोट अन् प्रस्फोटाची भाषा बोलणारे प्रा. डॉ. बाळासाहेब प्रेम आणि बंधुभावाचे हे संतवचन आपल्या खास शैलीत ढंगात सांगतात हाच ‘ नवा ढाचा आहे. प्रा. डॉ. लबडे यांची गझल अशी आहे. तिचा रंग , तिचा ढंग आणि सामाजिक बांधिलकीचा तिचा चंग अधोरेखित करण्यासारखा आहे. गझल ही काळजाची भाषा ती ती काळजावर कोरली जाते पण हे कोरीवकाम करताना खूप खवरदारी घ्यावी लागते . तिच्यात नैसर्गिकता आणण्याचे कसब गझलकाराकडे आहे . तिच्यात प्रेम आहे . जिव्हाळा आहे . तिच्यात रोखठोकपणा आहे . स्त्रीत्वाच्या वेदना आहेत , स्त्रीत्वाचा सन्मान आहे . दीन दुबळ्यांना आधार आहे . तिची नजर घारीसारखी तळागाळातल्या माणसावर आहे . तिच्यात केवळ शब्दांची आतिषबाजी नाही तर शब्द आणि अर्थ यांचा सुरेख संगम आहे . ती शब्दांची मोडतोड करीत नाही अर्थाची तडजोड करीत नाही शब्दांना जिभा फुटाव्यात अशी ती शेरातून चैतन्य निर्माण करते . गझलेतील ‘ शेर ‘ हा शेर वाटला पाहिजे त्या शेराची ‘ मांजर ‘ होऊ नये याचे अवधान गझलकाराला घ्यावे लागते . प्रा . डॉ . बाळासाहेबांची गझल हे नक्कीच करते . वृत्त रचनेची उत्तम जाण , शेरांची उत्कृष्ट बांधणी यामुळे त्यांची गझल वाचनीय आहे . सुगम , कूट , प्रश्नार्थक व अव्ययबोधक हे जे राबत्याचे प्रकार आहेत त्यातील सुगम राबता त्यांनी जास्तीत जास्त वापरला आहे . प्रश्नार्थक राबता केवळ दोन – तीन ठिकाणी आलेला आहे . त्यांची गझल स्वतंत्र वृत्तीची आहे . ती कुणाचे अनुकरण करीत नाही . शिवाय गुळगुळीत झालेले काफिये ( कवाकी ) ते वापरत नाहीत . पहिलाच गझलसंग्रह असूनही त्यात नाविण्य आहे . त्यांच्या गझलेतील फुलांच्या पाकळ्या उमलत जाण्यात तसे शेर उमलत जातात . प्रत्येक पाकळी स्वतंत्र असून ती देठाशी बांधलेली असते अगदी तसे गझलेतील शेर स्वतंत्र असूनही ते काफिया रदीफ यांनी जोडलेले असतात गझलेचे हेच वैशिष्ट्य आहे.
पुस्तकाचे नाव : ‘एक कैफियत’ ( गझलसंग्रह )
गझलकार : प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे
प्रकाशक : महाजन प्रकाशन, पुणे
संतोष धोंगडे: मुखपृष्ठ :
पृष्ठे : ११० किंमत : २०१ रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
गुलाम…