मुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव या सव्वाशे वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकातून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांचा ‘शाही राज्यारोहण समारंभ’. कारण राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृतिशताब्दी वर्षात त्यांच्या राज्यारोहण समारंभाचे वर्णन करणारा हा दुर्मिळ दस्तऐवज पुनःप्रकाशित केला आहे. याचे प्रकाशन ३० एप्रिल रोजी होत आहे. याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.
यशोधन जोशी
१८८४ साली छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात दत्तक आले. त्यावेळी त्यांचे वय फक्त १० वर्षांचे असल्याने महाराजांचे शिक्षण पूर्ण होईतोवर कोल्हापूर दरबारच्या रिजन्सी कौन्सिल आणि रेसिडेंट ह्यांनी राज्यकारभार पाहिला. १८९४ साली महाराजांनी विशीत प्रवेश केला आणि त्याचवेळी त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले. ह्यानंतर त्यांच्या हाती प्रत्यक्ष राज्यकारभार अर्थात मुखत्यारी देण्याबद्दल चर्चा होऊन दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस ह्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरला हा राज्यारोहण समारंभ होईल हे निश्चित झाले आणि हा समारंभ शाही इतमामात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या समारंभाचे वर्णन आजवर आपल्याला तत्कालीन मोजक्या पत्रांतूनच समजून घ्यावे लागत असे. पण आता या समारंभाची माहिती देणारा अस्सल वृत्तांत पुनःप्रकाशित होत आहे.
साधारणतः पाच वर्षांपूर्वी मुंबईतील जुन्या पुस्तकांच्या दुकानातून एक जीर्ण अवस्थेतील पुस्तक माझ्या हाती आले. ते म्हणजे बाळाजी महादेव करवडे यांनी लिहिलेले आणि १८९६ साली प्रकाशित झालेले ’मुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव.’ बाळाजी महादेव करवडे हे पट्टणकोडोली पेटा आळते इथल्या शाळेत हेडमास्तर होते. करवडे गुरुजींनी हा समारंभ प्रत्यक्ष पाहून त्याचे वर्णन लिहून ठेवल्याने या पुस्तकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त होते. या पुस्तकात आलेली सर्व माहिती आणि समारंभाचे वर्णन अगदी योग्य असल्याचे प्रमाणपत्र संस्थानचे तत्कालीन दिवाण मेहेरजी कुंवरजी तारापोरवाला आणि मुख्य न्यायाधीश बळवंत नारायण जोशी यांसारख्या जबाबदार व्यक्तींनी या पुस्तकाला दिलेले आहे. त्याकाळी या पुस्तकाच्या ३०० प्रती कोल्हापूर दरबारतर्फे विकत घेतल्या गेल्याचेही या पुस्तकांतील नोंदीवरून समजते.
राज्यारोहण समारंभाचे गद्य आणि पद्यरूपाने वर्णन करणारे हे दुर्मिळ पुस्तक आजवर संशोधकांना उपलब्ध झालेले नसावे कारण छत्रपती शाहू महाराजांवर लिहिल्या गेलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांतील संदर्भांची यादीत या पुस्तकाचे नाव आढळत नाही. हे पुस्तक कोल्हापुरातल्या करवीर नगर वाचनमंदिर आणि कागलच्या महात्मा गांधी वाचनालयात उपलब्ध आहे.
त्यामुळे इतिहास अभ्यासक आणि सामान्य वाचकांना हे पुस्तक पुन्हा उपलब्ध करून द्यावे असे मी ठरवले. पुनर्मुद्रण करताना हे पुस्तक आहे तसे न छापता त्यात या कार्यक्रमासंदर्भातल्या इंग्लंड तसेच इतर अनेक देशातील संग्रहालयातून मिळवलेल्या विविध साधनांची भर घालून एक उत्तम संदर्भग्रंथ तयार करावा असे मी ठरवले. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेली अस्सल पत्रे, काही हिशोबाचे कागद, टाऊनहॉल येथे गव्हर्नरच्या सन्मानाप्रीत्यर्थ राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळची बैठकव्यवस्था, या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारा करवीर दरबारने प्रसिद्ध केलेला आदेश, या समारंभप्रसंगी पुणे सार्वजनिक सभा यांच्यावतीने महाराजांना देण्यात आलेले मानपत्र, या कार्यक्रमाचा केसरी या वर्तमानपत्रात छापून आलेला वृत्तांत व सर्वात महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाची अमेरिकेतील एका वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी आणि काही छायाचित्रे अशा दुर्मिळ साधनांची भर घालून एक संदर्भमूल्य असणारा दस्तऐवज तयार करण्यात आला आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी या पुस्तकाला शुभेच्छा संदेश दिलेला असून जेष्ठ इतिहास संशोधक आणि राजर्षी शाहू गौरवग्रंथाचे संपादक प्रा.डॉ रमेश जाधव यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिलेली आहे.
पुस्तकाचे नाव – मुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव
मुळ लेखक – बाळाजी महादेव करवडे
संशोधन आणि संपादन – यशोधन जोशी
पुस्तकासाठी संपर्क – अमोल कुटे बुकविश्व – 8999505011
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.