कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी कवी अजय कांडर यांच्या हस्ते कणकवलीत प्रकाशन
नाट्यकर्मी डॉ राजेंद्र चव्हाण, कवी डॉ. अमूल पावसकर, कवयित्री डॉ दर्शना कोलते यांची उपस्थिती
कणकवली – येथील प्रतिथयश डॉक्टर तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘डार्विन लुटताना ‘ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार २२ डिसेंबर २०२४ रोजी सायं.४ वा.जाणवली येथील नीलम कंट्रीसाईडच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.यावेळी प्रसिद्ध कवी तथा साहित्य अकादमीचे माजी सल्लागार सदस्य अजय कांडर यांच्या हस्ते ‘डार्विन लुटताना ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत रंगकर्मी, बालरंग भूमीचे संवर्धक डॉ.राजेंद्र चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे.तर कवी डॉ. अमूल पावसकर, कवयित्री डॉ.दर्शना कोलते यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.डॉ. प्रफुल्ल आंबेरकर हे कोकणातील ख्यातकीर्ती त्वचारोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र गेली अनेक वर्ष ते निष्ठेने काव्य लेखन करत असून कोकणातील विविध संमेलनात त्यांना कविता वाचनासाठी निमंत्रितही करण्यात आले आहे.
आता प्रभा प्रकाशनातर्फे त्यांचा ‘डार्विन लुटताना ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. ‘ डार्विन लुटताना’ या काव्यसंग्रहातील कविता कोणत्याच एका विषयाच्या बंधनात अडकलेल्या नाहीत. जगण्याचे विविध स्तर आणि विविध मानवी भावभावना या कवितांमध्ये शब्दबद्ध झाल्या आहेत. प्रेमाच्या असोशीपासून आज माणसाचं जनावरात होणाऱ्या हिंस्त्र रूपांतरापर्यंत ही कविता टोकदार भाष्य करते. सचोटीच्या वैद्यकीय व्यवसायातही आता अनिष्ट गोष्टी कशा रीघु लागल्या आहेत यावर प्रकाश टाकताना डार्विन लुटताना मधील कविता भ्रष्ट वैद्यकीय व्यवस्थेवर आसूड उडते. अशा आशय सघन होत गेलेल्या या कवितांच्या डार्विन लुटताना काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रभा प्रकाशन आणि डॉ. आंबेरकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.