आपण जागे होऊया भावांनो. बोला बिन्धास्त. करूद्या ट्रोलींग. बघूया त्यांचा क्रूरपणा श्रेष्ठ आहे, का आपली संवेदनशीलता… आता देश वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायचीबी वेळ जवळ आलीय. संविधानाचं संरक्षण कसं करायचं याचा फैसला आपला आपण करूया.
किरण माने, अभिनेता
बर्टोल्ट ब्रेख्त नांवाच्या एका महान नाटककाराची गोष्ट सांगतो.
…ब्रेख्तच्या काळात त्याच्या देशात लै बेक्कार वातावरण होतं. आत्ता आपल्याकडं आहे तसंच. ‘स्वातंत्र्य’ नांवालाच होतं. हिटलरच्या हुकूमशाहीनं धुमाकूळ घातलावता. चांगल्या माणसांचं जगणं मुश्कील झालंवतं. हिटलरच्या विरोधात बोललं की धमक्या, अर्वाच्य शिविगाळ तर व्हायचीच. पण अन्यायाविरोधात आवाज उठवणार्यांची तोंडं बंद करण्यासाठी हे नराधम कुठल्याबी खालच्या थराला जायचे.
ब्रेख्तनं कुणाला न जुमानता हिटलरच्या धोरणांविरोधात जोरदार लेखन केलं. त्यावेळी हिटलर विरोधात लिहिणार्यांच्या पुस्तकांवर हिटलर बंदी घालायचा. पण कसं कुणास ठावूक? हिटलरच्या शातीर नजरेतनं ब्रेख्तचं पुस्तक सुटलं होतं. त्या पठ्ठ्यानं थेट हिटलरला पत्र लिहीलं : “मी पण तुझ्या विरोधात लिहीले आहे. कृपा करून माझ्या पुस्तकावर बंदी घाल. नाहीतर इतिहास असं समजेल की मी तुझ्या बाजूनं होतो. किंवा असंही समजलं जाईल की मी इतकी महत्त्वाची व्यक्ती नव्हतो की तू घाबरुन माझ्या पुस्तकावर बंदी घालावीस.”
…गड्याहो, भवताली मानवतेविरोधात गोष्टी घडतायत आणि कलाकार त्याबद्दल संवेदनशील नसेल तर तो मुर्दाड आहे ! स्वातंत्र्य हे सहजासहजी आलेले नाही. आपलं स्वातंत्र्य, आपल्यातली समता आणि बंधुता टिकवायची असेल तर राजकारण दुर्लक्षित करू नका. कुणा लुंग्यासुंग्यांच्या शिवीगाळीला, ट्रोलींगला घाबरुन राजकारणावर बोलणं टाळू नका. ब्रेख्तनं लिहुन ठेवलंय.. तेच इस्कटून सांगतो.. राजकारण हे आपल्या, आपल्या आईबापांच्या, आपल्या मुलाबाळांच्या जगण्याची किंमत ठरवतं. ते दुर्लक्षून कसं चालंल??? जो माणूस छाती फूगवून सांगेल, की “राजकारण लै बेकार म्हनून मी त्यावर बोलत नाही.” तो माणूस आजच्या भवतालात मुर्दाड आहे.
…तुम्ही राजकारणाकडं केलेल्या दुर्लक्षातूनच जन्माला येतात बलात्कारी.. धार्मिक हिंसा घडवून आणणारे जल्लाद आणि सगळ्यात वाईट म्हणजे या अज्ञानातूनच तुमच्या उरावर नाचतात भ्रष्ट सरकारी अधिकारी, तळवेचाटू पत्रकार, भेकड न्यायव्यवस्था आणि अर्वाच्य शब्दांत ट्रोलींग करणारी हुकूमशहांची पिलावळ !
आपण जागे होऊया भावांनो. बोला बिन्धास्त. करूद्या ट्रोलींग. बघूया त्यांचा क्रूरपणा श्रेष्ठ आहे, का आपली संवेदनशीलता… आता देश वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायचीबी वेळ जवळ आलीय. संविधानाचं संरक्षण कसं करायचं याचा फैसला आपला आपण करूया. नाहीतर आपली पुढची पिढी समजेल की आपण छाटछूट होतो.. भेकड होतो… हुकूमशहाच्या डुक्करपिलावळींनी शिवीगाळ करण्याइतकं, अडवण्याइतकंबी महत्त्व आपल्याला नव्हतं !
आपल्या पुढच्या पिढ्यांनी अभिमानाने सांगीतलं पाहिजे आमचा पूर्वज वाघ होता… स्वाभिमानाच्या रस्त्यावर, माजोरड्या वर्चस्ववाद्यांची तांगडून तांगडून शिकार केली होती त्यानं.
“तुका म्हणे मानदंभ जया चित्ती । तयाची फजिती करू आम्ही ।।”
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.