स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर आपोआप आपल्या साहित्याची दखल घेतली जाते. मग ते कसल्याही कागदावर लिहिलेले असो. त्याची दखल घेतलीच जाते. यासह साहित्यिक महादेव मोरे यांनी सांगितल्या आहेत त्यांच्या साहित्या संदर्भातील आठवणी. सर्व सामान्याचे जीवन मोरे यांनी कादंबरीत साकारले. नव्या पिढीकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ? यासाठी पाहा पीठाक्षरं व्हिडिओ….
मराठी साहित्यविश्वाला महादेव मोरे यांनी समृध्द केले असले तरी साहित्याक्षेत्राकडून मात्र ते बेदखलच राहिले आहेत. श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात या साहित्यिकांबरोबर या माणसांनं लेखन केलं आहे. ही सगळी मंडळी नावारूपाला आली विविध मंडळावर निवडी झाल्या, लेखकाचे लेखकराव झाले मात्र महादेव मोरे गावाकडे आहेत तसेच आहेत. गावाकडच्या माणसांच्या व्यथा, वेदना समजून घेत जनसामान्यात मिसळून राहिलेत.
महादेव पार्वती रामचंद्र
भाषावार प्रांतरचना झाली आणि सरळमार्गी असणारं शिक्षण थांबत थांबत कधी थांबलं ते कळलं नाही. शिक्षण थांबलं मग जगण्याचा संघर्ष चालू झाला. कधी गॅरेज, कधी पडेल ते काम करीत राहिलो तरी वाचनाची आवड स्वस्त बसू देत नव्हती. मग लिहावसं वाटू लागलं म्हणून मग तंबाखू कामगार, महिला, ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, गॅरेजवाले, जोगते-जोगतीण या कष्टकरी माणसांच्या जीवनाचं चित्र रेखाटावं वाटू लागलं म्हणून मग माझ्या साहित्याच्या कथेत हिच माणसं नायक म्हणून येऊ लागली असं पीठाक्षरं माहितीपटात सांगताना महादेव मोरे यांच्या चेहर्यावर आनंद विलक्षण असतो. माझ्या कॉलेजच्या काळात सत्यकथेत लिहिणारी माणसं, जीए, अरविंद गोखले ही माणसं वाचनात आली आणि अधिक तीव्रतेने साहित्याकडे वळत गेलो असंही ते प्रांजळपणे सांगतात. वाचनाच्या आवडीतूनच सत्यकथा मासिकेचा वर्गणीदार झालो. आणि माझ्या परिसरातील तंबाखू कामगार, महिला, उपेक्षितांचे, दलितांचं, मजूर महिलांचं जीवन चितरण्याचा प्रयत्न करू लागलो. या त्यांच्या प्रयत्नाना, लिहिणार्या कष्टकरी हाताला प्रा. रमेश साळुंखे यांनी चित्रबद्ध करताना माहितीपटाचे कोणतीही सीमारेषा आखून न घेता त्यांनी सविस्तरपणे चित्रमय भाषेत मांडली आहे. यासाठी रमेश सांळुखे यांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा.
महादेव मोरे लिहू लागले, पुस्तकं बाजारात आली आणि त्यांच्यावर समीक्षकांची नजर गेली. मग समीक्षकांनी तंबाखूच्या वासाची मराठी कथा म्हणून त्यांच्या कथेचा गौरव केला. निपाणीसारख्या गावात राहताना वाचन, खेळ अशा गोष्टी आवडायच्या म्हणून बालवीर क्लबमध्ये लिहित राहिलो. यानंतर बालवीर क्लबतर्फे रोजीनिशी लिहिणे, खेळाच्या स्पर्धा, लेझीम अशा अनेक गोष्टी करीत विद्यार्थ्यांना त्या शिकवत राहण्यात आनंद वाटायचा यातूनच माझी कथा राहिली असे ते आपल्या कर्नाटक मराठी बोलीभाषेत ते सांगतात तेव्हा वाचक म्हणून मला ते आनंददायीच वाटत असतं.
कोल्हापूरातील शिक्षणाच्या आठवणी सांगताना मोरे अधिक खुलताना दिसतात. प्राचार्य खर्डेकर, एम. आर. देसाई, सखाराम खराडे, सदाशिवराव मंडलिक यांच्या सोबतच्या आठवणी ते हसत हसत त्यांच्या जुन्या आठवणीत रमतानाचं चित्र आनंददायी आणि संवेदनशील माणसाचं आठवणीत रमणारं मन दिसतं. सदाशिवराव मंडलिकांविषयी ते आवर्जून सांगतात, सदाशिवराव विद्यार्थी दशेपासूनच हाडाचे कार्यकर्ते होते. संघटना कौशल्याचे त्यांच्यावर कमांड होती. महाविद्यालयात असताना त्यांच्यात असणार्या नेतृत्वाचं गुण दिसून येत होते. मंडलिकांविषयी ते भरभरून बोलत असताना त्यांच्याविषयी असणारी आत्मीयता प्रकर्षानं दिसून येते.
साहित्याकडे कसा वळला या साळुंखे सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, याला जबाबदार माझे वडील कारणीभूत आहेत. वडीलांना नाटकाची हौस होती, ते नाटकातून काम करायचे म्हणून मग माझ्याकडेही आवड आपसूक आली असंही ते सांगतात.
