आजही शिकलेल्या व पत्रकार असलेल्या महिलांनाही राजधानी सारख्या ठिकाणी पत्रकार परिषदेत प्रवेश दिला जात नाही. ग्रामीण भागातील महिलांच्या अन्याय अत्याचाराला तर सीमाच नाही. अशावेळी ‘ती’ कुणाच्या सावलीत जगते, ‘ती’ कुणाच्या तालावर नाचते, ‘ती’ अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी कोणता संघर्ष करते? तिचा खडतर प्रवास प्रसिद्धीसाठी नाही तर माणूस म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी, आत्मशोधाची लढाई आहे. या तिच्या अवकाशाचा शोध घ्यायचा असेल, शब्दांच्या मागे उभा असलेला तिचा श्वास समजून घ्यायचा असेल तर ‘कुळवाडी दिवाळी स्त्री विशेषांक ‘जरूर वाचायलाच हवा.
प्रा. डॉ. शंकर विभुते, नांदेड
भ्र. ७५८८०६८०५६
‘मेरी क्युरी’ नोबेल पारितोषिक दोनदा मिळवणारी पहिली महिला, मलाला युसुफझई ; नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण स्त्री, डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार मिळावा म्हणून अप्रत्यक्ष प्रचंड दहशत असतानाही मारिया कोरींना माचाडो यांनी मिळवलेला नोबेल पारितोषिक, तिनशे बावीस दिवस अंतराळात राहून आलेली सुनीता विल्यम्स, वेगवेगळ्या क्षेत्रातील नाम मुद्रा उमटलेल्या कर्तृत्ववान महिला, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, मदर तेरेसा, इंदिरा गांधी कल्पना चावला, लता मंगेशकर, मेरी कोम, किरण बेदी अशी नावे डोळ्यासमोर आली की महिला व पुरुष समान आहेत. समान दर्जा व गुणवत्तेला वाव आहे असं पुरुषप्रधान मानसिकतेला छान वाटेल असे विधान करता येते. पण ही नावे बोटावर मोजण्यासारखीच आहेत. आजही स्त्रियांना भारतात व जगात पावलोपावली, क्षणोक्षणी संकटांना, समस्यांना व आव्हानांना सामोरे जावे लागते.
आजही शिकलेल्या व पत्रकार असलेल्या महिलांनाही राजधानी सारख्या ठिकाणी पत्रकार परिषदेत प्रवेश दिला जात नाही. ग्रामीण भागातील महिलांच्या अन्याय अत्याचाराला तर सीमाच नाही. अशावेळी ‘ती’ कुणाच्या सावलीत जगते, ‘ती’ कुणाच्या तालावर नाचते, ‘ती’ अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी कोणता संघर्ष करते? तिचा खडतर प्रवास प्रसिद्धीसाठी नाही तर माणूस म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी, आत्मशोधाची लढाई आहे. या तिच्या अवकाशाचा शोध घ्यायचा असेल, शब्दांच्या मागे उभा असलेला तिचा श्वास समजून घ्यायचा असेल तर ‘कुळवाडी दिवाळी स्त्री विशेषांक ‘जरूर वाचायलाच हवा.
डॉ. माधव जाधव हे फक्त या अंकाचे संपादक नाहीत तर ते एक साहित्यिक, वक्ते, उत्तम निवेदक, समीक्षक आणि नांदेड विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. शासनाच्या पारितोषिक सोबतच अनेक सन्मानाची पारितोषिके त्यांच्या साहित्याला प्राप्त झालेले आहेत. सांगण्याचा हेतू संपादकाची ओळख करून द्यावी म्हणून नाही तर त्यांना एक दृष्टी आहे, दिशा आहे आणि संवेदनशील मन आहे.
ते या अंकाच्या निर्मितीची भूमिका विशद करताना म्हणतात,” हे वर्षे भारतीय स्त्री चळवळीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे स्त्री विशेषांकाची कल्पना पुढे आली. स्त्री जन्मत नाही तर ती जन्मानंतर घडविले जाते त्यामुळेच ती दुय्यम ठरते, या पार्श्वभूमीवर स्त्रीच्या जीवनाबद्दल आणि तिच्या भावविश्वाबद्दल समकालीन प्रतिभाशाली व वैचारिक विचारवंता कडून जाणून घ्यावे हा या विशेषांक निर्मिती मागचा हेतू होता”(पृ.२) त्यामुळे त्यांनी संपादित केला हा दिवाळी अंक ‘मानवतेची’ भूमिका ठेवणाऱ्या प्रत्येकानी घरी बाळगण्यासारखा आहे.
