March 15, 2025
Vinaya Gore the creator of the third point Biography book Finding my core
Home » तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणारी विनया
मुक्त संवाद

तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणारी विनया

विनयाने पुस्तकाला शीर्षक दिले आहे … Finding My Core म्हणजे माझ्या मते मराठीत म्हणता येईल “माझ्या अंतःसत्वाचा शोध !” ही केवळ घटना-प्रसंगाची क्रमवार जंत्री नाही. त्या प्रत्येक प्रसंगी आपल्या सामर्थ्याचा शोध घेत, विकसित होत जाण्याचा प्रवास आहे. “जगण्याची कला” करण्याचा. नियतीने दिलेले कुरूप जिणेही सुंदर करण्याचा हा प्रवास आहे. म्हणूनच केवळ तरुण/तरुणींनाच नव्हे तर कोणत्याही वयातल्या माणसांना वाट दाखवणारा हा प्रवास!

डॉ. तारा भवाळकर (सांगली)

सामान्यत: स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा आधार असल्याशिवाय तरणोपाय नाही, असा समज आहे. या दोन बिंदूंपलीकडे तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणाऱ्या ज्या अपवादा‍त्मक स्त्रिया आहेत त्यापैकी विनया एक! हा तिच्या तिसऱ्या बिंदूचा शोध मलाही तिच्या “विनया गोरे ते विनया गोर” च्या वाचनातून लागला. एरव्ही माझे “तिसऱ्या बिंदूच्या शोधात” हे पुस्तक मी तिला कधीकाळी भेट दिले होते, त्याची आठवण तिने अखेरीस नोंदवली आहे.

डॉ. तारा भवाळकर,
ज्येष्ठ लेखिका, साहित्यिक,
अभ्यासक – नाटक, लोककला व लोक संस्कृती

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मा‍झ्या स्मृतीत खूप खोल गेलेला आवाज आला. “मावशी, मी विनया बोलते आहे.” “कुठून?” “अमेरिकेतून” … अरे बापरे! जळजळ २०-२५ वर्षांनी विनयाचा आवाज ऐकला, पण … इतका स्पष्ट, अस्खलित मराठी उच्चार की मधली वर्षं पुसूनच गेली. वयाच्या २०व्या वर्षानंतर आत्तापर्यंत परदेशात राहिलेली, सांगलीसारख्या मध्यम शहरातून, अस्सल मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली, शिकलेली, त्या काळच्या काही मुलींसारखी लग्न होऊन नवऱ्याबरोबर परदेशात गेलेली आमची पन्नास वर्षांपूर्वीची शेजारीण. खूप घरोबा असलेलं गोरे कुटुंब. वडील प्रा. एकनाथ गोरे हे विलिंग्डन महाविद्यालयातले गणिताचे प्राध्यापक आणि आई शोभनाताई इंग्रजीच्या एम. ए. पदवीनंतर स्वतंत्र कोचिंग क्लासेस घेणाऱ्या सुविद्य गृहिणी.

रहायला आमच्या वाड्याच्या शेजारच्या वाड्यात, पण इंग्रजीचा क्लास आमच्या घराच्या अक्षरशः शेजारच्या दालनात. मधले दार उघडले की आमचे एकच घर होत असे. गोरे आँटींचा वर्गाचा वेळ सोडला तर हे दार उघडेच असे. तेथे त्यांच्या शाळकरी मुली विनया आणि धाकटी वर्षा अभ्यासाला येत. मधल्या उघड्या दारातून येणेजाणे, चहा-कॉफी होई, गप्पा तर सततच. प्रा. गोरे परीक्षा झाल्या की पेपर तपासायला येत. आमच्याकडे पाहुणे आले की या दालनाचा मुक्त वापर होई, त्यामुळे आमचे इतर नातलगही परस्परांशी चांगले परिचित झालेले … विनयाच्या फोनमागची ही सगळी पार्श्वभूमी! ही विनया आणि वर्षा आईचा ८०वा वाढदिवस २०११ साली साजरा करीत होती आणि त्यांना माझी प्रतिक्रिया ध्वनिमुद्रित करून हवी होती म्हणून हा फोन.

नंतर २०२३ मध्ये म्हणे विनया वयाची ७० वर्षे पुर्ण करीत होती आणि तिचा वाढदिवस वर्षा आणि तिची मुले धुमधडाक्यात साजरा करीत होती. त्यासाठी पुन्हा त्यांना माझी प्रतिक्रिया ध्वनिमुद्रित करून हवी होती.