त्या काळात गरीबी होती. तीन रुपयांपासून ते तीस रूपयांपर्यंत काम करतानाचे ते कष्टाचे क्षण सांगतात. पैसे तुटपुंजे मिळायचे पण कामाशिवाय पर्याय नव्हता असं ते सांगतात. ट्रक्सी रिपेयरी, ब्रेक ऑयलिंग, गाड्यांची इंजीन उतरवणे ही कष्टाची कामं करताना अवघे तीन रुपये किंवा आठ दिवस काम केले तर पंधरा वीस रुपयाचे मिळायचे. पण कधी कधी तेपण मिळायचे नाहीत, कधी कोण उधारी ठेवत तसेच निघून जायचे हे ते हसत हसत सांगतात. याविषयी त्यांच्या मनात कुणाविषयी रागलोभ नाही हे सहज दिसून येतं.
गॅरेजच्या दिवसात मन जास्त दिवस रमलं नाही. मग पिठाची गिरणी चालू केली. या सगळ्यात शाळा, कॉलेज थांबलं असलं तरी त्यांनी लेखन थांबवलं नाही. कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. शिक्षणाला भाषावार प्रांतरचनेचा फटका बसला, पण लिहिणं चालूच ठेवल्याचं ते सांगतात. महाविद्यालयाच्या अंकातून, भित्तीपत्रिकेतून कथा छापून येऊ लागल्या. म्हाईचा दिवस या त्यांच्या कथेला मिळालेल्या पहिल्या पारितोषिकेचा आठवण सांगतात. तर आनंद यादव यांच्या आईच्या ओव्या या कथेलाही पारितोषिक मिळालं होतं असं सांगताना त्यांना त्यांचा अभिमान वाटतो.
मराठी साहित्यविश्वाला महादेव मोरे यांनी समृध्द केले असले तरी साहित्याक्षेत्राकडून मात्र ते बेदखलच राहिले आहेत. श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात या साहित्यिकांबरोबर या माणसांनं लेखन केलं आहे. ही सगळी मंडळी नावारूपाला आली विविध मंडळावर निवडी झाल्या, लेखकाचे लेखकराव झाले मात्र महादेव मोरे गावाकडे आहेत तसेच आहेत. गावाकडच्या माणसांच्या व्यथा, वेदना समजून घेत जनसामान्यात मिसळून राहिलेत.
प्रा. रमेश साळुंखे यांनी तयार केलेला पीठाक्षरं म्हणजे महादेव मोरे यांच्या काळातील चालता बोलता इतिहास आहे. माहितीपटाच्या संकल्पनेपलिकडे जाऊन त्यांनी केलेलं चित्रण महादेव मोरे यांच्या साहित्याला दिलेली दाद आहे. वस्ती, येडचाप, खेकटं, गायगुत्ती, गब्रू, एकोणीसावी जात, आडगार, चेहर्यामागचे चेहरे, चित्ताक, ईगीन, माणसं अशीही, मत्तीर, झोंबडं, चकवा आणि चेहरा या त्यांच्या साहित्यकृती. प्रत्येक साहित्यकृतीतून सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष , माणसाचं जगणं, प्राप्त परिस्थिती, माणसा माणसातील राजकारण, अनेक पातळीवर चाललेला महिलांचा संघर्ष या सगळ्याचे चित्रण मांडताना ते वास्तवाला भिडत जातात.
पीठाक्षरं या माहितीपटात ते आपल्या आयुष्यातील अनेक घटना सांगतात. त्या पाहताना एक अस्वस्थदायी चित्र मनात उभा रहातं, मात्र महादेव मोरे यांच्या चेहर्यावर असणारा आनंद तसूभरही कमी होताना दिसत नाही.
मोरे यांच्या कथाकथानासाठी गेलेल्या दौर्याचा प्रसंग पीठाक्षरनं खूप सुंदर आणि संवेदनशीलपणे टिपला आहे. कथाकथनाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं तरी ना जेवणाची ना मानधनाची सोय होते. हा प्रसंग सांगण्यापेक्षा पीठाक्षरं माहितीपटात बघताना मन हेलवतं आणि हसूही आवरता येत नाही अशी व्दिधा मनस्थिती होते.
साथी किशोर पवार, सुभाष देसाई, शंकर सारडा या माणसांच्या आठवणी सांगताना महादेव मोरे यांच्या चेहर्यावर कमालीचं समाधान असतं. आयुष्यात अनेक बरेवाईट प्रसंग येतात पण आपण थांबायचं नाही चालत रहायचं हेच सूत्र ते जाता जाता सांगतात.
पीठाक्षराचे दिग्दर्शक, संकल्पनाकार माहितीपटाच्या शेवटी विचरतात की नव लेखकाना काय सांगाल तेव्हा समकाळाचा विचार करून म्हणतात, सध्या हायवेची एक संस्कृती आहे, ती मराठी साहित्यात आली नाही. मोबाईलची भाषा त्यांना परिपूर्ण येत नसली तरी मोबाईल संस्कृतीमुळे समाजात एक वाईट प्रथा रूढ होते त्याचं चित्रण नव्या लेखकांनी करायला हवं अशी अपेक्षा व्यक्त करीत असताना गीत सुरू होतं…
माझी गिरण गिरण
दळते दळण दळण
माझ्या महादेवाची गिरण
इथं वेगळच नातं
पार्वतीनं दिली साथ
दिला खोपा भरून भरून
या गाण्यावर पीठाक्षरं माहितीपट थांबतो खरा, पण महादेव मोरे यांच्या साहित्याचा, समकाळाचा एक पट डोळ्यासमोर उभा राहतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूपच सुरेख लेख!