प्रदुषण कॉलिंग
फटाक्यांच्या आवाजाला आणि प्रदुषणाला विरोध करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. त्यामुळेच त्यांच्या विरोधाकडे पोलीस- प्रशासन दुर्लक्ष करीत असते. गणेशोत्सवात डिजे मुळे कान बहिरे होऊ शकतात तर दिवाळीत फटाक्यांच्या आवाजामुळे बहिरेपण, फुफ्फुसाचे व श्वसनाचे विकास होऊ शकतात. उठसूठ नव्या पिढीच्या भवितव्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या संघटना कधी फटाक्याचे आवाज आणि प्रदुषण याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत असे कधी घडलेले नाही.
डॉ. सुकृत खांडेकर
दिवाळी आली आणि गेली. तुळशीच्या लग्नापर्यंत घरोघरी रंगीबेरंगी आकाश दिवे नाचत राहतील. यंदाच्या वर्षी दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. पणत्या, रांगोळ्या, दिव्यांच्या माळा, फुले, फळे नि आकर्षक सजावटीची साधनसामुग्री, कपडे, साड्या, सुकामेवा, मिठाई, लाडू, चकल्या, करंजा, चिवडा आदींच्या रेडिमेड खरेदीसाठी सर्व बाजारपेठा फुलल्या होत्या. अगदी सोन्या- चांदीच्या भावाने उच्चांक गाठला तरीही ज्वेलर्सच्या दुकानात तर आठवडाभर गर्दी होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांचे धूर आणि प्रचंड आवाजाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरारच नव्हे तर राज्यातील लहान मोठी सर्व शहरे चार दिवस दणाणून गेली होती. फटाक्यांचा किमती दरवर्षी वाढत आहेत आणि फटाक्याची खरेदीही त्याच वेगाने वाढत आहे.
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. दिव्यांचा सण. प्रकाशाचा उत्सव. पण प्रत्येक दिवाळीला फटाक्यांची दहशत वाढत आहे. या दहशतीचा त्रास प्रत्येक घरातील लहान मुलांना, वयस्कर लोकांना आणि पक्षी व प्राण्यांना होतो आहे. दरवर्षी फटाक्यांमुळे आगी लागून वित्तहानी व प्राणहानी होत आहे. फटाक्यांमुळे अनेक जण जखमी होत आहेत. पण त्या विषयी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष किंवा राज्यकर्ते व प्रशासन चिडीचूप बसत आहे, याचेच आश्चर्य वाटते. देशाच्या राजधानी दिल्लीमधे गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ फटाक्यांना बंदी आहे मग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधे राज्यकर्ते आणि नोकरशहा फटाके उत्पादन लॉबीपुढे का शरणागती पत्करत आहेत ? विषारी धूर ओकणाऱ्या व कानठळ्या बसविणारे आवाज करणाऱ्या फटाक्यांपासून राज्याला काय लाभ होतो हे तरी एकदा सरकारने जाहीर करावे.
वाहतुकीच्या रस्त्यांवर, चौकाचौकात, नाक्यानाक्यावर काहीही घडले तरी फटाके वाजविणारे वीर दौडत येतात. होळी- शिमगा, दहिहंडी, गणपती, दसरा ,दिवाळी, अशा सणासुदीला तेच तेच उत्साही लोक फटाक्यांचा माळा रस्त्यावर लावतात. कुणाचा वाढदिवस, कोणाची विजयी मिरवणूक, गणपतीची आगमन मिरवणूक, गणपतीची विसर्जन मिरवणूक, क्रीकेट सामन्यातील विजय, फटाके उडवायला कारणे भरपूर मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर तीन चार महिन्यांवर आल्या आहेत. मग उमदेवारांचे नि पुढाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वात आवाजी लक्ष वेधून घेणारे माध्यम म्हणजे फटाके. झिंदाबाद घोषणा देत आणि बँड पथकापुढे फटाक्यांच्या माळा लावत नेत्यांचे स्वागत केल्याशिवाय उत्साही कार्यकर्त्यांना चैन पडत नाही. अर्थात जे फटाके उडवतात, त्याच्या खिशातून पैसे जात नसतात. फटाक्यांचे पैसे देणारे नेत्यांचे सगसोयरे दुसरेच असतात.
फटाक्यांच्या आवाजाला आणि प्रदुषणाला विरोध करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. त्यामुळेच त्यांच्या विरोधाकडे पोलीस- प्रशासन दुर्लक्ष करीत असते. गणेशोत्सवात डिजे मुळे कान बहिरे होऊ शकतात तर दिवाळीत फटाक्यांच्या आवाजामुळे बहिरेपण, फुफ्फुसाचे व श्वसनाचे विकास होऊ शकतात. उठसूठ नव्या पिढीच्या भवितव्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या संघटना कधी फटाक्याचे आवाज आणि प्रदुषण याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत असे कधी घडलेले नाही.