दरम्यान सगळ्यांच्याच आयुष्यात बऱ्या-वाइट घटना घडून गेल्या होत्या. या दोघी बहि‍णींची लग्ने आम्ही शेजारी असतानाच झाली होती. नंतर आम्ही घर बदलल्याने भेटी दुरावत गेल्या. पण त्यांचे आई-बाबा असेपर्यंत बातम्या कळत असत. आता तेही काळाच्या पडद्याआड गेले. दोघींचे जोडीदार काही निरनिराळ्या कारणांनी दुरावले. तरी दोघी आपापल्या जागी हिंमतीने उभ्या राहिल्या. प्रगती करीत राहिल्या. वर्षाची दोन्ही मुले उच्चशिक्षित कर्तबगार झाली. विनया प्रथम जर्मनीत गेली होती, वयाच्या विसाव्या वर्षी. थोड्याच अवधीत हातावर फक्त पन्नास डॉलर ठेऊन जोडीदार तिला जनअरण्यात सोडून आला. त्यानंतरची पन्नास वर्षे विनयाने एकटीने काय काय केले? अर्धवट शिक्षण पुढे कसे पूर्ण केले? प्रतिष्ठेने जगभर कशी हिंडली? कोणकोणत्या प्रसंगांना कशी सामोरी गेली? आधीच स्वतंत्र वृत्तीच्या या संस्कारशील मुली आपापल्या क्षेत्रात कशा विकसित होत गेल्या? ही पडद्याआडची कहाणी विनयाने शब्दबद्ध करावी, म्हणून तिच्या भाचरांनी, हितचिंतकांनी आग्रह केला. ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या या ५० वर्षांच्या अज्ञात जगण्याचा पट ज्यांना जाणवला, त्यांना तो लोकविलक्षण वाटला.

दरम्यान विनया एक-दोनदा  भारतात कोल्हापूरला वर्षाकडे आली असताना मला भेटायला दोघी आल्या, अगदी आवर्जून! आणि मधल्या दीर्घ काळात खंडित झालेला संवाद-भेटीचा प्रवाह पुन्हा सुरु झाला, अगदी सहजपणे. आणि मग बऱ्याच चर्चा होऊन विनयाची एकांडी शिलेदिरी संघर्षकथा तिने लिहून काढली. ती वाचल्याखेरीज थोडक्यात काही सांगता येणे कठीण आहे.

या लेखनाला आत्मकथन म्हणायचे, आत्मचरित्र म्हणायचे की आणखी काही? … वाचकाने ठरवावे. पण विनयाने शीर्षक दिले आहे … Finding My Core …  म्हणजे माझ्या मते मराठीत म्हणता येईल “माझ्या अंत:सत्वाचा शोध”! ही केवळ घटना-प्रसंगाची क्रमवार जंत्री नाही. त्या प्रत्येक प्रसंगी आपल्या सामर्थ्याचा शोध घेत, विकसित होत जाण्याचा प्रवास आहे. “जगण्याची कला” करण्याचा. नियतीने दिलेले कुरूप जिणेही सुंदर करण्याचा हा प्रवास आहे. म्हणूनच केवळ तरुण/तरुणींनाच नव्हे तर कोणत्याही वयातल्या माणसांना वाट दाखवणारा हा प्रवास! विशेष म्हणजे अतिशय सहज ओघवत्या मराठीत विनयानेच शब्दांकित केलेला, पन्नास वर्षात मराठीशी संपर्क सुटलेला असताना विनयाचे बोलणे-लिहिणे हरवले नाही याचे मला कौतुक वाटते.

हे लेखन तीन विभागात केले आहे. पहिला भाग बालपण, शिक्षण, लग्न (भारतात) तेही सांगलीला, नंतर परदेशात गेल्यानंतरच्या अनुभवातून विचारपूर्वक स्वतंत्र होण्याचा निर्णय! त्यातून सावरणे, उभे राहणे फार कठीण होते, ऐन विशी-बविशीत, तेही परदेशात कोणताही आधार नसताना. आणि पुढे खरी संघर्ष गाथा, आत्मशोध घेत जगण्याचा प्रवास सुरु होतो. तेव्हा विनया लिहिते “मी तरले, मी जगले.” हे प्रत्यक्ष जगणं, कल्पितापेक्षाही किती चमत्कृतींनी भरलेलं असतं हे समजण्यासाठी पुढची कथा वाचायला हवी.

त्याकाळात आई-वडीलांना लिहिलेली प्रदीर्घ पत्रे, काही टिपणे आणि आठवणींसह ती लिहिते, त्यातून आपलेच अंतर्मन सोलत गाभाऱ्यापर्यंत जाते, खरं तर हे कोणालाही कठीण असते, स्त्रियांना तर फारच. पण विनया हे पूर्ण ताकदीने, जाणीवपूर्वक आणि प्रगल्भपणे करते. जगभर असलेल्या पुरुषवर्चस्ववादाची झळ निरनिराळ्या कंपन्यात, विविध कामे करताना तिलाही बसते. पण ती विचारपूर्वक परिस्थितीचे विश्लेषण करते.