ते स्वतः साहित्यिक, समीक्षक व प्रकाशक असताना सुद्धा त्यांनी या अंकासाठी कुठेही ‘वन मॅन शो’ केलेला नाही. तर या अंकात मुलाखत, कथा, कविता, लेख आणि बाल प्रतिभेचे लेखन या प्रत्येक भागाला त्या त्या क्षेत्रातील अतिशय अभ्यासू तज्ज्ञ असलेल्या संपादकांना निवडीचे स्वातंत्र्य दिले होते. मुलाखतीचे संपादन डॉ. केशव सखाराम देशमुख, कथेचे संपादन डॉ. माधव पुटवाड, लेखाचे संपादन डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, कवितेचे संपादन डॉ. कमलाकर चव्हाण आणि बालप्रतिभेचे संपादन शिक्षिका मीनाक्षी आचमे यांनी जबाबदारी संपूर्णपणे स्विकारले. या अभ्यासकांनी फक्त संकलन करून निवड केले नाही तर त्या त्या घटकाचे महत्त्व अधोरेखित करणारे संक्षिप्त भाष्यही अंकाच्या सुरुवातीलाच दिले आहे. त्यामुळे वाचकांना त्यांच्या त्यांच्या अभिरूचीनुसार कोणता भाग अगोदर वाचायचा ते कळण्यासाठी अतिशय सुकर ठरले आहे.
विशेष बाब म्हणजे या अंकात जेष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध साहित्यिक, नवोदित लेखकापासून ते शाळेतील मुलांपर्यंत आपले विचार व्यक्त केल्यामुळे हा अंक समतोल आणि सर्वव्यापी झाला आहे. स्त्री जीवनाच्या चिंतनशील वेध घेणाऱ्या दोन मुलाखती वाचकांना विचार करायला भाग पाडतात.”आजचा समाजदेखील कालच्या समाजाइतकाच पुरूषसत्ताक आहे” (पृ.१७) हे जेष्ठ विचारवंत डॉ. जनार्धन वाघमारे यांचे निरीक्षण समतेच्या गप्पा ठोकणाऱ्या टोळीचे बुरखे पाडणारे आहे.”
गावची बाईलेक लिंबाच्या फांदीवर लटकत होती”(बाईलेक कथा, मथुताई सावंत:पृ.२९),”आक्का…ये आक्का ऊठ..म्हणत वकील साहेब तिला हलवू लागले तर गोदा निपचित पडलेली. अंग ताठून गेलेले, तिचा प्राण कधीच गेला होता “(कथा, योगीराज वाघमारे, कथा:पृ.३५), “एका वादविवाद स्पर्धेत मी हुंडा घेणाऱ्या मुलांसोबत लग्न करणार नाही, ही भक्कम बाजू मांडून प्रथम पारितोषिक पटकावले होते; पण माझ्या शिक्षणाचा आणि सामाजिक व्यवहाराचा काडीमात्र संबंध नव्हता.येथे माझाच सौदा चालू होता” (कथा: शंकर विभुते,पृ.१२२)
“कशाला लिहून ठेवलंस
रे व्यासा
महाभारतात ते
द्रौपदीचं प्रकरण
त्यामुळेच तर घडतेय
या भारतात
रोज एका एका
स्त्रीचं वस्त्रहरण”(मारोती कसाब : कविता पृ.११३)
ही या अंकातील काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ललिता गादगे, ऐश्वर्य पाटेकर यांच्या कथा असतील किंवा डॉ. गीताली, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. बालाघाटे यांचे लेख असेल किंवा डॉ. प्रज्ञा दया पवार, कल्पना दुधाळ, अजय कांडर, अशोक इंगळे, महेश मोरे, छाया बेले यांच्या कविता असतील वाचकांना अंतर्मुख करायला भाग पाडतात. शाळेतील मुलांचे लेख, कविता, पुस्तक परीक्षण तर आपणास एक आश्वासक चित्र निर्माण करतात.
आय. एस. एस. एन प्राप्त असलेल्या या अंकाचे कार्यकारी संपादक डॉ. सौरभ जाधव, मुखपृष्ठ व सजावट विजयकुमार चित्तरवाड, अक्षरजुळणी मो. मुर्तुझा अथर, मुद्रितशोधन चंद्रप्रकाश गायकवाड यांनी केले असून स्वागत मूल्ये ३४० रूपये आहे.
कुळवाडी दिवाळी अंक हा फक्त स्त्रियांची ओळख करून देणारा अंक नाही तर तिचा प्रवास, तिचा श्वास, तिच अंतर्मन, तिचा संघर्ष, तिची येशोगाथा, तिची वाटचाल, घराच्या भिंती, समाजाच्या चौकटी, विचारांचा धागा, अभिव्यक्तीची धडपड आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप महत्त्वाच म्हणजे तिची “माणूस” म्हणून अस्तित्वाची लढाई ही या अंकाची बलस्थाने आहेत.
दिपावली अंकाचे नाव – कुळवाडी स्त्री विशेषांक
संपादक – माधव जाधव मोबाईल – 94234 39991
किंमत – ३४० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
