सुरुवातीला ग्राहक रेडिओचा आकार खूप मोठा होता. त्यामध्ये निर्वात नलिका वापरल्या जात. मात्र १९५४ मध्ये अर्धवाहक ट्रांझिस्टर टेक्नॉलॉजी विकसीत झाली. रेडिओचा आकार आणि नावही बदलले. पुढे लोक रेडिओला ट्रांझिस्टर म्हणू लागले. रेडिओचा अडिच फूट लांबीचा आकार कमी होऊन तो खिशात बसू लागला.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
साधारण पन्नासेक वर्षांपूर्वी लग्नाचा मुहुर्त कायम टळत असे. हुंडाबंदीचा हवा तेवढा प्रसार झाला नव्हता. बहुतांश लग्नात हुंडा देणंघेणं असायचे. अपवाद वगळता यात वधुपक्ष देणारा आणि वरपक्ष घेणारा असायचा. लग्न जमवताना सर्व ठरलेले असायचे. तरीही अनेकवेळा लग्नाला उशीर व्हायचा कारण नवरदेव रूसायचा. नवरदेव का रूसला म्हणून चर्चा सुरू व्हायची… आणि कारण एकंच असायचे, ‘नवरदेवाला मर्फीचा रेडिओ अन एचएमटीचं घड्याळ पाहिजे’. ग्रामीण भागात सर्रास दिसणारे हे चित्र. पुढे वधुपिता मागण्यापूर्वीच रूकवतात रेडिओ ठेवू लागले. जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या रेडिओचा शोध खरंच क्रांतीकारी शोध आहे.
रेडिओच्या शोधाचा इतिहास म्हणजे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञान विकासाचा इतिहास आहे. रेडिओच्या प्रारंभाचा पाया १८६५ मधील जेम्स क्लर्क मॅक्सवेल या भौतिकशास्त्रज्ञाच्या चार सूत्रांच्या सादरीकरणामध्ये घातला. त्यांनी प्रकाश, रेडिओ आणि क्ष-किरणे ही प्रकाशाची रूपे असून सर्व विद्युतचुंबकीय लहरी असल्याचे सांगितले. १८८६ ते १८८८ या काळात हेन्रिच हर्ट्झ यांनी हवेतून अशा कृत्रिम विद्युतचुंबकीय लहरी पाठवण्याचे तंत्र विकसित केले. याच हर्ट्झ महोदयांच्या स्मरणार्थ वारंवारिता भौतिकराशीच्या एककाला नाव देण्यात आले. जे प्रत्येक रेडिओ केंद्रावर ऐकावयास मिळते. हर्ट्झ यांच्या प्रयोगामुळे मॅक्सवेल यांचे संशोधन बरोबर असल्याचे प्रात्यक्षिक पुरावे मिळाले. पुढे वीस वर्षे या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. भारतातही जगदिशचंद्र बोस यांनी विनावाहक, विद्युतचुंबकीय लहरी पाठवण्याचे यशस्वी प्रयोग केले.
इंग्लंडमध्ये हा प्रयोग ऑलिव्हर लॉज यांनी केले. त्यांनी प्रयोगशाळेतून पाठवलेल्या तरंगाना सभागृहामध्ये पाठवत लोकांना मॅक्सवेल यांची सूत्रे आणि हर्ट्झ यांचे प्रयोग सत्य असल्याचा पुरावा दिला. १८९० ते १८९२ या कालखंडात तीन संशोधक जॉन पेरी, फ्रेडरिक थॉम्सन ट्रॉउटन आणि विल्यम क्रुक यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग समुद्री प्रवासामध्ये करण्यासाठी संशोधन सुरू केले. तसेच वाहकांविना तार पाठवण्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी क्रुकस यांनी प्रयोग सुरू केले. मात्र या विद्युतचुंबकीय लहरीमध्ये एखादा अडथळा आला की पुढे जात नसत. तसेच ढग आणि पावसाच्या दिवसातही मर्यादा येत असे. याच काळात सर्बियातून अमेरिकेत गेलेले संशोधक-तंत्रज्ञ निकोला टेस्ला यांनी असे विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करणारी आणि त्यांना पकडणारी उपकरणे बनवली. याच काळात अमेरिकेतील ‘दि इलेक्ट्रिशियन’ नियतकालिकांने जगदिशचंद्र बोस यांच्या कार्याचे कौतुक केले.