दिवाळीच्या दिवसात मुंबईत लहानमोठ्या आगीच्या दोनशेहून जास्त घटना घडल्या. पोलीस कंट्रोल रूमचा रात्रभर फोन वाजत होता. पोलीस कंट्रोल रूम लोकांनी केलेल्या तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनला कळवते पण पुढे त्याचे काय होते हे कुणालाच कळत नाही. पोलिसांनी तरी काय काय करायचे ? पोलिसांची गाडी निघून गेली की पुन्हा मोठ्या आवाजाचे फटाके वाजवायला सुरूवात होते. दिवाळीच्या चार दिवसात मुंबईने हवेतील प्रदुषणाने मर्यादा ओलांडली होती. त्यामागे फटाके हे एक प्रमुख कारण होते. देशात यंदा्च्या दिवाळीत साडेसात हजार कोटींपेक्षा जास्त किमतीचे फटाके उडवले गेले किंवा त्यांची राख झाली.
ज्या देशात ऐेंशी कोटी लोकसंख्येला पंतप्रधान दरमहा ५ किलो धान्य मोफत देतात, अनेक राज्यात लाडक्या बहिणींना दरमहा बाराशे पंधराशे भाऊबीज सरकारी खजिन्यातून दिली जाते, त्या देशाला साडेसात हजार कोटींचे फटाके उडवणे कसे काय परवडते ? ऐन दिवाळीत रॉकेटस किंवा बाण हे निवासी इमारतीत वा टॉवर्समधे घरात घूसून तेथे आगी लागल्या आहेत . मग फटाक्यांवर नियंत्रण घालण्यासाठी महायुती सरकार आता कोणाच्या आदेशाची वाट पाहात आहे . बहुसंख्य समाज हा शांत आहे व फटाक्याला विरोध करीत नाही, म्हणून सरकारने आवाज व प्रदुषण निर्माण करणाऱ्यांवर कोणती कारवाई करायची नाही का ?
दहिहंडी खेळात मनोरे बनवताना कोसळून दरवर्षी दोन अडिचशे गोविंदा जखमी होतात. आता दिवाळीतही फटाक्यांमुळे तेवढेच जखमी होत आहेत. फटाके उडविणारे निर्बंधाला जुमानत नाहीत. ज्यांच्या अंगावर फटाके उडतात त्यांची त्यांना भिती वाटत नाही. त्यांना पोलिसांचा धाक राहीलेला नाही. गुन्हे दाखल झाले तरी काहीही होणार नाही, अशी त्यांची मानसिकता बनलेली असते. घशाची खवखव व डोळ्यांची जळजळ निर्माण करणाऱ्या फटाक्यांची दहशत कधी नियंत्रित होणार ?
संशोधन काय सांगते ?
- फटाक्यांमुळे हवा मधील विषारी/कणीक प्रदूषण खूपच वाढते — विशेषतः दिवाळीप्रमाणे दिवशी.
- वाढलेली PM₂.₅ / PM₁₀ व इतर धातूंची उपस्थिती आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारी आहे.
- ही वाढ साधारणतः थोड्या वेळेसाठी असली तरी तिचा परिणाम (निरीक्षणेला व आरोग्याला) दीर्घकालीन असू शकतो.
ध्वनी प्रदुषणाची आकडेवारी काय सांगते ?
- एका अभ्यासानुसार, New Delhi मध्ये दिवाळीच्या काळात २४ तासातील PM₂.₅ रक्कम १८२.२ µg/m³ नोंदवली गेली; जी भारतातील राष्ट्रीय मानकांपेक्षा (NAAQS = ६० µg/m³) तीन पेक्षा अधिक पटीने जास्त आहे.
- दुसऱ्या अभ्यासात फटाक्यांमुळे PM₂.₅ व इतर कण PM₁₀ ची वाढ शास्त्रीय पद्धतीने आढळली: उदाहरणार्थ, PM₁₀ ची संख्या दिवाळीच्या काळात सरासरी ३८० µg/m³ इतकी नोंदवली गेली, जे पूर्व-दिवाळी (≈ १३०.३ µg/m³) च्या तुलनेत ५–६ पट जास्त आहे.
- आणखी एका संशोधन रिपोर्टनुसार, भारतातील काही ठिकाणी दिवाळीच्या रात्री PM₂.₅ ची वाढ ८७५ % पर्यंत नोंदवली गेली आहे.
- आणखी एका अभ्यासात फटाका फुटवण्यामुळे संबंधित धातू व कण वायुमंडळात नोंदवले गेले: उदाहरणार्थ Sr, Ti, Zn हे धातू दिवाळीच्या काळात PM₂.₅ मध्ये ~७३ % पर्यंत वाढले.
- एका अभ्यासात असेही स्पष्ट झाले की फटाके फुटवण्यामुळे दिवाळीच्या रात्री न्यू दिलीमध्ये वा परिसरात PM₂.₅ ची पातळी पूर्व-फटाका वरील स्तराच्या १६ पट एवढी वाढली होती.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
