गोफणगुंडा काय ती दिवस, हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं कायलीत खीर शिजायची तव्यावर पोळी भाजायची सुवासिनीचा राडा हुता जेवायला गावगाडा हुता लांबलचक पंगती असायच्या शेलगाटात सुवासिनी दिसायच्या ताटातल्या खिरीवर साय चढायची मगच गुळवणी पोळी वाढायची सगळं काय मनासारखं हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं अशी लग्नं पाच दिस चालायची तरणीबांड पोरं राबायची पुरण दळायची, कणीक मळायची हलगी संबळावर ताल धरायची दिल खुलास लेझीम खेळाची पंचवीस घागरी खांद्यावर फिरवायची नाचत नाचत पाणी भरायची गावभर रुखवत मिरवायची उखाण्याशिवाय रुखवत हलत नव्हतं टीका-टिपणी झाली तरी कोण कुणाला बोलत नव्हतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं हीनदीन असले तरी ज्याचं त्याला भान होतं माणुसकीचं मोकळं रान होतं बैलगाडीनं वर्हाड जायचं दोन दिवस मजेत रहायचं गावातील विविध समाजास मानाचं पान असायचं कुणाला सिधा असायचा तर कुणाला हळदीला मान असायचा सारं काही धनधान्यावर चालायचं प्रत्येक सुहासिनीची वाटीभर ज्वारी होती तवा पैशाला किंमत नव्हती बलुतं बुडवायची हिंमत नव्हती इमानदारीनं आयुष्य जगत हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं घड्याळ रेडिओसाठी नवरा रुसायचा अबोला धरुन बसायचा दोन पाच रुपयाचा आहेर आसायचा भोंग्यातून जाहीर व्हायचा आपलं नाव कवा येतंय वाट बघायचा नाव येताच आनंदानं हसायचा रातभर वरात असायची दारोदारी रांगोळी दिसायची बैलगाडीवर पलंग पलंगावर नवरानवरी बसायची गुळपाणी दारी असायचं ताट तांब्या वाटी कल्हय केलेली पितळी हुती तवा बी आहेराची यादी पळवणारी मित्रांची टोळी हुती सोळकं हुतं बोळकं हुतं सोळक्याला अर्थ हुता चारित्र्य कळण्याचा अर्थही सार्थ हुता तवा कुटुंब उंबर्याच्या आत हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं शिवाजी सातपुते, ९०७५७०२७८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.