रशियन संशोधक अलेक्झांडर स्टेपनोविच पोपोव यांनी हे तंत्रज्ञान विकसीत केले. जगभरातील संशोधकांमध्ये एक संशोधक आपले कार्य नेटाने पुढे नेत होता, तो म्हणजे गुग्लिल्मो मार्कोनी. त्यांनी जगभरातील संशोधकांचे प्रयोग अभ्यासले आणि सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येतील असे परावर्तक पारेषक (ट्रांसमिटर) आणि ग्राहक (रिसिव्हर) बनवले. तसेचं भौतिक अडथळा न जुमानता पुढे जाणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचा पट्टा वापरला. प्रत्यक्षात मार्कोनी यांनी प्रत्येकाच्या प्रयोगातील उपयुक्त गोष्टी एकत्र करून आपला प्रयोग केला आणि रेडिओ तरंगाचा संवादसाधन म्हणून उपयोग शक्य असल्याचे दाखवले. मात्र हे संदेश वहन फक्त अर्धा मैल अंतरापर्यंत करता येई. मार्कोनी यांनी पारेषक मनोऱ्यांची उंची वाढवली. यामुळे दोन मैल अंतरापर्यंत संदेशवहन होऊ लागले. मार्कोनी यांनी आपल्या शोधाचे ब्रिटनमध्ये स्वामित्त्व हक्क मिळवले. पुढे अमेरिकेत या शोधाच्या श्रेयावरून टेस्ला आणि मार्कोनी यांच्यामध्ये कायदेशीर लढाई झाली. ही लढाई टेस्ला यांनी जिंकली. मात्र निकाल येण्यापूर्वीच टेस्ला यांचे निधन झाल्याने ‘रेडिओचा जनक’ म्हणून मार्कोनी हेच कायम राहिले.
पुढे मार्कोनी यांनी १८९७ मध्ये विनावाहक संदेशवहन उपकरणे बनवणारी कंपनी सुरू केली. १९०४ पर्यंत समुद्रपर्यटनामध्ये ही प्रणाली एक महत्त्वाची प्रणाली बनले. टायटॅनिक अपघातात काही जीव केवळ मार्कोनी यांच्या तंत्रज्ञानामुळेच वाचू शकले, असे आजही मानले जाते. या तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते रेजिनाल्ड फेस्सेन्डेन यांना हे तंत्रज्ञान आणखी चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकते, यावर विश्वास होता. त्यांनी आपली उपकरणे विकसीत केली आणि आवाजाचे विद्युतचुंबकीय लहरीत आणि विद्युतचुंबकीय लहरीचे पुन्हा ध्वनीलहरीत वेगाने रूपांतर करणारी उपकरणे बनवली आणि १९०० मध्ये प्रथमच एक मैल अंतरावर भाषण ऐकवले. मात्र आवाजामध्ये खरखर खूप येत होती. त्यामध्ये सुधारणा करत ही खरखर कमी केली. पुढे स्वत:च्या पत्नीचे आत्मचरित्र ऐकवले. त्यानंतर कादंबरी वाचन, व्हायोलिन वादन आणि बायबलचे उतारे वाचण्यासाठी ही यंत्रणा वापरण्यास सुरुवात केली. त्याचं दरम्यान अमेरिकेत ली डी फॉरेस्ट यांनी १९०७ मध्ये आपली प्रसारण यंत्रणा विकसीत केली. त्यांनी सर्वप्रथम युजेनिया फरार यांचे ‘आय लव्ह यु ट्रुली’ हे गाणे प्रसारित केले.
हेग येथे नेदरलँडचे संशोधक हॅन्सो झेर्डा यांनी १९१९ मध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी प्रथमच हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. मात्र १९२४ मध्ये ही कंपनी आर्थिक अडचणीत आली आणि बंद पडली. १९२० पासून अर्जेंटिनामध्ये रात्री ९ वाजता नियमीत प्रसारण सुरू झाले. अमेरिकेत ऑगस्ट १९२० पासून बातम्या देण्यासाठी आणि मनोरंजन कार्यक्रमासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. त्याचसोबत अमॅच्युअर रेडिओची सुरुवात झाली. तोपर्यंत तंत्रज्ञान प्रगत झाले. एकाच प्रसारण केंद्राचे कार्यक्रम १०० मैलापर्यंत ऐकता येऊ लागले. पुढे हे अंतर १६०० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात यश आले. १९२२ पासून इंग्लंडमध्ये मार्कोनींची कंपनीमार्फत नियमीत रेडिओ सेवा सुरू झाली.
सुरुवातीला ग्राहक रेडिओचा आकार खूप मोठा होता. त्यामध्ये निर्वात नलिका वापरल्या जात. मात्र १९५४ मध्ये अर्धवाहक ट्रांझिस्टर टेक्नॉलॉजी विकसीत झाली. रेडिओचा आकार आणि नावही बदलले. पुढे लोक रेडिओला ट्रांझिस्टर म्हणू लागले. रेडिओचा अडिच फूट लांबीचा आकार कमी होऊन तो खिशात बसू लागला. भारतातही १९२३ मध्येच मुंबई आणि कलकत्ता येथे रेडिओ क्लबची स्थापना केली. १९२७ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीची स्थापना केली. १९३० मध्ये या कंपनीचे दिवाळे निघाले. १९३६ मध्ये ऑल इंडिया रेडिओची सुरुवात झाली. १९४७ मध्ये सहा रेडिओ स्टेशन्स सुरू झाली. १९५७ मध्ये विविध भारती सुरू करण्यात आले. १९७७ मध्ये एफएम रेडिओ केंद्र सुरू झाली. १९९० पासून खाजगी रेडिओ केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. आज २४ तास काही केंद्राचे प्रसारण सुरू असते. आज मोबाईलमध्येही रेडिओचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. नैसर्गिक आपत्तीची सूचना देऊन लाखो जीव वाचवणारे हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
