निवृत्ती जोरी यांची “खटपट.. एक नवी उमेद” ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचून मी हातावेगळी केली. लेखक म्हणाले तुम्हीच या कादंबरीचे पहिले वाचक आहात. त्यामुळे अभिप्राय द्या आणि वाचकांना सांगा कादंबरी कशी आहे…यासाठी हा खटाटोप…
डॉ. तुकाराम मोटे,
विभागीय कृषी सहसंचालक,
छत्रपती संभाजीनगर. (सेवानिवृत्त)
निवृत्ती जोरी यांची २०२४ मध्ये प्रकाशित झालेली पहिली कादंबरी “तडजोड.. गुंता सोडवणारी किल्ली” ही अल्पावधीत फारच लोकप्रिय झाली आणि आता ही दुसरी कादंबरी पण त्याच दिशेने जाणार याचा मला ठाम विश्वास आहे. कृषि विभागात वर्ग २ पदी सेवा देत देत लगोलग दोन कादंबऱ्या वाचकांच्या हाती देऊन त्यांनी स्वतःला एक चांगले लेखक म्हणून सिद्ध केले आहे. ग्रामीण ढंगाच्या या दोन्ही कादंबऱ्या निश्चित वाचकप्रिय ठरतील. कृषि विभागात निवृत्ती जोरी यांच्या सारखा लेखक असणे ही अभिमानाचीच बाब आहे.
निवृत्ती यांनी लहानपणापासूनच तहसिलदार होण्याचे स्वप्न उरी बाळगले होते आणि ते साध्य करण्यासाठी त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले याचा लेखाजोखा म्हणजे “खटपट..एक नवी उमेद” ही कादंबरी. ही कादंबरी वाचताना विशेषतः ज्यांनी ग्रामीण जीवन व्यतीत केले आहे त्यांना आपणच हे पात्र जगत आहोत असा पदोपदी भास होतो. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी नाउमेद न होता जिद्द, चिकाटी कायम ठेवून संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेला प्रयत्नवाद जिवंत ठेवला तर यश आपलेच असते हा या कादंबरीचा आत्मा आहे.
निवृत्ती यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्टपण घेतले. त्यांच्या या प्रवासात घरची आर्थिक परिस्थिती त्यांच्या स्वप्नाआड कशी येत गेली, कोणकोणत्या अडचणी आल्या व त्यावर त्यांनी कशी मात केली आणि यामध्ये त्यांची झालेली प्रचंड कुचंबणा वाचून मन हेलावून जाते. अनेक कारणाने लेखकाला तहसिलदार तर होता आले नाही परंतु प्रचंड कष्टाने, अनेक वर्ष जिद्द, चिकाटी कायम ठेवून नाउमेद न होता प्रयत्नवादाने त्यांनी अनेक पदे स्पर्धा परीक्षेतून कशी मिळवली याचे वर्णन जर ग्रामीण विद्यार्थ्यांनि वाचले तर ते त्यांना नक्की दिशादर्शन ठरेल.
ग्रामीण भागात आणि त्यातही दुष्काळी गावात लेखकाचा जन्म. घरी गरिबी पाचवीला पुंजलेली. त्यामुळे लेखकाला पहिली ते दहावी आजोळी शिक्षण घ्यावे लागले. बारावीनंतर बीएस्सी कृषि व एमएस्सी कृषि शिक्षण घेताना त्यांच्या वडिलांची म्हणजे नानाची कशी आर्थिक ओढाताण झाली, याचे सुंदर वर्णन लेखक करतो. अनेक कारणाने स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही. बेकार म्हणून फिरताना समाज कसे टोमणे मारून नाउमेद करतो हे पाहून लेखकाला आपण शिकून चूक केली का असा प्रश्न पडतो. बापाच्या जीवावर किती दिवस जगायचे असे लेखक स्वतःलाच विचारतो. गरिबांचे जगणं किती वाईट असते याचा प्रत्यय या कादंबरीत पदोपदी येतो. लेखकाचे जीवन म्हणजे न संपणाऱ्या अडचणीं. एक संपली की दुसरी दारात उभी. या अडचणीच्या काळात नात्यागोत्यातील माणसांपेक्षा कृषी विद्यापीठातील वरिष्ठ व कनिष्ट मित्र कसे धाऊन येतात हे फारच वाचनीय आहे.
शिक्षण हा तुम्हा-आम्हा साधारण माणसांच्या उन्नतीचा एकमेव मार्ग; या धारणतून बिकट परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी झालेली होरपळ आणि कुचंबणा सोसणाऱ्या निवृत्तीनं नोकरीतील संघर्षाचे अनुभव 'खटपट - एक नवी उमद' या पुस्तकात अतिशय तरलतेने मांडलेले आहेत. यामध्ये लेखकाने फक्त आपलेच जगणे मांडलेलं नसून जीवनाच्या स्पर्धेतील सर्वच उपेक्षितांची एक व्यवस्था वाचकांसमोर उभी कली आहे; म्हणजेच ही फक्त एका निवृत्तीचीच गोष्ट उरत नाही, तर ती आपोआप एका मोठ्या समूहाची होते. संपूर्ण निवेदनाच्या केंद्रस्थानी धडपड करणाऱ्या आत्मकथतील नायकाने स्वतःला 'कष्टचक्रासह' अतिशय तरलपणे चित्रित कलेले आहे, हेही लेखकाच्या लेखन शैलीच विशेष.
निवृत्तीची ही आत्मचरित्रात्मक कादंबरी स्पर्धेच्या युगातील नवतरुणांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी नक्कीच एक नवी उमेद व चैतन्य निर्माण करणारी उत्तम कलाकृती ठरेल. अतिशय प्रवाही भाषा, संवेदनशील मन, जगण्याविषयीचा व्यापक सहानुभाव हे कादंबरीच अजून एक वैशिष्ट्य म्हणून या लेखनाकडे पाहता येईल.
- श्रीकांत देशमुख
(माजी सनदी अधिकारी आणि साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित लेखक.)
पुस्तकाचे नाव – “खटपट.. एक नवी उमेद”
लेखक – निवृत्ती जोरी संपर्क : ९४२३१८०३९३, 8668779597
प्रकाशन – सकाळ प्रकाशन 8888849050
किंमत – ₹२९९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