सामान्यपणे घरात, बाहेर, कॉर्पोरेट जगात कोठेही पुरुषप्रधान व्यवस्थेला सामोरे जातांना स्त्रिया कधी आक्रमक होतात, तर कधी माघार घेऊन मिटून जातात. विनया त्या प्रसंगांना हसत सामोरी जाते. कारण स्त्रियांबाबत पुरुषही अडाणी असतात. त्यांना हसत हसत ती जाणीव करून दिली की तेही सुधारतात. काही गमतीदार अनुभव मुळातूनच वाचायला हवेत. म्हणून आत्मविश्वास भक्कम हवा. प्रकृती सक्षम हवी. आरोग्याची हेळसांड कुणीच, विशेषत: स्त्रियांनी करू नये. आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे आहेच, पण केवळ अर्थार्जन म्हणजे स्वावलंबन नव्हे, हे ती आवर्जून सांगते. ज्या देशात, परिवारात आपण वावरतो तेथील संस्कृती, भाषा, अन्न, मित्र-मैत्रिणी, कलांचा परीचय या सर्वांशी मैत्री झाली तरच तुम्ही तुमचं स्थान अंत:सत्वानिशी निर्माण करू शकाल, जे विनयाने केले आहे.

सामान्यत: स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा आधार असल्याशिवाय तरणोपाय नाही, असा समज आहे. या दोन बिंदूंपलीकडे तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणाऱ्या ज्या अपवादा‍त्मक स्त्रिया आहेत त्यापैकी विनया एक! हा तिच्या तिसऱ्या बिंदूचा शोध मलाही तिच्या “विनया गोरे ते विनया गोर” च्या वाचनातून लागला. एरव्ही माझे “तिसऱ्या बिंदूच्या शोधात” हे पुस्तक मी तिला कधीकाळी भेट दिले होते, त्याची आठवण तिने अखेरीस नोंदवली आहे. त्याचे कौतुक वाटलेच. पण हे स्वतंत्र नांव, “बिंदू” निर्माण करण्यामागची तिची पन्नास वर्षांची तपश्चर्या आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रावर खूपच थोडी पुस्तके उपलब्ध आहेत. परिस्थितीशी झगडून विदेशात करिअर करणाऱ्या सांगलीच्या विनयाचे आत्मकथन त्यातील संघर्ष, तटस्थपणे केलेले आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण प्रांजळपणे वाचकांसमोर मांडण्याची तळमळ आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे वाचकांना आकर्षित करील यात संदेह नसावा.

• माधव जोशी (डोंबिवली)

हे आत्मकथन म्हणजे ७० वर्षांच्या साहसाची कहाणी आहे. कॉर्पोरेट करिअरपलीकडे स्किइंग, सेलिंग, चित्रकला, फिटनेस, संगीत आणि नृत्य हे विनयाचे छंद आणि ते अनुभव हा प्रवास आणखी रोचक करतात. ती केवळ भारतीय म्हणून कौतुक नाही तर विनया ही यशस्वी अमेरिकन Survivor आहे आणि म्हणूनच तिच्या विजिगीषू वृत्तीला सलाम!

वसंत वसंत लिमये (पुणे)

ही जीवन कथा म्हणजे जीवन जगण्याची कला ज्याला शिकायची इच्छा आहे, त्याच्यासाठी एक आधारभूत पुस्तकच आहे ! एखाद्या शिडाच्या बोटीत बसून खवळलेल्या समुद्रातून प्रवास करतानासुद्धा कसे मस्त आनंदात राहायचे, याचे अप्रतिम अनुभव अनुभवू शकता.

डॉ. दिलीप पटवर्धन (सांगली)

सांगलीतील पिठलं भात ते यॉर्कशायर पुडिंग अशी झेप घेतलेली, अरूपाला रूप देत वाटचाल केलेली या आत्मकथनाची सत्यवचनी अप्रमत्त नायिका आपल्या आयुष्याच्या लोलकातून सप्तरंगी आभा विखरीत संदेश देत राहते….

प्रमोद गोवंडे (पुणे)

पुस्तकाचे नाव – Finding My Core विनया गोरे ते विनया गोर
लेखिका – विनया गोरे
प्रकाशक – विभव प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – २६२
किंमत – रूपये ५००/-
पुस्तकासाठी संपर्क – 9503388099


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading