January 8, 2025
One hour group reading initiative at Shivaji University
Home » एक तास सामूहिक वाचन
काय चाललयं अवतीभवती

एक तास सामूहिक वाचन

कोल्हापूर: एक रम्य सायंकाळ… मावळतीकडे झुकणारी सूर्यकिरणे… निसर्गरम्य उद्यान… त्या उद्यानातील कट्ट्यांवर बसून आपल्या आवडीची पुस्तके वाचणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी… ऑनलाईन लर्निंग आणि ई-बुक्सच्या जमान्यामध्ये दुर्मिळ होऊ घातलेले हे दृश्य आज पाहायला मिळाले ते शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानामध्ये! निमित्त होते महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या पंधरवड्यानिमित्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘एक तास सामूहिक वाचनासाठी’ या उपक्रमाचे!

महाराष्ट्र शासनाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा वाचनविषयक विशेष पंधरवडा राज्यभरात साजरा करण्याविषयी कळविले आहे. त्याअंतर्गत अनेकविध उपक्रम शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालये आणि अधिविभागांतही आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठातील सर्व घटकांसाठी ‘एक तास सामूहिक वाचनाचा’ असा एक उपक्रम आयोजित करण्याबाबत ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांना सूचित केले होते. त्यानुसार आज सायंकाळी विद्यापीठातील अधिकारी, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सामूहिक वाचन उपक्रम बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला.

कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी सायंकाळी चार वाजता आपापल्या आवडीची पुस्तके घेऊन उद्यानात जमले. उद्यानातील सर्व कट्टे त्यांनी भरून गेले. अपेक्षेपेक्षा अधिक वाचक आल्याने परिसरात खुर्च्या मांडूनही बसण्याची व्यवस्था ज्ञानस्रोत केंद्राकडून करण्यात आली. ऐनवेळी उपस्थित झालेल्या वाचकांसाठी ग्रंथालयातील पुस्तके मोफत उपलब्ध करण्याची सुविधाही देण्यात आली.

यावेळी वाचकांनी बहुविध विषयांच्या पुस्तकांची निवड वाचनासाठी केल्याचे दिसून आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शांता शेळके यांचे ‘वडीलधारी माणसे’, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचे ‘विकासाचे यशवंतयुग’ तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी सूर्यकांत मांढरे यांचे ‘कोल्हापुरी साज’ हे पुस्तक वाचले. साहित्यिक कथा, कादंबऱ्या, कविता यांखेरीज चरित्रात्मक आणि प्रेरणादायी पुस्तके वाचण्याकडे युवा वाचकांचा कल असल्याचे दिसून आले.

या उपक्रमानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक चर्चा करताना आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुस्तकवाचनाला प्राधान्य द्यावे, वाचनाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी, यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत वाचलेल्या पुस्तकांविषयी अधिविभाग स्तरावर रसग्रहण लेखन आणि कथन स्पर्धा घेण्यात येणार असून २६ जानेवारी रोजी विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात येणार असल्याचे समारोप प्रसंगी डॉ. धनंजय सुतार यांनी सांगितले. चहापानाने उपक्रमाची सांगता झाली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading